समुद्री कासवांची पिल्ले पर्यटकांच्या हातात

वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन

    01-Apr-2024
Total Views |

TURTLE FESTIVAL
मुंबई (विशेष प्रतिनिधी): कोकणात ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम सध्या सुरू असून कोकणातील काही ठराविक किनाऱ्यांवर कासव महोत्सव भरविण्यात येतोय. दिवेआगरमध्ये भरविण्यात आलेल्या कासव महोत्सवामध्ये ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले थेट पर्यटकांच्या हातात दिली जात आहेत. वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असून पर्यटकांनी हातात घेऊन काढलेले फोटो आणि व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाची प्रजात वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ अंतर्गत पहिल्या प्रवर्गात येणारी प्रजात आहे. त्यामुळेच या पिल्लांच्या सुरक्षेसाठी कासव महोत्सव भरविताना वनविभागाचे काही कायदे आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. वनविभागाने प्रशिक्षीत केलेल्या काही ठराविक लोकांनाच या पिल्लांना हाताळण्याची परवानगी असून इतर कोणीही या पिल्लांना हाताळू शकत नाहीत. दिवेआगरमध्ये याच नियमांचे उल्लंघन केले जात असून थेट पर्यटकांनी ही पिल्ले हाताळल्याचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर आले आहेत.

वेळास आणि आंजर्ले येथे भरविल्या जाणाऱ्या कासव महोत्सवामध्ये ठराविक अंतरावर दोरी (बॅरिगेट्स) लावून त्या पलिकडून पर्यटकांना ही समुद्री कासवांची पिल्ले पाहता येतात. पिल्ले सोडल्यानंतर त्यांच्या मार्गात अडथळा येणार नाही अशारितीने काळजी घेतली जाते. दिवेआगर येथे बॅरिगेट्स न लावताच पिल्ले सोडली गेली असून यामध्ये पायाखाली पिल्ले मरण्याचीही शक्यता उद्भवते. पिल्लांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिगेट्स लावणे तसेच इतर नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.