पृथ्वीबाबा आणि पवारांचा वाद! साताऱ्यात पवार पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देणार का?

    01-Apr-2024
Total Views |
satara lok sabha election


दि. २९ मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तर दुसरीकडे दि. ३० मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहिर झाली. या यादीत वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे तसेच आहिल्यानगरमधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा झाली. पण सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून ही या मतदारसंघात श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्याने उमेदवारांची घोषणा पवारांना करता आली नाही. त्यात मागच्या काही दिवसाआधी पवार स्वत: सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण आता साताऱ्यात काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची ही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची सातारा लोकसभेसाठी चर्चा का आहे? पवार त्यांना उमेदवारी देतील का? पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांमध्ये राजकीय वैर आहे का? या मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो? साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाणांव्यतिरिक्त कोणाच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी शरद पवार गटात होतं आहे?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशी पृथ्वीराज चव्हाणांची ओळख. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात असताना पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते. त्यांनंतर त्यांना २०१० ते २०१४ दरम्यान मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळालं. पण, मागच्या काही काळापासून राज्याचा राजकारणात ते अडगळीत पडलेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा केंद्राच्या राजकारणात जाण्याची संधी या लोकसभा निवडणुकीतून मिळणार, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. मुळात पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. पण वाढत्या वयामुळे त्यांनी दि. २९ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, असं बोललं जातयं. मुळात महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. पण २०१९ ला पवारांनी पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार असतील तर आपण ही जागा सोडू,अशी तयारी दाखवली होती, अशा आशयाच्या बातम्यादेखील त्यावेळी माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात पवारांकडे यावेळी सातरा लोकसभेसाठी तगडा उमेदवार नाही, असं बोललं जातयं. त्यामुळे पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
 
त्यामुळे आधी सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ. सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे १, शिंदे गटाकडे २, काँग्रेसकडे १, भाजपकडे १ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे १ आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तसे पाहायला गेले तर महायुतीचे वर्चस्व अधिक आहे. अशात पवारांच्या उमेदवाराला लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांची मदत लागेल. आणि ही मदत पुरवणारा एकमेव काँग्रेसचा आमदार म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण. अशात शरद पवार उमेदवारांच्या शोधात आहेत. त्यात शरद पवारांनी दि. २८ मार्च रोजी साताऱ्यात दौरा करून ही कुणाचंच नाव फिक्स झालेले नाही. त्याच दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. आणि पृथ्वीबाबांनीही शरद पवार यांनी आदेश दिल्यास आपण लढण्यास तयार असल्याचं स्पष्ट करून राजकीय धुरळा उडवला. तसेच सक्षम उमेदवार कोण हे शरद पवार ठरवतील, अशी मवाळ भुमिका ही पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. दरम्यान सातारा दौऱ्यात शरद पवारांनी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटील यांची नावे चर्चेत असल्याचं सांगत. आम्ही यावर चर्चा करून उमेदवार देऊ असे पवार म्हणाले. तसेच त्यांनी साताऱ्यातून मला स्वत: ला सुद्धा आग्रह होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसात साताऱ्याचा निर्णय घेऊ असं पवार म्हणालेत. मुळात पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची ट्विस्ट यासाठी आला आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाला भिंवडीची जागा हवी आहे. ही जागा मविआत काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसला साताऱ्याची जागा देऊन शरद पवार गट भिंवडीची जागा मागेल, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या नावाची चर्चा आहे.
 
आता पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यात वाद काय आहे हे जाणून घेऊ. तसे तर चव्हाण आणि पवारांच्या वादाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चेत आलेला किस्सा म्हणजे, १९९९ च्या विधानसभा निवडणुकीचा यावेळी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटलांना कराड विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. मुळात कराड म्हणजे चव्हाण आणि चव्हाण म्हणजे कराड असं समीकरण असताना ही श्रीनिवास पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला होता. ज्यामुळे १९९९ ते २००२ हा काळ पृथ्वीराज चव्हाणांचा काळ राजकीय विजानवासात गेला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण दुखावले गेले आणि पवार विरुद्ध चव्हाण या संघर्षाची ठिणगी पडली. तसेच आता राष्ट्रवादीतील बंडाला शरद पवारांची धरसोड वृत्ती कारणीभूत असल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांवर टीका ही केली होती. इतकंच काय तर इंडी आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत स्वागतोत्सूक म्हणून ठाकरे गटातील आणि शरद पवारांच्या गटातील, तसेच काँग्रेसच्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या मोजक्या नेत्यांची छायाचित्र होती, मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना ही जाणून बुजून डावलण्यात आलं होतं. इतकंच काय २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर चव्हाणांना चांगलं खातं मिळेल, अशी चर्चा असताना चव्हाणांना साईडलाईन करण्यात आलं. त्यामुळे पृथ्वीबाबा विरुद्ध पवार हा वाद संपुष्टात येईल, असे संकेत या निवडणुकीत दिसू लागलेत. एकेकाळी ज्या श्रीनिवास पाटलांनी आपला पराभव केला होता, त्या श्रीनिवास पाटलांऐवजी पर्यायी उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यावेळी तरी पवारांच्या सांगण्यावर निवडणुक लढवतील का? हा ही प्रश्न आहेच. तरी तुम्हाला काय वाटतं पवार विरुद्ध चव्हाण हा वाद संपुष्टात येऊन पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांचा आदेश पाळतील का? आणि पवार सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा पृथ्वीराज चव्हाणांना देतील का?