"विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’बद्दल संदीप खरेंची भावूक पोस्ट

    01-Apr-2024
Total Views |
 सुबोध भावे, संदीप कुलकर्णी, सुप्रिया पिळगांवकर नंतर आता संदीप खरे यांनी केले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे
कौतुक
 sandeep khare  
 
मुंबई : रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळींना देखी भूरळ घातली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतल सर्व कलाकार या चित्रपटाच्या मागे ठाम उभे आहेत. नुकताच मराठीत स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि तो पाहिल्यानंतर गायक संदीप खरे यांनी त्यांच्या भावूक मत सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.
 
रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यानंतर संदीप खरे यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “ 'स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहिला! विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा !! त्यांच्यावरील उलटसुलट चर्चा, वादविवादही ऐकत आलो आहे आणि ऐकतो आहे! या निमित्ताने पुन्हा एकदा वाटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणं तर सोडून द्या, पण त्यांचं कौतुक करण्याची तरी आपली योग्यता, क्षमता आहे का? हे एकदा तपासून बघायला हवं! आणि सावरकरच नव्हे तर छत्रपती शिवराय, महात्मा गांधी, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे आणि अशा अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी हेच वाटतं मला !! राम गणेश गडकरी यांना जेव्हा एकदा टिळक आणि आगरकर यांच्या वादाविषयी विचारलं होतं. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार विलक्षण आहे! ते त्या माणसाला म्हणाले होते, “ मित्रा, या आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती आहेत! यात आपल्यासारख्यांनी बोलायचं नसतं !!" असो”.
 
पुढे ते लिहितात, “सांगायचा मुद्दा हा की चित्रपट एका फार मोठ्या, विलक्षण, प्रज्ञावान, प्रतिभासंपन्न, चिवट, द्रष्ट्या, जाज्वल्य देशाभिमानी अशा नेत्याचा, वक्त्याचा, कवीचा, लेखकाचा, नाटककाराचा, भाषाकाराचा, तर्कसंगत समाजसुधारकाचा, विज्ञाननिष्ठ बुद्धिवंताचा एक ‘स्मरणपट ‘ आहे! प्रेक्षकांमध्ये उपस्थित तरुणांची संख्या पाहून मला विलक्षण समाधान वाटले ! "तरुणांना असे हिमालय दाखवायला हवेत, अन्यथा रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्सना ते पर्वत समजू लागतील" - या आशयाचे व.पु.काळे यांचे विधानही आठवले!”
 

khare  
 
“सावरकरांसारखे महाकाय, बहुआयामी व्यक्तिमत्व चित्रपटातूनच काय पण काव्य, चरित्र, कादंबरी अशा साहित्य प्रकारातूनही साकारणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड! सावरकर समजायला, आकळायला, साकारायला खरं तर सावरकरांचीच प्रतिभा हवी! काही तासांच्या चित्रपटात किंवा काहीशे पानांच्या पुस्तकात मावतील असे सावरकर नव्हेतच ! पण तरीही एका विलक्षण ध्यासाने चित्रपटाच्या सर्वगामी माध्यमातून हे महाकाय व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे ही गोष्ट नक्कीच मोलाची! त्यासाठी रणदीप हुड्डा आणि सर्व चमूचे मनःपूर्वक आभार! आपले बाबूजी अर्थात गायक, संगीतकार श्री. सुधीर फडके यांनीही खडतर परिश्रमातून साकारलेल्या सावरकरांवरील चित्रपटाचे स्मरणही या ठिकाणी आवश्यकच! फार फार वाटले की या ज्वालामुखी व्यक्तिमत्त्वाचा बालपणापासून अंतिम प्रायोपवेषनापर्यंतचा प्रवास साकारणारी एखादी आंतरराष्ट्रीय दर्जाची महामालिका यायला हवी!! येईल! येईलच!! (हा 'च' खास सावरकरी वक्तृत्वातला !!) माझ्या मर्यादित कलागुणांची एखादी ओंजळ त्यात मी ही वाहेन !! सावरकरांनी काळ्या पाण्याची, दोन जन्मठेपेंची सजा दिसत असूनही, कोलू ओढत, कोरडे खात समर्थ, अखंड राष्ट्राचे स्वप्न धगधगत ठेवले; आपण त्या स्वप्नांसोबतच त्यांच्यावरील अशा महामालिकेची महत्वाकांक्षा तरी ठेवायलाच हवी !!”.
 
आत्तापर्यंतची कमाई
 
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.०७ कोटी, चौथ्या दिवशी, २.१५ कोटी, पाचव्या दिवशी, १.०५ कोटी, सहाव्या दिवशी, १ कोटी, सातव्या दिवशी १.१५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने एकूण ११.३५ कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात आठव्या दिवशी १.०१ कोटी, नवव्या दिवशी १.०५ कोटी, दहाव्या दिवशी १.७५ कोटी कमवत एकूण १५.७० कोटी कमावले आहेत. तर जगभरात २१.४५ कोटींची कमाई केली आहे.