जलास संजीवन राखू या!

    01-Apr-2024
Total Views |
सातत्याने दूषित (water pollution) होणार्‍या नद्या आणि इतर जलाशये याची कारणमीमांसा करणारा तसेच त्यामुळे अनेक प्रजातींचा होणारा र्‍हास यावर प्रकाश टाकणारा, प्रदूषण (water pollution) आणि अधिवासाचे होणारे नुकसान विशद करणारा हा लेख...



water pollution

नद्या या आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्राचीन काळात मानवी उत्क्रांतीदेखील नद्यांच्या काठाने झाली. पूर्वीच्या पारंपरिक पिढ्या स्नान करतानादेखील
गङ्गेच यमुने चैव गोदावरि सरस्वती।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु॥

हा मंत्र म्हणून आपल्या गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, कावेरी, नर्मदा आणि नंतर लुप्त झालेल्या सरस्वतीच्या पवित्र जलाची आठवण करून, माझ्या स्नानाच्या पाण्यातदेखील तुमचे जल असावे, अशा आशयाचे पुटपुटत असत.
स्नानाची सांगता करण्याची आपली ही पद्धत होती. निसर्गासमोर लीन असणार्‍यांची ती पिढी होती. आजपर्यंत बंगळुरुसारख्या शहरात अर्भकांच्या स्नानालादेखील बिसलेरी पाण्याचा वापर करावा लागतो. एकेकाळी सुंदर तलावांचे शहर म्हणून ज्ञात असलेल्या या ठिकाणाचा ‘आईटीच्या’ धुमाकुळाने चेहरा-मोहरा बदलला.

तशीच आज सगळ्या भारतीय नद्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे. मुंबईत तर नद्या कोठे होत्या हे आताच्या पिढीला ज्ञातही नाही. माहिमहून समुद्रात घुसणारी मिठी आणि मालाड येथे सागराला मिळणारी दहिसर नदी अतिवृष्टीच्या रेन बॉम्बमुळे कधी कधी फुगून आपले अस्तित्व दाखवून देतात. याशिवाय ओशिवरा आणि पोईसर या अनुक्रमे मार्वे आणि ठाणे खाडीतून अरबी समुद्राला मिळणार्‍या नद्या आता केवळ घाणेरड्या नाल्याच्या स्वरुपात दिसतात. धारावीच्या अफाट प्रदूषणाने घातलेली गळामिठी सोडवत दुर्गंधीयुक्त मिठी रिक्लेमेशनच्या जंगलातून आणि वाटेतील अडवणूक पार करत कशीबशी अरबी सागरात लुप्त होते. असे म्हणतात की, एकेकाळी ख्रिस्ती बांधव याच मिठीतून, वसईहून होडी वल्हवत मौतमावलीच्या (माउंट मेरी) दर्शनाला वांद्रेला यायचे.



water pollution

आपल्या संस्कृतीतल्या खास अशा गंगेच्या, यमुनेच्या किनार्‍यांनी 50 कोटी लोक निवास करत आहेत. आपल्या सर्व गरजांसाठी पूर्णतः याच गंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहणारे लोक या पवित्र नद्यांना सर्वांत जास्त प्रदूषित करतात. गंगा स्नानाचे पुण्य आपल्या संस्कृतीत अधोरेखित केले आहे. परंतु, आज जागतिक पातळीवर सर्वांत जास्त प्रदूषित नदी म्हणून घोषित केलेली गंगा आणि त्या खालोखाल राजधानी दिल्ली शहर जिच्या काठावर वसले आहे, अशी ‘यमुना’ विलक्षण प्रदूषित आहे. यमुनाकाठी ताजमहाल असे आपण गुणगुणत हे जगातील आश्चर्य पाहायला जातो. पण, ताजसोबतच महाप्रदूषित यमुनादेखीलसहज दिसते. ज्यावेळी आपली जीवनदायी नदी प्रदूषित होते तेव्हा त्याच्या आसपास असणार्‍या सगळ्याच प्राणिमात्रांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. नद्यांच्या प्रदूषणासोबतच अनेक छोटे छोटे तलाव आणि सरोवर या रोजच्या वापरातल्या कचराकुंड्या बनल्या आहेत. माणसासोबत स्थानिक जलचर, इतर प्राणी आणि गाईगुरे यांनादेखील अशा प्रदूषित जलाशयांमुळे धोका पोहोचतो.

अनेक पर्यावरणीय समस्यांपैकी जलप्रदूषण ही जलद वाढणार्‍या लोकसंख्येने आणि अनियंत्रित अशा आपल्याच बेफिकीरीने वागण्यामुळे निर्माण झालेली अपरिहार्य समस्या आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक विकास आणि जनसामान्यांत तंत्रज्ञानाचा अतिवापर, प्रदूषणाबद्दल असलेले अज्ञान या गोष्टीमुळे या नद्यांचे पाणी भविष्यात कसे टिकवून ठेवायचे आणि प्रदूषणाचा परिणाम कमी कसा करायचा ही दोन मोठी आव्हाने सध्या शास्त्रज्ञांच्या आणि शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर समोर आहेत.

जलप्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सांडपाण्याचा निचरा जलाशयात थेट करणे. हे सांडपाणी घरगुती स्वरूपाचे, कृषी उद्योगातील, औद्योगिक प्रस्थापनातील, तसेच लहान मोठ्या कारखान्यातील, असून रोज खूप मोठ्या प्रमाणात जलाशयात सोडले जाते. त्यात असणारी प्रदूषके प्रक्रिया न केल्यामुळे पाण्यात तशीच येतात. या प्रदूषकांमध्ये अनेक प्रकारची घातक रसायने आणि विषारी द्रव्ये असू शकतात. एखाद्या तळ्यातले किंवा नद्यातले पाणी पिऊन तडकाफडकी मरण पावलेली गुरे, मोठ्या प्रमाणात जलचरांची मरतूक होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर ते तरंगत आहेत अशा प्रकारची दृश्ये वर्तमानपत्रात मध्ये येत असतात. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे अनियंत्रित, अपरिमित आणि अशाश्वत प्रदूषण. द्रवरूप प्रदूषकांच्यासोबतच प्लास्टिक, काचा, जड धातू, अ‍ॅल्युमिनियमचे कॅन अशासारखा घनकचरा जलाशयात टाकण्याची लोकांची प्रवृत्ती असते. अशा प्रकारचा कचरा कित्येक लक्ष वर्षे जलाशयात तसाच पडून राहतो. तेथील स्थानिक वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यावर विपरित परिणाम होत असतो.

या कचर्‍यात बहुतेक घटक अजैवविघटनशील असल्यामुळे त्यांचे कुजणे शक्य नसते. न बदललेल्या त्यांच्या मूळ रासायनिक स्वरूपामुळे जलचरांच्या शरीरात त्यांचा शिरकाव होतो. पुढील कित्येक वर्षे त्यांच्या परिसंस्थेत ते टिकून राहतात. शेतीव्यवसायातून जलाशयात शिरणारी कीटकनाशके, कृषी रसायने अशा पदार्थांमुळे जैविक संचय होऊन अन्नसाखळीच्या आधारे त्यांची ‘जैविक वृद्धी’ होते आणि सरतेशेवटी पर्यावरणाच्या उच्च स्थानावर असलेल्या मानवांचीच त्यामुळे हानी होत असते. उदाहरणार्थ, ‘डीडीटी’सारख्या अतिशय विषारी कीटकनाशकाचा जैवसंचय छोट्या छोट्या वनस्पतीप्लवक आणि प्राणिप्लवक यांच्या शरीरात होऊ शकतो, असे दूषित अन्न माशांच्या पोटात जाते. छोट्या माशाकडून मोठ्या माशाकडे ही संचयित प्रदूषके अन्नासोबत सरकत जातात. पाच मायक्रोग्रॅम प्रदूषक ज्याच्या शरीरात आहे, असे 100 छोटे मासे मोठ्या माशाने खाल्ल्यास, त्याच्यात 500 मायक्रोग्रॅम प्रदूषक शिरते. असे दहा मासे मोठ्या जलचराने खाल्ल्यास त्याच्या शरीरात पाच हजार मायक्रोग्राम प्रदूषकाचा शिरकाव होतो. असे मासे आपण खाल्ल्यास आपले आरोग्य धोक्यात येते. अन्नसाखळीच्या आधारे वाढत जाणार्‍या प्रदूषकाची ही ‘जैविकवृद्धी’ होते. ‘डीडीटी’ची मात्रा मातेच्या स्तनातून तिच्या अर्भकात शिरली आणि ते गतप्राण झाले, त्यानंतर ‘डीडीटी’सारख्या कीटकनाशकावर बंदी आली.

औद्योगिक प्रस्थापनेतून थेट जलाशयात कारखान्यातील पाणी सोडल्यास जड धातू, शिसे, पारा, पेट्रोकेमिकल रसायने अशा अतिशय घातक रसायनांचा पर्यावरणाबरोबर आणि पर्यायाने स्थानिक माणसांसोबत विपरित परिणाम होत असतो. जपानमध्ये घडलेल्या ‘मिनामाटा’ आणि ‘इटाई-इटाई’ या दुर्घटना दूषित जलाशयातील मासळी खाल्ल्याने झाल्या हे सर्वश्रुत आहेत. ‘मिनामाटा’ ही पार्‍याच्या प्रदूषणाची तर ‘इटाई-इटाई’ हा कॅडमियम प्रदूषणाची दुर्घटना होती, असे दूषित मासे खाऊन जे मेले ते सुटले, जे जगले त्यांना अतिशय वेदनामय पंगुत्व आले.

आजपर्यंत लहान-मोठा कोणताच जलाशय प्रदूषणमुक्त नाही. उत्तरेतील गंगा, यमुना, पश्चिमेतील नर्मदा, दक्षिणेतील गोदावरी, कावेरी या आपल्या सर्व महानद्या धोक्याच्या पातळीवर प्रदूषित आहेत. उत्तर प्रदेशात विशेषत: गंगेने तसेच यमुनेने धोक्याची पातळी केव्हाच गाठली आहे. तरीही आपल्या संस्कृतीत यांचे असणारे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षांत यांच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहे. 20 वर्षांपूर्वीचा ‘गंगा शुद्धीकरण प्रकल्प’ आणि दहा वर्षांपूर्वीची ‘नमामि गंगे’ या योजना शासन जागरुक आहे हे दर्शवणार्‍या आहेत. ‘नमामि गंगा’ योजना ही ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’ यांच्याद्वारे कार्यान्वित केली गेलेली योजना आहे. दि. 10 जुलै, 2014 रोजी जवळपास 20 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली ही योजना गंगा नदीच्या प्रदूषणावर उपाय म्हणून शासनाद्वारे सुरू झाली आहे. गंगामैयासोबतच आजूबाजूच्या परिसराचे संवर्धन, संरक्षण, परिवर्तन व्हावे, यासाठी संपूर्ण किनार्‍यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रे; औद्योगिक सांडपाण्यावर नियंत्रण; नदीच्या किनार्‍याने संवर्धन, संरक्षण आणि परिवर्तन व्हावे, या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. ‘विकास योजना’, नदीच्या पृष्ठभागाची सफाई, जैवविविधता वाढवणे आणि वनीकरण मोहिमा राबवणे या ही बाबी यात अंतर्भुत आहेत. परंतु, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनजागरण. लोकांनी वैयक्तिक पातळीवरील स्वतःहूनकोणत्याही मार्गाने गंगा नदी प्रदूषण करू नये, हे त्यांना मनोमनी ठसवणे हीच खरी प्रदूषण नियंत्रणात ग्यानबाची मेख आहे. स्वर्गात प्रवेश मिळेल म्हणून आपल्या मृत नातेवाईकांची कलेवरे, अस्थी, राख, निर्माल्य वगैरेदेखील गंगा नदीत सोडणे अशा अंधश्रद्धा, परंपरा म्हणून जपणार्‍या माणसांना सुधारणे हादेखील मानसिक प्रदूषण दूर करण्याचा मार्ग आहे.

भारतातील जलप्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. जलप्रदूषण ही गंभीर समस्या समजली गेल्यामुळे शासनाने ‘जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, 1974’ (Water Prevention & Control of Pollution Act, 1974) अंमलात आणलेला आहे. या कायद्याप्रमाणेकोणीही जर पाण्याचे प्रदूषण केले किंवा पाण्याच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये बदल केला किंवा पाण्यात कोणत्याही सांडपाणी अथवा कचर्‍याची विल्हेवाट लावून उपद्रव निर्माण केला, तर त्याला शिक्षा होते. 2003 मध्ये जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यात अजून फेरफार करून औद्योगिक व्यवस्थांच्या प्रदूषणाला बर्‍यापैकी चाप लावला आहे. (The Water Prevention & Control of Pollution Cess Act, 2003). दूषित पाणी वापरल्यास जनतेसाठी हानिकारक ठरते म्हणून या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

- डॉ. नंदिनी देशमुख