महाधनेशाच्या पिल्लाची भरारी!

14 Apr 2024 21:37:45



great hornbill




मुंबई (विशेष प्रतिनिधी):
पश्चिम घाटात यंदा महाधनेश (Hornbill) पक्ष्यांच्या वीण अयशस्वी झाल्याच्या नोंदी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशातच संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात महाधनेशाच्या (Hornbill) पुढच्या पिढीने जन्म घेतला आहे. देवरुखच्या ’सह्याद्री संकल्प सोसायटी’ने धनेश (Hornbill) संवर्धन प्रक्लपाअंतर्गत देवळे ग्रामस्थांच्या मदतीने संरक्षित केलेल्या घरट्यामधून नवजात पिल्लाने आकाशात भरारी घेतली आहे. मात्र, तालुक्यातूनदेखील महाधनेश (Hornbill) पक्ष्यांच्या वीण अयशस्वी झाल्याच्या अनेक नोंदी झाल्या आहेत.

महाधनेश (Hornbill) या पक्ष्याला कोकणात गरुड, माडगरुड, ककणेर अशा विविध नावांनी ओळखले जाते. डिसेंबर ते एप्रिल महिन्यादरम्यान या पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. साधारण 120 ते 140 दिवसांचा हा कालावधी असतो. महाधनेशाच्या जोडीची मिलनाची क्रिया झाल्यानंतर मादी स्वत:ला साधारण 100 ते 105 दिवसांसाठी झाडाच्या ढोलीत कोंडून घेते. या काळात ती अंडी उबवण्याचे काम करते. मादी ढोलीतून बाहेर पडल्यानंतर साधारण दोन आठवड्यानंतर त्यामधून पिल्लू बाहेर पडते. या सर्व प्रक्रियेत यंदा काही बदल झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहेत. यंदा दक्षिण पश्चिम घाटात डिसेंबरऐवजी जानेवारी महिन्यात महाधनेशाचा विणीचा हंगाम सुरू झाल्याच्या नोंदी संशोधकांनी नोंदवल्या असून हा घटनाक्रम कोकणातही पाहायला मिळाल्याचे, ‘सह्याद्री संकल्प’ सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.


great hornbill

यंदा ’सह्याद्री संकल्प सोसायटी’मार्फत गावकर्‍यांच्या मदतीने संगमेश्वर तालुक्यातील धनेश (Hornbill) प्रजातीच्या 30 घरट्यांचे संरक्षण करण्यात येत आहे. यापैकी संरक्षित केलेल्या महाधनेशाच्या 12 घरट्यांपैकी दोन घरट्यांवर सोसायटीमार्फत कॅमेरा बसवून लक्ष ठेवण्यात आले. यातील देवळे गावातील घरट्यामध्ये जन्मलेल्या नवजात पिल्लाने शुक्रवार, दि. 12 एप्रिल रोजी आकाशात भरारी घेतली. येथील गुळआंब्याच्या झाडावरील ढोलीत डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मादीने प्रवेश केला. सोसायटीने 80 फुटांवर असणार्‍या या ढोलीवर कॅमेरा बसवून धनेशाच्या (Hornbill) प्रजनन प्रक्रियेचे निरीक्षण केले. यावेळी पिल्लाच्या जन्मानंतर नर पक्ष्याने त्याला खाद्य म्हणून तांबट पक्षी आणि उंदरासारखे प्राणी आणल्याचे विशेष निरीक्षण आम्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून टिपल्याचे प्रतीक मोरे यांनी सांगितले.
 


सोसायटीने संरक्षित केलेल्या चार गावांमधील महाधनेशाची वीण अयशस्वी झाली. यामधील एका गावात दरवर्षी महाधनेशाची मादी ही तिच्या ठरलेल्या ढोलीत डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात प्रवेश करत असे, मात्र यंदा या मादीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढोलीत प्रवेश केला आणि विहित प्रजनन कालावधीच्या पूर्वीच ती घरट्यामधून बाहेर पडल्याचे निरीक्षण मोरे यांनी नोंदवले. ढोलीच्या तपासणीअंती सोसायटीच्या सदस्यांना ढोलीत खराब झालेले अंडे सापडले. या ढोलीवरदेखील कॅमेरा बसवण्यात आला होता.

देवळेमधील घटनाक्रम
- डिसेंबर दुसर्‍या आठवड्यात मादीचा ढोलीत प्रवेश
- सोसायटीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढोलीवर कॅमेरा बसवला
- 18 मार्च रोजी मादी ढोलीतून बाहेर आली
- 12 एप्रिल रोजी पिल्लू ढोलीतून बाहेर पडले
- 13 एप्रिल रोजी पिल्लू उडून गेले

“धनेश पक्ष्यांच्या जीवनकालामध्ये विणीचा हंगाम खूप महत्त्वाचा असतो. ज्यामध्ये जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत घरटी असतात. यंदाच्या वर्षी दक्षिणेकडील पश्चिम घाटात घरटी उशिराने सुरू झाल्याचे आढळले. तसेच अनेक ठिकाणी सुरू झालेल्या घरट्यातून माद्या या विहित प्रजनन काळापेक्षा खूपच लवकर बाहेर पडल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, याची नेमकी कारणे आपल्याला माहीत नाहीत. पश्चिम घाटाइतक्या मोठ्या भौगोलिक प्रदेशात घरट्यांचा एकत्रित अभ्यास होणे महत्त्वाचे ठरू शकेल. अधिवास नष्टता आणि तापमान वाढीमुळे जर धनेशाच्या नैसर्गिक जीवनक्रमात काही बदल होत असतील, तर त्यावर सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

 - पूजा पवार, धनेश पक्षी संशोधक


गावकर्‍यांचा उत्साही सहभाग
'सह्याद्री संकल्प सोसायटी’ने राबवलेल्या धनेश संवर्धन प्रकल्पात देवळे गावातील गावकर्‍यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. पोस्टमन म्हणून नोकरी केलेले गावकरी भरत चव्हाण यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. महेंद्र चव्हाण, निलेश कोळवणकर, गजानन काळोखे यांचेदेखील या कार्यात सहकार्य मिळाले. तसेच देवळे ग्रामपंचायत, रवळनाथ मंदिर व्यवस्थापन समितीनेदेखील या प्रकल्पासाठी पुरेपूर मदत केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावात धनेशमित्रांची फौज तयार करण्यात सोसायटीला यश मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0