युवा, शेतकरी आणि गरीबांसाठी भाजपचा जाहीरनामा समर्पित : देवेंद्र फडणवीस

15 Apr 2024 12:01:21
 
Bawankule & Fadanvis
 
नागपूर : युवा, शेतकरी आणि गरीबांसाठी भाजपचा जाहीरनामा समर्पित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित लोकसभा निवडणूकांसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध करण्यात आले. यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली असून यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपचं संकल्पपत्र हे कागदी नसून ती मोदीजींची गॅरंटी आहे. देशातल्या सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प आणि त्यासाठीच्या संधी मोदींच्या गॅरंटीच्या संकल्पपत्रात देण्यात आली आहे. हे संकल्पपत्र महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला समर्पित करणार असून त्यांचा मोदींच्या गॅरंटीवर सर्वात जास्त विश्वास आहे, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे निश्चितपणे देशातील नागरिक तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात मोदीजींचंच सरकार निवडून आणतील."
 
"काँग्रेसचा जाहीरनामा हा नापास जाहीरनामा आहे. यापूर्वी काँग्रेस छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल आणि आता कर्नाटकमध्ये निवडून आली होती. पण त्यांनी जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही. त्यांच्याकरिता जाहीरनामा हा कागद आहे आणि आमच्यासाठी ती मोदीजींची गॅरंटी आहे," असे ते म्हणाले.
 
काँग्रेस नेते राहूल गांधींना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "मी राहूल गांधींना दोष देणार नाही कारण वाचत नाहीत. त्यामुळे जाहीरनाम्यात काय आलं आहे हे त्यांना माहिती नाही. रोजगाराच्या संधी, लोकांना कशा प्रकारे फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टी यात आलेल्या आहेत. त्यामुळे जर राहूल गांधींनी आधी वाचून आपलं मत व्यक्त केलं असतं तर आम्ही त्यांना उत्तर दिलं असतं," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0