साताऱ्याची खरी लढाई छत्रपती उदयनराजे विरुद्ध शरद पवार!

    16-Apr-2024
Total Views |

Udayanraje Bhosle & Sharad Pawar 
 
सातारा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसाठी साताऱ्याचे एक ऐतिहासीक महत्त्व आहे. सोबतच महाराष्ट्राची जनता साताऱ्याशी आणि साताऱ्यात असलेल्या छत्रपतींच्या गादीशी भावनिकदृष्ट्या जुळलेली आहे. त्याच सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलीये. सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहलेल्या छत्रपती उदयनराजेंना मागच्यावेळी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची चांगली संधी निर्माण झालीये.
 
सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या साताऱ्यातील लढाई ही उदयनराजे भोसले विरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी होणार आहे. या दोन्ही उमेदवारांपैकी कुणाचं पारडं जड आहे, हे पाहण्यासाठी आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचीस विधानसभा मतदारसंघाचे पक्षीय बलाबल जाणून घेऊया. सातारा लोकसभा मतदारसंघात कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा, कोरेगाव आणि वाई अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत. तर वाई विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे आमदार आहेत. त्यासोबतचं कराड दक्षिणमधून काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत. त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे आणि पाटण विधानसभा मतदारसंघातून शंभूराज देसाई हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आहेत. तर सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांचे भाऊ शिवेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत. या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की, सातारा लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार जागांवर महायुतीचे आमदार आहेत. तर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने विचार केल्यास सातारा लोकसभा मतदारसंघात निश्चितच छत्रपती उदयनराजे यांची ताकद जास्त आहे.
 
सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊ. १९५१ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणुक झाली. पण त्यावेळी या लोकसभा मतदारसंघाची विभागणी दोन भागात होती एक सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर. पहिल्या निवडणुकीत सातारा दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर १९५७ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॅम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवून क्रांतीसिंह नाना पाटील साताऱ्याचे खासदार झाले. त्यानंतर १९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे किसन वीर हे खासदार झाले. १९६७ ला सातारा लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे खासदार झाले. १९६७ ते १८८४ यादरम्यान यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
 
त्यानंतर १९८४ ते १९९१ मध्ये काँग्रेस नेते प्रतापराव भोसले हे साताऱ्याचे खासदार राहिले. म्हणजेच १६६२ ते १९९१ म्हणजेच जवळपास तीस वर्ष आणि आठ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचाच खासदार निवडून येत होता. सातारा लोकसभा मतदारसंघात १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेचे हिंदुराव निंबाळकर हे निवडुन आले. त्यानंतर १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मणराव पाटील हे खासदार झाले. पुढेय २००९, २०१४ आणि २०१९ या तीन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना छत्रपती उदयनराजे यांनी विजय मिळवला. २००९ मध्ये २ लाख ९७ हजार, २०१४ मध्ये ३ लाख ६६ हजार आणि २०१९ मध्ये १ लाख २६ मतांनी उदयनराजे यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक केली होती.
 
पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना आपल्या खासदारकीचासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुक झाली. यावेळी उदयनराजे भाजपकडून तर शरद पवारांनी आपले मित्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहाच महिन्यांत पुन्हा झालेली निवडणुक आणि शरद पवारांच्या पावसातल्या सभेमुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा ८७ हजार मतांनी पराभव झाला. पण, भाजपनं २०२० मध्ये लगेच उदयनराजे यांना राज्यसभेत खासदार केलं. आता पुन्हा यावेळी उदयनराजे भाजपच्या चिन्हावर २०२४ ची लोकसभा निवडणुक लढण्यास सज्ज आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचं आव्हान असेल.
 
माथाडी कामगार नेते अशी ओळख असलेले शशीकांत शिंदे हे सध्या विधानसपरिषदेचे आमदार आहेत. याआधी ते विधानसभेचेसुद्धा आमदार राहिलेले आहेत. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुक लढण्यास नकार दिल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. शशिंकात शिंदे यांच्याआधी उत्तर कराड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाची चर्चा होती. पण या दोघांचीही नावं मागे पडली आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शरद पवारांना उमेदवार मिळत नव्हता म्हणून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली, अशी टीका विरोधक त्यांच्यावर करत आहेत. साताऱ्यातील ही लढाई उदयनराजे आणि शशिकांत शिदे अशी दिसत असली तरी, साताऱ्यातील खरी लढाई ही छत्रपती उदयनराजे विरूद्ध शरद पवार अशीच आहे.