डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’

    16-Apr-2024
Total Views |
Ram
महाराष्ट्राची भूमी आणि संस्कृतीच्या प्रेमातून-स्वाभिमानातून प्रसवलेले श्लोकबद्ध महाकाव्य म्हणजे डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’ होय. रामाला पिता, सीतेला माता आणि हनुमानाला महाराष्ट्राचा निर्माता मानणार्‍या डॉ. साधलेंचे हे रामायण भक्ती-प्रासादिकतेऐवजी शृंगार, करुण आणि वीर रसाला प्राधान्य देणारे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना या काव्यास लाभली असून शृंगाराच्या अतिरेकाचा त्यांनी स्पष्टपणे निर्देश केलेला आहे. आधुनिक पाश्चात्य ऐहिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे रामायण काव्य-कल्पना म्हणून सर्वांना आवडेल. पण, शृंगाराच्या अतिरेकाने ते टीका व उपेक्षेचे धनी ठरले. तरी पण महाराष्ट्री रामकथाकारांची परंपरा, डॉ.साधलेंच्या महाराष्ट्र रामायणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आज रामनवमीनिमित्त या ‘महाराष्ट्र रामायणा’विषयी...
 
रामाच्या रामत्वे पोसले। ते राष्ट्र महाराष्ट्र झाले।
गोदी तिरी फुलले। चौफेर पुढे वाढण्या।
राम या राष्ट्राचा पिता। सीता या राष्ट्राची माता।
मारुती याचा निर्मिता। ही त्रिधारा जीवनाची॥
- (महाराष्ट्र रामायण)
 
श्रीराम कथेमध्ये अशी काही विलक्षण ताकद आहे की, या विषयावर खूप वाचावे, खूप बोलावे, खूप चिंतन करावे आणि लेखन करावे, अशी अंतरंग उर्मी निर्माण होते. म्हणून एका भाषणात कवी अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, ‘हे राम, तुम्हारा चरित स्वयं काव्य हैं; कोई कवी बन जाये सहज संभव हैं।’(कवी मैथिलीशरण गुप्त) श्रीमद्भागवतापेक्षा रामायण, रामकथेवर आपणास विपुल साहित्य आढळते. रामकथेमध्ये हरवून गेलेल्या चिकित्सक अभ्यासकांपैकी डॉ. आनंद साधले एक होते. ते मूळचे सावंतवाडीचे, पण प्राध्यापक म्हणून हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांनी ३०-३५ वर्षे अखंड राम व रामायणाचाच अभ्यास केला. संस्कृत-मराठीतील दीडदोनशे रामकथापर ग्रंथ वाचून त्यांचे चिंतन केले. त्यांचा दृष्टिकोन निखळ ऐहिक, अत्यंत आगळावेगळा आहे. त्यांच्या लेखनातून त्यांच्यात दडलेल्या महाकवीचा परिचय होतो.
 
‘महाभारतावरील हा जय नावाचा इतिहास आहे’ या कादंबरीने डॉ. आनंद साधले (आत्माराम नीलकंठ साधले) सर्वत्र चर्चेत आले होते. जग ज्याला ‘धर्मराज’ म्हणून गौरवते, त्या युधिष्ठिराला डॉ. साधले यांनी ‘खलपुरुष’ म्हणून कादंबरीत रंगवले होते. त्यामुळे खूप मोठा वाद, चर्चा रंगल्या होत्या. प्राचार्य अ. दा. आठवले (स्वामी वरदानंद भारती) यांनी डॉ. साधलेंचे मत, ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ पुस्तक लिहून साधार, सप्रमाण खोडून काढले होते. डॉ. साधले यांच्या नावावर ‘आनंदध्वजाच्या कथा’, ‘इसापनीती’, ‘नरेंद्रचे रूक्मिणी स्वयंवर’, ‘दहा उपनिषदे’ आणि अनेक अभिजात संस्कृत नाटकांचे अनुवाद असे विपुल साहित्य आहे. त्यांचे ‘परि हरि हा ब्रह्मचारी’ हे पुस्तकही बहुचर्चित ठरले होते.
 
‘राम व रामायण’ या विषयावर त्यांच्या दोन कादंबर्‍या १) वैदेही २) ‘धन्य अंजनीचा सुत’ प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी रामकथेवर स्वयंप्रज्ञेने स्वतंत्र महाकाव्य लिहिले असून, त्या ओवीबद्ध रामायणाला त्यांनी ‘महाराष्ट्र रामायण’ असे नाव दिलेले आहे. महाराष्ट्राच्या नाशिक पंचवटीमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे वास्तव्य होते. त्यांच्या वनवासातील अनेक महत्त्वाच्या घटना या परिसरात घडल्या, हे लक्षात घेऊन डॉ. साधले यांनी आपल्या रामायणाला खास ‘महाराष्ट्र रामायण’ नाव देऊन आपल्या वेगळेपणाचा परिचय घडविला आहे.
 
‘महाराष्ट्र रामायणा’चे अंतरंग
सकल संत परंपरेनुसार-संस्कृत कवीच्या प्रघातानुसार डॉ. आनंद साधले यांनी ‘महाराष्ट्र रामायण’ काव्याचा प्रारंभ, नमनस्वरूप मंगलाचरणाने केलेला आहे. संत शिरोमणी ज्ञानेश्वरांना डॉ. साधले ‘महाकवीचा कवीवर’ म्हणून वंदन करतात.
प्रथम वंदीन ज्ञानेश्वर।
साष्टांग वंदीन ज्ञानेश्वर।
जो महाकवीचा कवीवर।
शब्दसृष्टीचा परमेश्वर।
ज्ञानदेव ज्ञानियांचा॥
 
आश्चर्य म्हणजे, डॉ. साधले मंगलाचरणामध्ये आधी ज्ञानेश्वरांना वंदन करतात आणि मग आदिकवी वाल्मिकींना नमन करतात आणि आपला मराठी स्वाभिमान दर्शवितात.
 
त्यानंतर आदिकवी। वाल्मिकींची वंदीन थोरवी।
रामाची चरित्रे गावी। वाटे ज्याच्या कृपेने॥
 
डॉ. साधले हे अतर्क्य अजब रसायन आहे. ते स्वतःला प्रस्तावनेत अकारण ‘नास्तिक’ म्हणवून घेतात. संत ज्ञानदेव, वाल्मिकीऋषी यांच्याविषयीचा कवी म्हणून असलेला आदरभाव ही एक प्रकारची श्रद्धाच नव्हे काय? असो.
 
‘महाराष्ट्र रामायण’ मध्ये ६२ अध्याय असून १५ हजार, ६८७ एवढी प्रचंड ओवी संख्या आहे. म्हणजे डॉ. साधलेंचे ‘महाराष्ट्र रामायण’ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी (९०१८ ओव्या) पेक्षा दीडपट मोठे आहे, तर संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायण’ (४० हजार ओव्या) पेक्षा लहान आहे. अर्थात, ओवी संख्येला फारसे महत्त्व नाही, संख्यात्मकपेक्षा गुणात्मक दृष्टीने कोणत्याही ग्रंथाचे महत्त्व ठरते. ‘वाल्मिकी रामायणा’प्रमाणेच डॉ.साधलेंचे ‘महाराष्ट्र रामायण’ सात कांडात्मक आहे. पण, त्या कांडांची नावे वेगळी आहेत. ती अशी - १) विवाह कांड २) वनगमन कांड ३) पंचवटी कांड ४) उद्यमकांड ५) हनुमान कांड ६) युद्ध कांड आणि ७) उत्तरकांड रामायणाचे अनेक शब्दावतार आहेत. पण, त्या विविध रामायणात कोठेही ‘पंचवटी कांड’ नाही. डॉ. साधलेंनी पंचवटी स्थानाला विशेष प्राधान्य देऊन स्वतंत्र ‘पंचवटी कांड’ लिहिले आहे. हाच त्यांचा मराठी दृष्टिकोन व बाणा आहे.
 
‘महाराष्ट्र रामायणात’ डॉ. साधले यांनी व्यक्त केलेले महाराष्ट्र भूमी प्रेम विलक्षण आहे. त्यातील काही ओव्या पाहा, ते नाशिक परिसराबद्दल म्हणतात-
ही भूमी, माती, संस्कृती।
रामाची मारुतीची निर्मिती।
ऐशी ऋणभावना चित्ती।
माझ्या सदैव जागती॥
याचे होऊ न देता विस्मरण।
जर मराठा जगेल जीवन।
तो महाराष्ट्राचे महाराष्ट्रपण।
सदैव वर्धिष्णू राहील॥
 
महाराष्ट्र भूमीच्या प्रेमाने ओथंबलेल्या या उपरोक्त ओव्या वाचल्या की, साधलेंच्या ‘महाराष्ट्र रामायणा’चे नाव सार्थ व समर्पक वाटू लागले.
 
डॉ. साधलेंची भूमिका व मते
‘विज्ञापना’मध्ये डॉ. साधले म्हणतात, “माझा हा काव्यसंग्रह, ‘महाराष्ट्र रामायण’ भाविक, धार्मिक ग्रंथ नसून निखळ साहित्य ग्रंथ-काव्य ग्रंथ आहे. याची परंपरा संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायणा’ची वा संतकवी श्रीधरांच्या ‘रामविजय’ची नसून कवी मुक्तेश्वरांशी जुळू शकेल. पण, माझी ही काव्य रचना स्वतंत्र व नवी आहे.”
 
श्रीरामाला डॉ. साधले देव मानत नाहीत, तर फक्त माणूस मानतात, वीर योद्धा, पराक्रमी पुरुष मानतात. यात नवे काही नाही, वाल्मिकींनीही एक मनुष्य, पराक्रमी राजा म्हणून मूळ रामायण लिहिले आहे. ‘मी मनुष्य आहे, देव नाही. दशरथपुत्र आहे,’ असे स्वतःबद्दलचे रामाचे अनेक उद्गार वाल्मिकींनी स्पष्ट-स्वच्छ लिहिले आहेत.
 
एवढेच नव्हे, तर डॉ. साधले पुढे म्हणतात, “राम माझा पिता आहे आणि सीता माता आहे. पण, पित्यापेक्षा माता, रामापेक्षा सीता मला अधिक प्रिय आहे. ‘अंजनीपुत्र हनुमान’ हा आपल्या ‘महाराष्ट्राचा आदिपुरुष’ आहे. एकाच पायसापासून रामाचा कौसल्येपोटी आणि मारुतीचा अंजनीपोटी जन्म झाला, म्हणून राम आणि मारुती भाऊ-भाऊ आहेत. मारुती रामाचा ‘दास’ नव्हता तर बंधू होता, ‘सखा’ होता. मारुती हा ‘मराठी अस्मितेचे शक्तीरूप’ आहे. अशा मारुतीला ‘दास मारुती’ म्हणणे योग्य नाही.” मारुतीबद्दल ते म्हणतात-
 
मारुती रामाचा परमसखा।
सीता माऊलीचा परमाधार।
 
भक्तिरसाला, प्रासादिकतेला माझ्या ग्रंथात शून्य स्थान आहे. वीर रस, करुण रस आणि शृंगार रसाला माझ्या ग्रंथात प्रमुख स्थान आहे. राम-सीता ही माणसे आहेत, त्यांच्या जीवनात शृंगार आहे तो मी न दडविता मुक्तपणे रंगवला आहे. इतरांनी तो दडवून-वगळून टाकला आहे. काम वासना, शृंगार हे मानवी जीवनाचे अभिन्न अंग आहे. माझ्या मते, दशरथांची कैकयीविषयीची कामासक्ती ते रावणाची सीतेबद्दलची कामांध वासनासक्ती, या दोन बिंदूंमध्ये रामायणकथा दडलेली आहे. माझ्या ग्रंथावर शृंगाराच्या अतिरेकाचा आरोप अनेकांनी केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही प्रस्तावनेत स्पष्टपणे तसे मत मांडले आहे आणि त्यानंतर मी अनेक प्रसंगातील शृंगारिक वर्णनाची बरीच काटछाट करून त्यांचा मानही राखला आहे.
 
माझा काव्य ग्रंथ हा ‘पूजा पौरूषाची’ आहे, तिच माझी रामभक्ती आहे. राजा दशरथाचे कामवर्तन, रावणाची काम आसक्ती आणि शूर्पणखेची लक्ष्मण लालसा या पार्श्वभूमीवर रामाचे एक पत्नी असणे, सीतेच्या विरहातही संयमाने राहणे हे गुण रामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ ठरवतात. अशा प्रकारे ‘काम’ आणि ‘पुुरुषार्थ’ या भोवती ‘महाराष्ट्र रामायण’ गुंफलेले आहे.
 
रामासाठी माझे लेखन। रामासाठी माझे चिंतन।
रामासाठी माझे गायन। जीवन रामासाठी ॥३९॥ विवाहकांड
 
‘महाराष्ट्र रामायण’ लिहून झाल्यावर २७ वर्षांनी त्याला प्रकाशनाचे (ग्रंथरूप) भाग्य लाभले. तत्पूर्वी इसवी सन १९६४ ते १९७० अशी सलग पाच वर्षे ते मुंबईतील दै.‘नवशक्ती’मध्ये दर रविवारी क्रमशः प्रकाशित झाले होते. त्यानंतरही कोणी प्रकाशक मिळाला नाही. १९८८ साली ‘श्रीविद्या प्रकाशन’द्वारे हा काव्यग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
 
महाराष्ट्रात, प्राकृतात राजा प्रवरसेन (द्वि) चे ‘सेतूबंध’ हे महाकाव्य पहिले रामायण होय, त्यानंतर संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’, संत रामदासांचे ‘द्विकांडी रामायण’, संतकवी श्रीधरांचे ‘रामविजय’, आर्याकार कवीवर्य मोरोपंतांची ‘१०८ रामायणे’, संत एकनाथांचा नातू मुक्तेश्वराचे ‘संक्षेप रामायण’(१७२२ ओव्यांचे), समर्थ शिष्य परिवारातील संत वेण्णाबाईंचे ‘सीता स्वयंवर’, वेण्णागिरीधर कृत ‘संकेत रामायण’, नामयोगी गोंदवलेकरांचा ‘रामपाठ’ अशी फार मोठी रामकथाकारांची थोर परंपरा आहे. त्यामध्ये आधुनिक काळात ग. दि. माडगूळकरांचे ‘गीत रामायण’ आणि डॉ. आनंद साधलेंचे ‘महाराष्ट्र रामायण’ यांची भर पडलेली आहे. यापैकी बहुतेक रामायणे ही ईश्वरीकृपा, रामकृपा, गुरुकृपेचे आविष्कार आहेत, अशी त्या त्या कवींची श्रद्धा आहे. पण, डॉ. साधले म्हणतात, “ना मला ईश्वरी वरदान लाभले, ना गुरुकृपेचे पाठबळ, ना स्वप्नदृष्टांत झाला. त्यामुळे माझा काव्यग्रंथ-माझे ‘महाराष्ट्र रामायण’ हे एका सामान्य कवीची साहित्यकृती आहे.” पण, हे रामायण महाराष्ट्र भूमीचा, पंचवटीचा गौरव आहे, हे निर्विवाद.
 
रामाच्या रामत्वे पोसले।
ते राष्ट्र महाराष्ट्र झाले॥
 
-विद्याधर ताठे
(लेखक संत साहित्याचे उपासक, अभ्यासक आहेत.)
९८८१९०९७७५