"मोदींनी थोडी नजर वळवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस निघेल!"

10 Apr 2024 19:24:02

Eknath Shinde 
 
नागपूर : मोदींनी थोडी नजर वळवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस निघेल, अशी टीका मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली आहे. बुधवारी रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाविजय संकल्प सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मोदीजी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं सुराज्य निर्माण करत आहेत. त्यामुळे आता हर घर मोदी नव्हे तर मन मन मोदी आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला विरोधी पक्ष मोदी द्वेषाने पीडित आहे. ज्यांचं आयुष्य फक्त भ्रष्टाचार, घोटाळे आणि पैसे मोजण्यात गेलं त्यांना मोदींवर आरोप करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे 'अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ' अशी त्यांची अवस्था आहे."
 
हे वाचलंत का? -  उत्तर मुंबईत काँग्रेसची अवस्था 'उमेदवार मिळेल का उमेदवार'!
 
"विरोधक मोदीजींवर आरोप करतात. पण ते त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. मात्र, त्यांची थोडी जरी नजर वळली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस निघेल. विरोधक कितीही टीका करत असले तरी मोदीजी सर्वच्या सर्व रेकॉर्ड तोडणार आहेत. एनडीएकडे आत्मविश्वास आहे तर इंडी आघाडीजवळ अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो तर अहंकार हा विनाशाकडे घेऊन जातो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "प्रभु रामचंद्राने अहंकारी रावणाचा नाश केला होता. या रामटेकला प्रतिअयोध्या असं म्हणतात. याठिकाणी देशातील जनता इंडी आघाडीच्या अहंकाराची लंका जळून खाक करुन टाकेल, असा विश्वास आहे. त्यांच्याकडे ना नीती आहे, ना निर्णय आहे. त्यांचा अजेंडा भ्रष्टाचार प्रथम हाच आहे. पण मोदीजींचा अजेंडा हा देशाचा विकास आणि नेशन फर्स्ट आहे. त्यामुळे विरोधक सत्तेपासून दूर आहेत. सत्तेसाठी झालेली साप आणि मुंगुसाची मैत्री जनतेला चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचं काम आपल्याला करायचं," असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0