जग संकटात, चाणक्य नितीवर चालणारा पंतप्रधान देशाला हवा!

15 Apr 2024 19:44:28

Amish Tripath



मुंबई (विशेष प्रतिनिधी)
: मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सरकारला का मत देत आहे?, अशा शीर्षक असलेल्या आशयाची एक्स पोस्ट करत प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठींनी थेट समर्थनार्थ भाष्य केले आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यापूर्वी त्यांनी ही पोस्ट करत भाजपला का मतदान करायला हवं? याबद्दल त्यांचं मत मांडलं आहे. ‘Shiva Trilogy’ पुस्तकांचे लेखक अमीश त्रिपाठी आपल्या लेखात म्हणतात की, "राजकारणाबद्दल कुठलचं भाष्य मी करणार नाही, असा काटेकोर नियम मी लावून घेतला होता. मात्र, हा नियम मी आता स्वतःच तोडत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला थेट समर्थन देत आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या माध्यमातून प्रत्येक मत हे मोदींना पोहोचणार आहे.", असेही ते म्हणाले.
मी या निष्कर्षापर्यंत का आलो याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत यायला हवे यासाठी कित्येक कारणे आहेत. कित्येकांनी याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. गोरगरिबांच्या आयुष्यात जबरदस्त सुधारणा, भारताची ठोस आर्थिक स्थिती, वेगाने होणारा पायाभूत सुविधांचा विकास उदा. मुंबईत जिथे मी रहातो आणि वाराणसी जिथे आमचे कुटूंब रहाते. या दोन्ही जागी झपाट्याने होणारा विकास मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. देशाचा आर्थिक विकास आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रावर दिला जाणार भरही याला कारणीभूत आहे. माझे कित्येक वाचक मला सांगतात, त्यातील काहीजण छोट्या युवा आणि छोट्या उद्योगांत कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी विशेष कर्ज आणि अन्य योजना लागू झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर सर्व नागरिकांना कुठल्याही भेदाभावाशिवाय थेट बँक खात्यात कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे.", असे त्यांनी सांगितले.
"मात्र, या शिवाय आणखी एक कारण आहे ते म्हणजे आपण दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजेच १९४५ नंतर शांती आणि वैश्विक व्यवस्थेला पाहत आलो ती व्यवस्था आता संपुष्टात येण्याच्या तयारीत आहे. जगात कित्येक भागात युद्धजन्य स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रेही विखुरत आहेत. जगातील सर्व देश एकत्र येऊन ज्वलंत समस्यांच्या मूळावर घाव घालण्याच्या प्रयत्न कुणालाही करावासा वाटत नाही. उदाहण म्हणजे कोविड महामारी, जागतिक व्यापारातील विसंगती, कर्जाच्या विळख्यात सापडलेले देश ज्यात स्वतः अमेरिका आणि युरोपची श्रीमंत राष्ट्रेसुद्धा आहेत. वातावरणीय बदल, महासत्तांची कमकुवत होत चाललेली शक्ती, समुद्रातील चाच्यांचा उपद्रव युद्धात वापरल्या जाणारी हायटेक शस्त्रास्त्रे या समस्याही आवासून उभ्या आहेत. आपण कधी विचारही केला नसेल की सुएझ कालव्यातील हुथी बंडखोरांनी केलेल्या आक्रमणामुळे जहाजांना पूर्ण आफ्रिकेचा वेढा घालून यावा लागत असेल. जगासाठी ही धोक्याची घंटा आहे आणि कुठलेच प्रमुख देश यासाठी तयारच नाहीत. इतिहास साक्ष आहे की जेव्हा जुनी जागतिक व्यवस्था अस्त पावते तेव्हा एक कठीण काळ येतो आणि संपूर्ण जगात उलथापालथ होते. अशावेळी अशांती आणि युद्ध होणे ही सामान्य बाब आहे.", अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणतात, "आज आपण अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या काळातून जात आहोत. जगातील सर्वच देश या कठीण काळातून बाहेर पडणार की कोलमडणार हा येणारा काळ ठरवणार आहे. येणारी १० वर्षे ही भारताच्या भाग्याचे दशक ठरणार आहे. भारतासाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण याच काळात कित्येक गरीब देशांना घेऊन आपण पुढे जाणार आहोत. अशा नाजूक काळात राष्ट्राच्या नेत्याची भूमिका महत्त्वाची ठरते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील शीर्षस्थ नेतृत्त्व अशा गोष्टी हाताळण्यासाठी सिद्ध होते. त्यासाठीच १९४५ नंतर जागतिक स्तरावर अमेरिकेच्या समृद्धी आणि शक्तीत त्यांच्या राष्ट्रपतींचे मोठे योगदान राहिले."
अमिश त्रिपाठींनी जागतिक स्तरावरील नाजूक स्थितीत पंतप्रधानपदी बसणाऱ्या व्यक्तीकडे नेमके काय गुण असायला हवेत? यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. "ज्याच्याकडे पूर्ण एकाग्रता आणि उत्साहही तितकाच असायला हवा. जो अनुभवी आणि कार्यकुशलही हवा. जो सर्वात जास्त मेहनतही करेल. याच मेहनतीने ते देशाच्या जनतेला सोबत काम करण्याचे आणि पाऊल पुढे ठेवण्याचे प्रोत्साहन देत राहिल. जो जगातील बलाढ्य देशांपुढे भारताचे हित जपण्यासाठी प्रयत्नशील राहिल. जिथे प्रेमाने काम होत असेल तिथे प्रेमळ मनाने आणि जिथे कठोर भूमिका घ्यावी लागेल तिथे भय उत्पन्न करुन काम पूर्णत्वास येईल, अशाच पंतप्रधानाची गरज देशाला आहे.", असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "तुमच्यापैकी कुणी मोदींचे शुभचिंतक आहेत, काही जण त्यांचे समर्थक नसतीलही, अशा मित्रांना मी विनंती करू इच्छितो की, हा एक कठीण काळ आहे. जिथे देशाला मजबूत सरकारची गरज आहे. देशाला येणाऱ्या काळात प्रगतीपथावर घेऊन जाईल. जर भारत शक्तीशाली बनला तरच देशाची ताकद वाढणार आहे आणि जर तो कमजोर बनला, १९५० ते १९८० च्या दशकात ही गोष्ट झआली होती तर प्रत्येक भारतीयाची ताकद कमी होणार आहे. गेल्या काही वर्षांत आपली स्थिती ही तगडी होती. त्यामुळेच आपण काही महाशक्तींच्या दबावात न येता राष्ट्रहिताचे निर्णय घेऊ शकलो. रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करू शकलो ज्यामुळे महागाई आटोक्यात राहू शकली."
"आपला देश आणि संस्कृतीसाठी अशा नाजूक स्थितीत चाणक्य नितीच्या आधारावर चालणारा राष्ट्रीय शीर्षस्थ नेताच हवा. यासाठी पुढील सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा तिसरा कार्यकाळ आणखी चांगली कामे करण्यासाठी द्यायला हवा. मी माझ्या लोकसभेचे मत मोदींच्याच उमेदवाराला देणार, मला आशा आहे की तुम्हीही त्यांच्याच उमेदवारांना समर्थन द्याल," अशी अपेक्षा त्यांनी भारतीय नागरिकांकडून ठेवली आहे.


Powered By Sangraha 9.0