अभद्र युतीचे परिणाम

    16-Apr-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटीच, त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मराठी जनतेने उद्धव ठाकरे यांना बराच काळ सांभाळून घेतले. पण, निव्वळ सत्तेच्या लालसेपायी उद्धव ठाकरे यांनी स्युडो सेक्युलर पक्षांशी आघाडी केल्यावर त्यांची हिंदुत्त्ववादी मराठी माणसाशी जोडलेली नाळ तुटली. मुख्यमंत्रिपदाच्या अल्पकाळात उद्धव ठाकरे यांनी सेक्युलर रंग उधळून महाराष्ट्रात पुन्हा जी मोगलाई आणली, ती गोष्ट मराठी जनता विसरू म्हटले तरी विसरू शकत नाही.
 
ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य छायाचित्र दादरच्या शिवसेना भवनाच्या दर्शनी भागावर लावले आहे, त्याच भवनात उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुस्लिमांची बैठक घेतली. आता मुस्लीम समाजाने पूर्वी जे झाले, ते विसरून जावे आणि आपल्याला मते द्यावीत, असे आवाहन करण्यासाठी ही बैठक होती. ‘पूर्वी झाले ते’ म्हणजे नक्की काय ‘झाले ते’ विसरायचे? “बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडला असेल, तर त्याचा मला अभिमान वाटतो,” हे बाळासाहेबांचे उद्गार विसरायचे का? “काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा मी माझे दुकान (म्हणजे शिवसेना) बंद करीन,” हे बाळासाहेबांचे मत विसरायचे का? म्हणजे उद्धव ठाकरे यांना शिवसेना ही हिंदुत्त्वाशी जोडली गेली आहे, त्या इतिहासाची लाज वाटते, त्याबद्दल अपराधीपणा वाटतो, असा त्याचा अर्थ होतो. ‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्त्व नको’ म्हणणार्‍या उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व हे जाळीदार टोपीचे आणि दाढीचे आहे, हेच यानिमित्त दिसून येते. तसे असेल तर उद्धव ठाकरे यांना आपल्या गटाच्या नावातील ‘शिव’ही काढून टाकले पाहिजे. कारण, ते ‘शिव’ म्हणजे शंकराचे नाव आहे किंवा शिवाजी महाराजांचे नाव आहे.
 
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संगतीचा भलताच दुष्परिणाम उद्धव यांच्या मनावर झाला असला, तरी मुस्लीम मतांच्या जीवावर आपण निवडून येऊ, या भ्रमात असलेल्या उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थितीची कल्पनाच नाही. महाराष्ट्रातील मुस्लीम आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांना आपल्या पहिल्या पसंतीचा पक्ष मानीत नाहीत. अ. भा. मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) हा त्यांना आपला पक्ष वाटतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये या पक्षाच्या आमदार-खासदारांना महाराष्ट्रातील मुस्लिमांनी निवडून आणले. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. मुस्लीम मतांच्या जोरावर उद्धव यांचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. कारण, जिथे मुस्लीम मते निर्णायक ठरतात, तेथे ‘एमआयएम’चे उमेदवार उभे आहेत आणि मुस्लीम मते त्यांच्याच पारड्यात पडणार आहेत. ज्या ज्या पक्षांनी मुस्लिमांचे लांगूलचालन केले, ते सपा, काँग्रेस, तृणमूल वगैरे सारे पक्ष आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
 
उद्धवजी, मराठी माणसाने काय काय विसरायचे? सलग २५-३० वर्षे भारतातील सर्वांत श्रीमंत आणि प्रतिष्ठित महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर तुमची सत्ता होती. पण, मुंबईचा अपेक्षित विकास कधी झालाच नाही. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घटला, तो तुमच्या सत्तेच्या कालखंडातच. मुंबईतील मराठी माणूस आता कल्याण-डोंबिवलीच्या पुढे आणि वसई-विरारला फेकला गेला आहे. तुमच्या कार्यकाळात मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यांवरूनच अडखळत वाटचाल करावी लागत होती. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील अनेक भाग कमरेइतक्या पाण्यात बुडून जात होते, पण त्यावर कोणतीही उपाययोजना करणे तुमच्या महापालिकेला जमलेले नाही. सध्या सुरू असलेला किनारी महामार्ग व अन्य योजना तुम्ही चक्क बंद करून टाकल्या होत्या. मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणार्‍या मेट्रो रेल्वेचे कामच केवळ वैयक्तिक अहंकारापोटी बंद करून टाकले होते. सुदैवाने राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार आल्यावर त्याने हे काम मार्गी लावले. पण, तुमच्या स्थगिती निर्णयाचा तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा भुर्दंड मुंबईकरांच्या माथी बसला. मेट्रो कार्यान्वित होण्यास दिरंगाई झाली, ते वेगळेच!
 
‘कोविड’ काळातील कथित कामाचा डांगोरा आपल्याच चेल्यांकडून पिटून घेतला, तरी त्या भयानक महामारीतही मृत व्यक्तींच्या टाळूवरील लोणी खाण्यास तुम्ही कमी केले नाही. सध्या या काळात उभारलेल्या रुग्णालयांतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असून, त्यात तुमच्या पक्षाचे एकेक नेते अडकत आहेत. लहान मुलांच्या खिचडीवरही तुम्ही ताव मारलात, ही गोष्ट लज्जास्पद आहे. हे विसरायचे का?
 
केतकी चितळेसारख्या एका तरुण अभिनेत्रीला फुसक्या कारणावरून तुमच्या सरकारने दीड-दोन महिने तुरुंगात टाकले, ते विसरायचे? मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलून कंगना राणावतसारख्या अभिनेत्रीचे घर आणि कार्यालय बुलडोझरने पाडणे, हा तुमचा ‘पुरुषार्थ’! केतकीप्रमाणेच निखिल भामरे या २१ वर्षीय तरुणाविरोधात तुमच्या मित्रपक्षाने राज्याच्या विविध शहरांमध्ये तब्बल १७-१८ ‘एफआयआर’ नोंदविले होते आणि त्यालाही ४० दिवस तुरुंगात टाकले होते. त्याचा गुन्हा? त्याने शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियात प्रसिद्ध केली होती. तुमच्या विरोधात कोणीही टीकेचा ‘ब्र’ जरी उच्चारला तरी त्याला तुरुंगात टाकले जात होते. नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला न केलेल्या गुन्ह्यासाठीही तुरुंगात टाकण्यापर्यंत तुमची मजल गेली होती. मराठी माणूस यालाच ‘मोगलाई’ म्हणतो. त्यांचा गुन्हा कोणता होता, तर तुमच्या ‘मातोश्री’ बंगल्यासमोर ते हनुमान चालीसा म्हणणार होते. हा गुन्हा आहे? ममताबानो यांनी ‘जय श्रीराम’ घोषणेवर घातलेली बंदी आणि तुमचे वर्तन हे एकाच स्तराचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती-पुण्यतिथीदिनी त्यांच्यासाठी साधे ट्विटही न करणार्‍या गांधी माय-लेकांपुढे तर तुम्ही दिल्लीला जाऊन नतमस्तक झाला होतात, हे विसरायचे? इतके होऊनही राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेला मात्र तुम्ही न चुकता हार घालत होता. वर पुन्हा दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही, हे पालुपद बोलण्यास तुम्ही मोकळेच होता.
 
महाराष्ट्राने कधी कल्पना केल्या नव्हत्या, अशा घटनांचा अनुभव तुमच्या सरकारने मराठी जनतेला दिला. ज्या उद्योगपतीने देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, त्याच्याकडूनच खंडणीपोटी कोट्यवधी रुपये उकळण्याचा गुन्हेगारी स्वरूपाचा कट तुमच्या सरकारने रचला. त्यासाठी संशयास्पद चरित्र आणि कारकिर्द असलेल्या सचिन वाझे या एका निलंबित पोलीस अधिकार्‍याला हाताशी धरून या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली. नंतर हे प्रकरण उघड झाल्यावर ते दडपून टाकण्यासाठी त्यातील एका साक्षीदाराचा खूनही करविला. इतकेच नव्हे, तर याच वाझेच्या मदतीने मुंबईतील बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये खंडणीपोटी वसूल करण्याची योजनाही तुमच्या सरकारने आखली होती. हे सारे विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाही. त्यामुळे जनता आता तुम्हालाच विसरून जाण्याच्या मन:स्थितीत आहे.