नागरिकांनी स्वयंपुनर्विकासाकडे वळावे : आमदार प्रविण दरेकर

    01-Apr-2024
Total Views |
 
Pravin Darekar
 
मुंबई : स्वयंपुनर्विकास हे माझे स्वप्न आहे. स्वयंपुनर्विकासासाठी राज्य सरकारने अनेक सवलती, निर्णय घेतल्याने कुठल्याही प्रकारची अडचण स्वयंपुनर्विकासात नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वयंपुनर्विकासाकडे वळावे. यासाठी लागणारा सर्व अर्थपूरवठा मुंबई जिल्हा बँकेमार्फत केला जाईल, असे आश्वासन भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. बोरिवली पश्चिम येथील शिंपोली रोड परिसरात आरबीआयच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या इमारतीच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आज खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
याप्रसंगी नगरसेवक प्रविणभाई शहा, नगरसेविका बिना दोशी, सोसायटीचे अध्यक्ष सुधीर जोशी, गजानन पाटील, निलेश कोलाडिया, गणेश बारे यांसह जयदत्त सोसायटीतील सभासद, रहिवाशी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, "स्वयंपुनर्विकास हे माझे स्वप्न आहे. स्वयंपुनर्विकासाचे जवळपास १६०० प्रस्ताव मुंबई बँकेकडे आले आहेत. त्यापैकी ३० प्रस्तावांना ४०० ते ५०० कोटी रुपये दिले आहेत. स्वयंपुनर्विकासाचा चारकोप येथील अभिलाषा सोसायटीलाही फायदा झाला. २९० स्क्वेअर फुटाच्या घरातून ९२० स्क्वेअर फुटाच्या घरात तेथील रहिवासी राहायला गेले. स्वतःचा स्वतः पुनर्विकास केला तर विकासकाला जो नफा मिळणार असतो तो सभासदांवर शेअरिंग करतो आणि सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबाला जास्तीची जागा मिळते."
 
हे वाचलंत का? -  "संजय राऊत नटरंगी नाच्या; देशातील जनता लायकी दाखवणार!"
 
"या स्वयंपुनर्विकास मोहिमेत अनेक अडचणी आल्या होत्या. काळाचौकी येथे धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात मुंबईतील स्वयं पुनर्विकासासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय, सवलती दिल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वयंपुनर्विकास म्हणजे 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'. मी मुंबईत स्वयंपुनर्विकासाची मोहीम घेतली होती. आपल्याला आमचा अर्थपूरवठा नसतानाही ती मोहीम आपण यशस्वी केली," असे सांगत दरेकरांनी जयदत्त सोसायटीचे आभार मानले.
 
ते पुढे म्हणाले की, "मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर स्वयंपुनर्विकास होतोय. त्यासाठी लागणारी मदत, अर्थपुरवठा मुंबई जिल्हा बँक करते. राज्य सरकारच्या अनेक सवलती स्वयंपुनर्विकासासाठी आहेत. त्यामुळे विकासकापेक्षा सहजगत्या सोसायटी आपल्या इमारतीचा पुनर्विकास करू शकते. बोरिवलीतील सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासाला जायचे असेल त्यांच्या मागे मुंबई जिल्हा बँक ताकदीने उभी राहील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
हे वाचलंत का? -  "उबाठा गटाचा गल्लीत गोंधळ आणि..."; शेलारांचा घणाघात
 
"मुंबई जिल्हा बँकेला राज्य सरकारने उपनगरात नोडल एजन्सी म्हणून नेमले आहे. मुंबई बँकेला पैसे कमी पडले तर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून उभे करू. तेही कमी पडले तर देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे की, राष्ट्रीय सहकार विकास मंडळातर्फे स्वयंपुनर्विकासाला कमी व्याजदराने पैसे द्यावे जेणेकरून सोसायटीला कमी व्याजाने पैसे देऊ. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची अडचण स्वयं पुनर्विकासाला येणार नाही. लोकांनी स्वयं पुनर्विकासाकडे जावे मी स्वतः स्वयंपुनर्विकासाच्या मागे आहे. लागणार सगळा अर्थपूरवठा मुंबई जिल्हा बँक करेल," असा विश्वासही दरेकरांनी यावेळी उपस्थितांना दिला.