प्रतीक गांधी आणि पत्रलेखा दिसणार प्रमुख भूमिकेत
मुंबई : समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त 'फुले' (Phule Movie) चित्रपटाचे नवीन पोस्टर भेटीला आले आहे. फुले चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा सावित्रिबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. स्त्री शिक्षणाचा पायंडा रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे आज समाजात महिलांना मुक्तपणे शिक्षण घेता येते. या चित्रपटात फुले दाम्पत्याचा प्रवास दाखवला जाणार आहे. ‘फुले’ (Phule Movie) चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी केले आहे.
'फुले' चित्रपटाबद्दल भावना व्यक्त करताना अनंत महादेवन म्हणाले, “महात्मा ज्योतिबा फुले यांनी जात आणि लिंगभेदाविरुद्ध लढा दिला, जो दुर्दैवानं आजही कायम आहे. आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संभाषण पुन्हा सुरू करणं हे माझं ध्येय आहे."
फुले चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा सोबत जीत रायदत्त, सुशील पांडे, विशाल अर्जुन, विशाल तिवारी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहिर केली नसल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली महात्मा फुलेंना आदरांजली. “शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांनी समाजावर अमिट छाप सोडली आहे. आज आम्ही थोर महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो".