मार्तंड मंदिराचा जीर्णोद्धार; जाणून घ्या काय आहे इतिहास

    01-Apr-2024
Total Views |

martanda surya mandeer 
 
जम्मू-काश्मीरमधील ८व्या शतकातील प्राचीन मार्तंड सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या संदर्भात आज जम्मूला उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर सरकारने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली. मुस्लिम आक्रमक सिकंदर शाह मिरीच्या आदेशावरून हे मंदिर पाडण्यात आल्याचे सांगितले जाते. आज अनेक वर्षांनी त्याचा जीर्णोद्धार होत आहे हि समस्त हिंदूंसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच या बैठकीत इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. ज्यात सम्राट ललितादित्य यांचा मार्तंड सूर्य मंदिर आवारात पुतळा बसविण्यावरहि ठराव घेण्यात येणार आहे.
 
आठव्या शतकातील मार्तंड मंदिर हे भारतातील सूर्यमंदिरांपैकी सर्वात जुने मंदिर आहे. ते भारताच्या अमूल्य प्राचीन आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित स्मारक आहे. हे मंदिर हिंदू राजा ललितादित्य यांनी बांधले होते.
सूर्याला संस्कृत भाषेतील मार्तंड या समानार्थी शब्दाने देखील ओळखले जाते. म्हणून याचे नाव मार्तंड सूर्य मंदिर. अभ्यासकांच्या मते, मार्तंड सूर्यमंदिराची स्थापना इसवी सन आठव्या शतकात ललितादित्य राजाने केली होती.
 
जोनराजा आणि हसन अली यांच्या मते, सिकंदर शाह मिरी यांनी सुफी धर्मोपदेशक मीर मुहम्मद हमदानी यांच्या सल्ल्यानुसार समाजाचे इस्लामीकरण करण्याच्या आवेशात मंदिराचा नाश केला होता. जोनाराजाने त्याच्या मुख्य-सल्लागार सुहभट्टवर याप्रकरणी दोषारोप केलेत. तसेच अनेक भूकंपांमुळे या मंदिराचे अवशेष आणि संरचनेचे अवशेष आणखी उद्ध्वस्त झाले.
 
मार्तंड मंदिराचे स्थापत्य विलोभनीय आहे. हे मंदिर एका पठारावर बांधले गेले होते जिथून संपूर्ण काश्मीर खोरे पाहता येते. अवशेष आणि संबंधित पुरातत्व शोधांवरून असे म्हणता येईल की हा काश्मिरी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होता, ज्याने गांधार, गुप्त आणि चिनी वास्तुकलेचे मिश्रण केलेले आढळते. मंदिराला कॉलोनेड पद्धतीचे प्रांगण आहे, त्याच्या मध्यभागी त्याचे मुख्य मंदिर आहे. जे सभोवतीने 84 लहान देवस्थानांनी वेढलेले आहे, तसेच 220 फूट लांब आणि 142 फूट रुंद आहे आणि पूर्वी बांधलेले एक छोटे मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर काश्मीरमधील पेरीस्टाईलचे सर्वात मोठे उदाहरण ठरले आहे, हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार, मंदिराचे प्राथमिक प्रवेशद्वार चतुर्भुजाच्या पश्चिमेला स्थित आहे आणि ते मंदिराप्रमाणेच रुंदीचे आहे, ज्यामुळे भव्यता दिसत राहते. प्रवेशद्वार त्याच्या विस्तृत सजावटीमुळे आणि आतल्या देवतांच्या आराखड्यामुळे संपूर्णपणे मंदिराचे प्रतिबिंबित करते. प्राथमिक मंदिर एका केंद्रीकृत संरचनेत आहे, ज्याला पिरॅमिडल शीर्ष आहे असे मानले जाते - काश्मीरमधील मंदिरांचे हे एक सामान्य वैशिष्ट्य.मंदिराच्या पूर्वकक्षातील विविध भिंतींवर कोरलेल्या कोरीव कामात सूर्यदेव सूर्याव्यतिरिक्त विष्णू आणि गंगा आणि यमुना यांसारख्या नदीच्या देवींचे योग्य चित्रण करण्यात आले आहे.
 
हे मंदिर लवकरच नव्याने जीर्णोध्दारीत करण्यात येणार आहे याचा एक हिंदू म्हणून मला अभिमान आहे.