मर्यादापुरुषोत्तम श्रीराम!

    17-Apr-2024
Total Views |

sangrah
 
आपलेही भाग्य की इतक्या महान सर्वश्रेष्ठ मर्यादापुरुषोत्तमाच्या पावन भूमीत आपण जन्माला आलो. पुराणकारांनीदेखील म्हटले आहे की, धन्यास्तु ते भारतभूमिभागे! पण, श्रीरामांचे चरित्र हे केवळ भारतापुरतेच किंवा तथाकथित हिंदूजनांपुरतेच मर्यादित नाही, तर ते समग्र विश्वातील प्रत्येक राष्ट्रात वसणार्‍या प्रत्येक मानवासाठी आहे. मग तो हिंदू असो की मुस्लीम, इसाई असो, बौद्ध असो, पारशी असो, शीख असो किंवा चिनी, अमेरिकी.. कोणीही असो.. जो कोणी मानव आहे, त्यासाठी प्रभू श्रीराम आणि त्यांचे उज्वल व्यापक जीवन!
रामो विग्रहवान् धर्म: साधु सत्य पराक्रम:।
राजा सर्वस्य लोकस्य देवानां मघवानिव॥
 
रघुकुलदीपक प्रभू श्रीरामांच्या समग्र जीवनाचा सारांश महर्षी वाल्मिकींनी आपल्या वरील श्लोकातून अगदी सार्थपणे व्यक्त केला आहे. श्रीराम म्हणजे साक्षात धर्माचे मूर्त स्वरूप! ते साधुस्वभावी, सत्यधर्मी व पराक्रमी होते. तसेच ज्याप्रमाणे देवांचा राजा इंद्र, त्याचप्रमाणे या संपूर्ण विश्वाचा राजा म्हणजे श्रीराम होय. प्रभू श्रीरामांचे नाव घेताच प्रत्येकाचे हृदय भरून येते. संपूर्ण जनता त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वासमोर श्रद्धेने नतमस्तक होते. केवळ भारतातच नव्हे, तर सार्‍या जगात या महान अशा लोकोत्तर महापुरुषाची कीर्तीपताका मोठ्या गौरवाने फडकत आहे. रामायण ग्रंथाने प्रत्येक सहृदयी माणसाला प्रभावित केले आहे.
 
‘रामायण’ शब्दाचा विग्रह केल्यास राम + अयन (प्रवास) म्हणजेच श्रीरामांचा आदर्श जीवनप्रवास! श्रीरामाचा कालखंड हा त्रेतायुगाच्या शेवटी म्हणजेच आजपासून जवळपास नऊ लाख वर्षांपूर्वीचा! महर्षी वाल्मिकींच्या ज्ञानसाधनेतून व काव्यप्रतिभेतून स्फुरलेले रामायण हे जगातील पहिले आर्ष महाकाव्य! वाल्मिकींनी या आर्ष महाकाव्यात श्रीरामाच्या जीवनाचा जो जाज्वल्य व प्रेरक असा प्रवास वर्णिला आहे, तो खरोखरच युगानुयुगे जगातील प्रत्येक मानवाला नवी दिशा व प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच रामायण कथेविषयी म्हटले आहे की,
 
यावत् स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले।
तावत् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति॥
 
जोपर्यंत या भूतलावर पर्वत उभे असतील व नद्या वाहत राहतील, तोपर्यंत रामायणकथा ही समग्र विश्वात प्रचारित होत राहील.
विश्वामध्ये भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ व सर्वमान्य मानली जाते. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक येथील वैदिक तत्त्वज्ञान, तर दुसरे या भूमीत जन्माला आलेले महापुरुष! थोर सत्पुरुषांच्या श्रृंखलेमध्ये मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे नाव अग्रणी ठरते. त्यांचे आद्योपांत जीवन म्हणजे साक्षात आदर्शांचा वाहता झरा आहे. अगदी लहानपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू श्रीरामांच्या प्रत्येक कृतीतून सद्गुणांचा दरवळ पसरलेला दिसून येतो. महर्षी वाल्मिकींनी जेव्हा आपल्या काव्यरचनेसाठी चरित्र नायकाचा शोध घेण्यास प्रारंभ केला, तेव्हा महर्षी नारदांकडून त्यांना श्रीरामाच्या प्रेरक जीवनासंबंधी माहिती मिळाली. वाल्मिकींनी नारदास विचारले की, “या जगात सर्वगुणसंपन्न, शूरवीर, धर्मज्ञ, कृतज्ञ, व्रताचरणी, दृढनिश्चयी, चारित्र्यसंपन्न, प्राणीमात्रांचे हित साधण्यात तल्लीन, विद्वान, क्रोधावर विजय मिळवणारा, सर्वसमर्थ, अविद्वेषी, शत्रुसंहारक इत्यादी गुणांनी परिपूर्ण असलेल्या एखाद्या प्रियदर्शी व्यक्तीविषयी मी आपणांकडून जाणू इच्छितो. ज्ञातुमेवंविधं नरम्!” तेव्हा महर्षी नारदांनी सांगितले की, “इक्ष्वाकु वंशात जन्माला आलेले श्रीराम हे नियतात्मा, महावीर्य ,श्रुतिमान, धृतिमान, बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी, श्रीमान, शत्रुसूदन, धर्मज्ञ, सत्यसंध, प्रजाहितदक्ष, यशस्वी, ज्ञानसंपन्न इत्यादी अशा पवित्र गुणांनी परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्व आहे. ते शारीरिक अवयवांनीसुद्धा बलसंपन्न आहेत. ते भौतिक व आध्यात्मिक धनाने परिपूर्ण असून शत्रूंचा नाश करणारे आणि समस्त प्राण्यांचे रक्षण करणारे आहेत. ते धर्माचे रक्षक व आश्रितांना संरक्षण देणारे असून वेदशास्त्रे व व्याकरणात निष्णात व धनुर्विद्येत पारंगत आहेत. सर्व प्रकारच्या शास्त्रांना ग्रहण करण्याची त्यांची प्रतिभा आणि स्मरणशक्ती फारच उच्च दर्जाची आहे. अशा लोकप्रिय व साधुस्वभावी असलेल्या श्रीरामांविषयी विचार केला, तर ते खर्‍या अर्थाने सर्वश्रेष्ठ अशा आदर्शांचे प्रतीक आहेत.
 
श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यसंपन्न, समुद्राप्रमाणे गंभीर, चंद्रासमान शीतल, विष्णूसारखे तुल्यबलशाली, प्रियदर्शनी, फुलांप्रमाणे कोमल आणि वज्रासारखे कठोर आहेत. जेव्हा ते शत्रूवर कोपतात, तेव्हा त्यांचा क्रोध कालाग्नीप्रमाणे व्यक्त होतो. पण, त्यांच्यामध्ये क्षमाशीलतादेखील तितकीच उच्चकोटीची आहे की ज्याला सीमाच नाही. दातृत्वामध्ये ते कुबेर तर सत्याचरणामध्ये जणूकाही साक्षात धर्मच आहेत. श्रीरामाचे हे शारीरिक, चारित्रिक व बौद्धिक गुण ऐकून वाल्मिकींनी आपल्या काव्याचा नायक म्हणून श्रीरामाची निवड केली आणि त्यांच्या अपार काव्य साधनेतून या भूमंडळाला रामायण नावाचे अजरामर असे काव्य लाभले.
 
प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा कोणताही प्रसंग समोर आला, तर तो निश्चितच सर्वांकरिता सत्प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. ते आदर्श मातृ-पितृभक्त होते. मन, वाणी व कृतीने त्यांनी यत्किंचितही दुखावले नाही की त्यांची आज्ञा भंग केली नाही. वडिलांच्या आज्ञेनुसार 14 वर्षांचा घनघोर वनवास अगदी आनंदाने स्वीकारणारे श्रीराम हे आजही केवळ याच एका घटनेमुळे सर्वांच्या हृदयमंदिरी विराजमान आहेत. पिता दशरथ हे दु:खी अंत:करणामुळे रामास वनवासाची आज्ञा देऊ शकत नव्हते, तेव्हा माता कैकेयी ही वार्ता ऐकविण्यास उशीर लावते. तेव्हा रामांनी उद्गारलेले वचन रघुकुळाच्या मानप्रतिष्ठेला वाढविणारे ठरतात-
 
अहं हि वचनाद् राज्ञ: पतेयमपि पावके।
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे॥
नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च।
तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम्।
करिष्ये प्रतिज्ञाने च रामो द्वि: न अभिभाषते॥
 
हे आई, मी राजांच्या आज्ञेनुसार जळत्या अग्नीत उडी घेईन. भयंकर असे हलाहल विष प्राशन करेन आणि समुद्रातही उडी घेऊन स्वतःला संपवून टाकेन. शेवटी हे तर माझे गुरु, पिता, राजा आणि हितकर्ते आहेत. म्हणून राजा काय म्हणत आहे व त्याची इच्छा काय आहे, हे आपण लवकर सांगावे. मी त्यांची आज्ञा पाळण्याची प्रतिज्ञा करतो. कारण, राम हा द्विवचनी नाही, हा दोन वेळा बोलत नाही. जे मी एकदा ठरवतो, ते पूर्ण करतो.
 
श्रीरामाची ही आज्ञापालनाची तत्परता आणि शब्द व वचनांवर दृढ असण्याची भावना त्यांच्या महान चरित्रास उच्च शिखरावर नेऊन पोहोचवणारी आहे. पितृभक्तीचा किती मोठा आदर्श आहे हा! वडिलांच्या आज्ञेसाठी स्वतःला संपवणारा पुत्र आज शोधूनही सापडणार नाही. इतकेच काय, जेव्हा कैकेयीने रामाच्या वनवासाची गोष्ट सांगितली, तेव्हा रामाची अवस्था एखाद्या महान स्थितप्रज्ञासारखी होती, हे सांगताना महर्षी वाल्मिकी म्हणतात-
 
आहूतस्याभिषेकाय विसृष्टस्य वनाय च।
न मया लक्षितस्तस्य स्वल्पोऽप्याकारविभ्रम:॥
 
राज्याभिषेकास बोलाविले असता आणि वनाला जाण्याकरिता निरोप देत असता (या दोन्ही अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंगी) रामचंद्रांच्या चेहर्‍यावर मला थोडाही भेद आढळला नाही. राज्यप्राप्तीचा आनंद किंवा वनगमनाबाबत छोटीशीसुद्धा दुःखछटा चेहर्‍यावर दिसली नाही. दोन्ही प्रसंगी समदृष्टी होती. यावरून हे लक्षात येते की, श्रीरामांमध्ये किती उच्चप्रतीची सहनशक्ती व धैर्य होते.
 
स्वतःला प्रभू श्रीरामांचे भक्त म्हणवून घेणार्‍या रामभक्तांमध्ये इतकी उत्कट आदर्श पितृभक्ती दृष्टीस पडेल काय? जर आम्ही आमच्या आई-वडिलांची सेवा-सुश्रुषा करीत नसू आणि त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवत असू, तर आम्हांस श्रीरामांचे नाव घेण्याचा काय अधिकार? श्रीरामांचे जीवन हे तर मात्यापित्यांच्या भक्तीचे आदर्श उदाहरण आहे. 14 वर्षांचा तो कठोर वनवास, हिंस्र श्वापदांनी भरलेली ती भयावह आणि कंटकाकीर्ण अशी वनयात्रा! कंदमुळे व फळे खाऊन आणि नद्या-नाल्यांचे पाणी पिऊन पर्णकुटीतले ते राहणे! थंडी, ऊन, वारा, पाऊस आदी सर्व काही सहन करीत एकच कर्तव्यभावना अंगी बाळगत प्रसन्न वदनाने वनी वावरणारा तो युगपुरुष आणि त्याची ती अर्धांगिनी सीता व सेवेत तत्पर असलेला तो लक्ष्मण हा लहान भाऊ! तिकडे अयोध्येतील नंदीग्रामात एखाद्या तपस्व्याप्रमाणे जगत प्रजेची पुत्रवत सेवा करणारा प्रिय भरत! आणि हे सर्व घडले आहे ते केवळ या पवित्र भारतभूमीतच! आपलेही भाग्य की इतक्या महान सर्वश्रेष्ठ मर्यादापुरुषोत्तमाच्या पावन भूमीत आपण जन्माला आलो. पुराणकारांनीदेखील म्हटले आहे की, धन्यास्तु ते भारतभूमिभागे! पण, श्रीरामांचे चरित्र हे केवळ भारतापुरतेच किंवा तथाकथित हिंदूजनांपुरतेच मर्यादित नाही, तर ते समग्र विश्वातील प्रत्येक राष्ट्रात वसणार्‍या प्रत्येक मानवासाठी आहे. मग तो हिंदू असो की मुस्लीम, इसाई असो, बौद्ध असो, पारशी असो, शीख असो किंवा चिनी, अमेरिकी.. कोणीही असो.. जो कोणी मानव आहे, त्यासाठी प्रभू श्रीराम आणि त्यांचे उज्वल व्यापक जीवन!
 
आज केवळ भारतातच नव्हे, तर समग्र जगात अविचारांचे काहूर माजले आहे. माणसाला माणूस म्हणून ओळखले जात नाही. कुटुंबे उद्ध्वस्त होत चालली आहेत. पिता-पुत्र, माता-पुत्र, बहीण-भाऊ, गुरु-शिष्य, राजा-प्रजा, व्यक्ती-समाज, व्यक्ती-राष्ट्र हे सर्व संबंध आज नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. माणसांच्या अंत:करणातून माणुसकी, प्रेम, दया, वात्सल्य, करुणा, सहिष्णुता या सर्व गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत. अशा या वातावरणात प्रभू श्रीरामांचे चरित्र आपल्या सर्वांचे जीवन विकसित करण्यास अमृतवल्ली ठरणारे आहे. आज खर्‍या अर्थाने गरज आहे, ती श्रीरामांच्या सत्चारित्र्याचे पालन करण्याची! नितांत आवश्यकता आहे, ती या भूमंडळीच्या नक्षत्रासमान तेजस्वी महापुरुषाचे चित्र, मूर्ती किंवा प्रतिमेच्या पूजनापेक्षा त्यांचे उदात्त, व्यापक, सर्वमंगलमय असे चरित्र अंगीकारण्याची!

प्रा. डाॅ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८