सिव्हील रुग्णालयात १० महिन्यात ३०४० शस्त्रक्रिया; गरजु महिलांना रुग्णालय ठरले आधार

11 Apr 2024 17:55:34
civil hospital
 
ठाणे: खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत होत असून गेल्या दहा महिन्यात विविध प्रकारच्या ३०४० शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या असून, त्या खालोखाल डोळे, दंत अस्थी रोग, कान, नाक, इत्यादी वरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
 
वागळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हील रुग्णालयात उपचार करताना, रुग्णांची आबाळ होणार नाही, याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. एका महिन्याला सरासरी ३०० ते ३२५ शस्त्रक्रिया पार पडत आहेत. जून ते मार्च २०२४ या दहा महिन्यापर्यंत ३०४० रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
 
हे वाटलंत का ?- रजनीकांतच्या 'थलायवर' मध्ये बिग बींनंतर आता शाहरुख खानची एन्ट्री
 
रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून, मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. गेल्या १० महिन्यात केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या एकुण १ हजार ६२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सोबतच डोळ्यांच्या ४२४, दंत २२९, अस्थी आजाराच्या २०० यासोबतच पोट, कान, नाक, आदींच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
 
शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयात होतात. गेल्या नऊ महिन्यात एकूण ३ हजार ४० शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी केल्या आहेत. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया होत असुन दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. असं डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक ) यांनी म्हटलं आहे.

Powered By Sangraha 9.0