माती संवर्धनाची गरज

    14-Apr-2024
Total Views | 34

मातीची धूप अर्थात ‘सॉईल इरोजन’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अनेक मानवी कारणांमळे यावर मोठा परिणाम होताना दिसतो. जमिनीची होणारी धूप शेती पिकांवर तसेच इतर अनेक घटांवर परिणाम करते. याच विषयावर प्रकाश टाकत माती संवर्धनाची गरज स्पष्ट करणारा हा लेख...



soil erosion
मातीची धूप ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. ज्यामुळे शेती, जंगले आणि कुरणांसह नैसर्गिक परिसंस्थेची उत्पादकता धोक्यात आली आहे. मातीच नाहीशी झाली, तर या सगळ्या परिसंस्था काम कशा करतील बरे? आता मातीची धूप होणे अर्थात, ‘सॉईल इरोजन’ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, मानवी क्रियाकलापांचा या प्रक्रियेवरदेखील परिणाम पडतोच आहे की. याच्या परिणामाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. माती, ही दुर्दैवाने पर्यावरण संरक्षणातील दुर्लक्षित घटकांपैकी एक आहे जी सर्वसाधारणपणे गृहीत धरली जाते. पण ही धरती, ही माती जी आपल्या सर्वांना पोसते, तिलाही काही विशेष काळजीची गरज असतेच. मातीची धूप होण्याचे वाढलेले दर हे आपल्याला निसर्गाने दिलेला संकेत आहे की, आपण मातीची पुरेशी काळजी घेत नाही आहोत आणि आपल्या भारतातील माती तर आपल्याला हे फार पूर्वीपासून सांगत आली आहे.


आपल्या देशातील मातीची धूप होण्याचा सरासरी दर प्रति हेक्टर 16.35 टन प्रति वर्ष इतका आहे. हा कमी का जास्त? तर, जागतिक सरासरी फक्त 2.40 टन प्रति हेक्टर प्रति वर्ष इतकीच आहे बरं का! भारतातील 30 टक्के भूभागात किरकोळ मातीची धूप होते, तर तीन टक्के भूभागत भयंकर प्रमाणात पृष्ठभागावरील मातीची धूप होत असल्याचे निदर्शनात आले आहे आणि याच होणार्‍या धूपेने भारतातील जोशीमठसारखी घटना होत असल्याचे कळले आहे. अशा अनेक आपत्ती आपल्या भारतात होत आहेत. ज्यासाठी जलदगतीने होणारी मातीची धूप महत्त्वाचे कारण आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरे हे मातीची धूप होणारा देशातील सर्वांत मोठे हॉटस्पॉट बनला आहे. तसेच, ओडिशादेखील आपत्तीजनक धूप होण्याचे आणखी एक हॉटस्पॉट बनला आहे. वर्षानुवर्ष येणारा ब्रह्मपुत्रा नदीचा पूर याच तर गोष्टीने होतो ना!


एका नवीन अभ्यासात भारताच्या मातीच्या आरोग्यासाठी चिंताजनक बाब समोर आली आहे. वरील मांडलेले निष्कर्ष याच संशोधनात समोर आले आहेत. ‘भू-स्थानिक मॉडेलिंग आणि भारतातील मातीची होणारी धूप याचे मॅपिंग’ असे शीर्षक असलेले हे संशोधन, प्रथमच, संपूर्ण भारताच्या आधारावर मातीची धूप वर्गीकृत करायचा प्रयत्न करत आहे. टॉप-सॉईल म्हणजेच मातीचा सर्वांत वरचा थर हा शेतीसाठी महत्त्वाचा असतो. कारण त्यात वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्व आणि आर्द्रता असते. मुख्यतः मातीची धूप ही या थाराची होते. या थराची धूप झाल्याने, वनस्पतींची वाढ लक्षणीय प्रमाणात खुंटते आणि शेतातील पीक उत्पादनातदेखील उल्लेखनीय घट होते.



soil erosion

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’, दिल्ली येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील साहाय्यक प्राध्यापक आणि येथील हायड्रोसेन्स लॅबचे मुख्य अन्वेषक आणि अभ्यासाचे लेखक मानवेंद्र सहारिया यांच्या मते, मातीची धूप नक्की किती होते आहे हे समजून घेण्यासाठी विविध स्तरांचे वर्गीकरण करणे गरजेचे होते. भारताकडे स्वतःचे असे मातीची धूप होण्याच्या प्रमाणाचे वर्गीकरण नाही, म्हणून एक प्रकारे, हा पहिलाच प्रयत्न आहे. देशभरात मातीची धूप किती होत आहे, याचा सर्व समाविष्ट दृष्टिकोन या अभ्यासातून दिसून येतो.


अभ्यासानुसार देशातील मातीची धूप होण्याचे सर्वांत मोठे ठिकाण आसाममधीलब्रह्मपुत्रा खोरे आहे. डेटा दर्शवितो की, आसाममध्ये जवळपास 300 चौरस किलोमीटर किंवा त्याच्या पृष्ठभागाच्या तब्बल 31 टक्के जमिनीची ‘आपत्तीजनक पातळी’ (Catastrophic Level) धूप होत आहे.


मातीची धूप ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, भारतात होणारी सघन शेती (Intensive Farming), जमिनीच्या वापरत होणारे अनैसर्गिक बदल आणि अनियंत्रित जंगलतोड यांचा समावेश असलेल्या क्रियाकलापांमुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात शहरीकरण, शहरी क्षेत्राचा विस्तार, पर्यटन विकास, रस्ते बांधणी आणि इतर अशा बर्‍याच गोष्टींची भर पडते. जेव्हा माती, वारा, जोरदार पाऊस, वाहते पाणी,यासारख्या नैसर्गिक घटकांच्या संपर्कात येते. तेव्हा मातीची धूप वाढते. वर नमूद केलेले मानवी कृत्य अशा घटना आहेत.ज्यामध्ये मातीचा वरचा थर, त्यांचे झाडांचे छत्र हरवल्याने स्वतःचे संरक्षण गमावतो आणि त्यामुळे या थरची अनियंत्रित धूप होते.


‘युनायटेड नेशन्स फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ (FAO) च्या एका प्रकाशित अहवालाच्या मते, अशा प्रकारच्या मानवी क्रियाकलापांमुळे मातीची धूप होण्याचा वेग तब्बल एक हजार पटीने वाढतो. जागतिक इकोसिस्टमच्या आरोग्यासाठी अविभाज्य घटक असलेली ही माती, संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते, वनस्पतींची वाढ सुलभ करते, महत्त्वपूर्ण पोषक तत्व प्रदान करते आणि कोट्यवधी सूक्ष्मजीवांचा सांभाळ करते. याचाच एकत्रित परिणाम म्हणजे सुलभ मानवी जीवन आणि संतुलित वातावरण होय. अनियंत्रित मातीची धूप झाल्याचे अनेक परिणाम आपण भोगत आहोतच. ज्यात घटलेली कृषी उत्पादकता, खराब झालेली परिसंस्था आणि कमी झालेली जैवविविधता यांचादेखील समावेश होतो. शिवाय, भूस्खलन, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये मातीची धूप मोठे योगदान देते आणि हीच अनियंत्रित धूप शेवटी, मानवी लोकसंख्या विस्थापितदेखील करू शकते हे आपण जोशीमठच्या घटनेच्या वेळी अनुभवले आहेच की.


 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून, भारतातील अन्न उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे मातीच्या आरोग्य आणि संवर्धनाला प्राधान्य न देणार्‍या सघन शेती पद्धतींचा व्यापक वापर झाला आहे. जरी सघन शेती नफा मिळवताना, अन्न उत्पादनांच्या किमती कमी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त संभाव्य उत्पादन देत असली, तरी ती शाश्वत नाही हेदेखील तितकाच खरं आहे. मोठ्या प्रमाणात कृत्रिम खतांचा वापर आणि कीटकनाशके केवळ पाणी आणि हवा प्रदूषित करत नाहीत, तर मातीदेखील प्रदूषित करतात. याव्यतिरिक्त, सघन शेती पीक सिंचन पद्धती लागू करते. ज्यात गोड्या पाण्याच्या जागतिक मानवी वापराच्या सुमारे 70 टक्के वाटा वापरला जातो आहे. दुर्दैवाने, सगळ्याच शेतकर्‍यांना शाश्वत सिंचन प्रक्रिया वापरणे परवडतेच असे नाही, तसेच त्या संबंधी कित्येकांना माहिती देखील नसते. परिणामी, चुकीच्या पद्धतीने सघन शेती केल्याने, जमिनीचा कस कमी होणे, कृत्रिम खताची जास्त गरज पडणे या घटनांची वाढ होते व मातीची योग्य निगा घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे, अजून धूप होण्याचा दर वाढतो व धूप झाल्याने माती पोषक तत्वे गमावते आणि उत्पादन अजून कमी होते. हे एक दुष्टचक्र आहे, यातून फक्त सुज्ञ पद्धतीने केलेली शाश्वत शेतीच बाहेर पडण्यास मदत करू शकते, तर ईशान्येकडील राज्यांसाठी आणि संपूर्ण भारतासाठी, इतक्या जास्त प्रमाणात मातीची धूप होण्याचे काय परिणाम होतील? युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, सहा सेंटीमीटर खोली असलेला, दोन-तीन सेंटीमीटर टॉपसॉईल असलेल्या मातीला परत बनायला तब्बल एक हजार वर्षे लागू शकतात. इतका वेळ आपल्याकडे आहे का?


या नवीन अभ्यासाने मातीची धूप किती होते आहे ते मोजण्यासाठी, सहा स्तर तयार केले आहेत. ज्यात किरकोळ (Minor) ते आपत्तीजनक (Catastrophic) अशा चढत्या क्रमाने स्तर मांडले आहेत. एका वर्षात एका हेक्टरमध्ये 100 टन पेक्षा जास्त मातीची धूप झाली, तर त्या जागेला ‘आपत्तीजनक’ म्हणून वर्गीकृत केले जाणार आहे. भारत हा एक शेतीवर अवलंबून असलेला देश असल्याने मातीची धूप आणि मातीचे आरोग्य यावर लक्ष ठेवणे व अशा प्रकारे वर्गीकरण करणे, मातीच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे.


ब्रह्मपुत्रा खोर्‍याव्यतिरिक्त, हिमालयाच्या खालच्या भागात मोरेन किंवा सैल माती आणि अत्यंत अस्थिर उतार आहेत. हा प्रदेशदेखील, आपत्तीजनक म्हणून वर्गीकृत केला गेला आहे. हा प्रदेश काश्मीर खोर्‍यापासून हिमाचल आणि उत्तराखंडच्या दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत पसरलेला आहे. तसेच सीमा ओलांडून नेपाळमध्येदेखील हा धूप होण्यास प्रवण प्रदेश पसरलेला आहे. स्थलाकृतिक आणि जैवविविधतेच्या बाबतीत हिमालय आणि ब्रह्मपुत्रा खोर्‍यांपेक्षा स्पष्टपणे भिन्न असलेला ओडिशादेखील आपत्तीजनक धूप होण्याचे आणखी एक केंद्र या अभ्यासात नोंदले आहे. हे धूप प्रवण क्षेत्र, महानदीच्या दक्षिणेकडील भागापासून, राज्याच्या हिरवेगार अच्छादन आणि नैसर्गिक जंगलांच्या पश्चिम सीमेवरून आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील भागापर्यंत पसरते, तर ही होणारी अनियंत्रित धूप, धोक्याची घंटा आहे. अजून एका पद्धतीने, निसर्ग आपल्याला, मानवाला सावध करायचा प्रयत्न करतो आहे. आता तरी आपण सावध होण्याची आणि शाश्वत मार्ग ताबडतोब अवलंबण्याची गरज आहे असे मला वाटते. धूप कमी करण्याचा एक अत्यंत सोपा मार्ग म्हणजे, झाडं लावणे आणि झाड जगवणे. या संकटाविरूद्ध आपला खारीचा वाटा आपण प्रत्येकजण उचलू शकतो का?

- डॉ. मयूरेश जोशी




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121