मुंबई : मी सातत्याने माझ्या पक्षश्रेष्ठींना माझं म्हणणं कळवलं असून जागावाटपामध्ये आम्हाला आमचा हक्क मिळायला हवा, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केले आहे. बुधवारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, अध्यक्षा वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित झाल्या नाही. तसेच त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत होता. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आता त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "मी सातत्याने माझ्या पक्षश्रेष्ठींना माझं म्हणणं कळवलं होतं. जागावाटपामध्ये आम्हाला आमचा हक्क मिळायला हवा, हीच माझी अपेक्षा होती. भलेही आमचे काही नेते गेले असले तरी मुंबईत आमची पक्षसंघटना मजबूत आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईत कमीत कमी ३ किंवा २ जागा मिळावा, अशी माझी अपेक्षा होती. हे आम्ही पक्षाला सांगितलं असून आता पक्षाने भूमिका घेतलेली आहे. पक्षाने घेतलेल्या भूमिकेचा आम्ही स्विकार करतो."
मुंबईतील जागांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "मुंबईचं अस्तित्व वेगळं आहे. पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्यासुद्धा काही अपेक्षा असतात. त्यामुळे पक्षाने महाराष्ट्राबद्दल कठोर भुमिका घ्यायला हवी होती. हे आम्ही पक्षश्रेष्ठींनाही सांगितलं होतं. काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही दक्षिण मध्य मुंबईत कार्यक्रम केलेत. उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्वमध्येही आमचं मोठं संघटन आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, आम्हाला तिकीट मिळायला हवं. पण पक्षाने निर्णय घेतल्यानंतर काही गोष्टी स्विकाराव्या लागतात. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु," असेही त्या म्हणाल्या.