प्रसार... मतदान जागृतीचा

12 Apr 2024 21:51:46

election
 
सध्या निवडणुकांचा ज्वर आहे. प्रचाराचे संदर्भही बदलले आहेत. तथापि, लोकशाहीतील ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असल्याने, त्यास कोणतेही गालबोट लागता कामा नये आणि निवडणुका आपल्या अवाढव्य देशात सुरळीत पार पडाव्यात, म्हणून कालानुरूप निवडणूक आयोगाने देखील उपाययोजना केल्या आहेत. त्यांच्या या प्रसार कार्याची प्रशंसा होत आहे, तर दुसरीकडे प्रचारकार्य मात्र काही जणांनी वेगळ्याच वाटेवर आणून ठेवलेले दिसते. एकीकडे राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराची पद्धती कालानुरूप बदलली असताना, आयोगाने देखील निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करावे, यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत आणि तसे प्रयत्नदेखील सुरू केले आहेत. रोज या निवडणूक तयारीची कामे करीत असताना, आयोगाकडून मतदान जागृतीसाठी अनोखे कार्यक्रम राबविले जात आहेत. आपल्या देशातील आजतागायतच्या लोकसभेच्या निवडणुका बघितल्या, तर त्यात एकूण मतदारांपैकी ८० टक्क्यांच्यावर मतदान झाल्याचे आढळून येत नाही. वस्तूतः जो लोकप्रतिनिधी मतदार निवडून देतात, त्याला संसदेत पाठवून, देशाच्या विकासासाठी प्रयत्न तर करावेच लागतात; मात्र या देशाची संविधानिक चौकटदेखील अबाधित राखून कार्य करायचे असते. अशावेळी तेथे योग्य उमेदवार पाठवून, मतदारांनी हे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे अगत्याचे असते. नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करताना, महिला मतदारांसाठी विशेष मतदान केंद्रांची उभारणी करून, आयोगाने यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे मतदान जागृतीच्या या कार्यात आयोगाच्या कार्याचे योगदान मोठे आहे. शिवाय अन्य संघटनादेखील यासाठी कार्यरत असून, लोकांना त्यासाठी जागरूक करीत असल्याचे दिसून येते. निवडणुकीत लोकांच्या मताला किती महत्त्व आहे, हे प्रचारात काही-बाही बोलणार्‍या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी पुरेसे आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सर्वात वयोवृद्ध नागरिकही पुढाकार घेतात. या वृद्ध मतदारांचा आदर्श घेत, नवमतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केले जात आहे. काही मतदार दिव्यांग असल्याने, आजारपणामुळे घराबाहेर पडू न शकणारे किंवा अधिक वयामुळे बाहेर न पडू शकणार्‍या पात्र मतदारांसाठी आयोगाने विशेष सुविधा केल्या आहेत, हे कौतुकास्पदच!
प्रचार...
एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी आग्रही असताना, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवारदेखील काही ठिकाणी प्रचार करू लागले आहेत. त्यातून त्यांचा राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत आणि एकूणच मतदाराला केवळ खेळ म्हणून वापरण्याच्या प्रवृत्तीबाबत मतदारांनीच आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. रोज सकाळी उठून टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर काहीबाही बरळणार्‍या नेत्याबाबत जी मतदारांना विशेषतः सूज्ञ लोकांना घृणा वाटू लागली, तशीच या काहीबाही प्रचार करणार्‍यांबाबत देखील लोक संताप व्यक्त करतील, यात संदेह नको. विशेष म्हणजे, परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच एका वक्तव्याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,’ असे मार्मिक आणि राज्याच्या एकूणच राजकारणाची शोभा वाढेल, असे उत्तर दिल्याने, आरोप करणार्‍यांची तोंडे आपोआपच बंद झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, जे लोक दिवस-रात्र महायुतीवर तोंडसुख घेत असतात, त्यापैकी एक असलेल्या नाना पटोलेंना त्यांच्यावर उद्भवलेल्या प्रसंगी देवेंद्रजींनी स्वतः विचारपूस करून, एका उत्तम राजकीय संस्कृतीचा आदर्श उभा केला आहे. त्यामुळे प्रचाराची हीन पातळी गाठणार्‍यांची तोंडे आपोआपच बंद झाली आहेत. एकीकडे अशा चांगल्या राजकारण्यांचे कर्तृत्व जनतेला दिसत असताना, दुष्प्रचार करणार्‍यांच्याची तोंडं बघायची की नाही, याचा फैसला करण्याचा निर्धार जनतेने केला असेल, असे मानायला हरकत नाही. आता बघा, एका उमेदवाराच्या घरातील भांडण चक्क भर प्रचारात आणून, मुद्दा बनविण्याचा खटाटोप एका राजकीय पक्षाने चालवलेला दिसतो. त्यामुळे राजकारणातील नैतिकतेचा स्तर त्यांनी किती खालच्या पातळीवर आणून ठेवला आहे, हे सिद्ध होते.विशेष म्हणजे, या राजकीय पक्षाचे लोक एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात दरारा असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आहेत आणि तेच आता या स्तराला जाऊन, गलिच्छ राजकारण करीत आहेत. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित होत आहे, त्यामुळे अशा प्रचाराला सूज्ञ जनता भीक घालणार नाही, एवढे नक्की!

-अतुल तांदळीकर 
Powered By Sangraha 9.0