ज्ञानवापी प्रकरण : मुस्लिम पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दणका!, भोजशाळा सर्वेक्षण सुरुच राहणार

    01-Apr-2024
Total Views |
supreme-court-gyanvapi-mosque-kashi-vishwanath-temple

 
नवी दिल्ली :    ज्ञानवापी संरचनेच्या व्यास तळघरात पूजा सुरू राहणार, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुनावणीत मुस्लिम पक्षाला मोठा झटका देत व्यास तळघरात पूजा करण्यावर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सुरू असलेले भोजशाळेतील सर्व्हेक्षण थांबविण्यासही नकार दिला आहे.

दरम्यान, काशीस्थित ज्ञानवापी संरचना प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात पूजा करण्यास बंदी घालण्यास नकारासोबतच धार जिल्ह्यातील एएसआय सर्वेक्षण थांबण्यासही नकार दिला आहे. या दोन्ही खटल्यात मुस्लिम पक्षकारांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

 
हे वाचलंत का? - काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!, आयकर विभागाकडून लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ
 
 
तसेच, भोजशाळेबाबत हिंदू समाजाचा दावा आहे की, हे माता वाग्देवीचे मंदिर असून राजा भोज परमार यांनी बांधले होते. इंग्रजांनी माँ सरस्वतीची मूर्ती येथून हटवून इंग्लंडला नेल्याचे पुरावे आजही लंडनच्या संग्रहालयात सुरक्षित आहेत. असे असतानाही त्याच वेळी, मुस्लिम समुदायाकडून सदर मंदिरास कमल मौला मस्जिद म्हटले जात असून जे ११व्या शतकातील आहे.

ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, दि. ३१ जानेवारी २०२४ च्या आदेशामुळे नमाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. अंजुमन इंतजामिया मशीद समितीने ज्ञानवापी संरचना संकुलात असलेल्या व्यास तळघरात हिंदूंच्या पूजेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.