प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी! एकमेकांवर केले गंभीर आरोप

    01-Apr-2024
Total Views |

Prakash Ambedkar & Nana Patole 
 
मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना टोले यांच्यात खडाजंगी रंगलेली पाहायला मिळत आहे. या दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.
 
प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंचा भाजपशी संबंध असल्याचा दावा केला आहे. "वंचितने नागपूरच्या उमेदवाराला कोणत्या आधारे पाठींबा दिला? प्रकाश आंबेडकरांनी गडकरींना हरवण्यासाठी हा पाठींबा दिला आहे," असे वक्तव्य नाना पटोलेंनी केले होते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "नाना पटोलेंना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार याबद्दल प्रचंड दु:ख झालं आहे. आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेला पाठींबा हा नितीन गडकरींना हरवण्यासाठी दिल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. यातून त्यांचे भाजपशी असलेले संबंध खुले झाले आहेत. त्यामुळे कांग्रेसने नाना पटोलेंना भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितल्यावर त्यांनी मला लढता येत नाही असं सांगितलं. याचं खरं कारण आज कळत आहे."
 
हे वाचलंत का? -  "साधी सरपंच पदाची निवडणूकही न लढवलेल्या राऊतांचा जावईशोध!"
 
"प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा नितीन गडकरी हरतील याचं दु:ख झालं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अध्यक्षांवर किती विश्वास आहे हे यावरून दिसत आहे. वरिष्ठांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही दिलेल्या शब्द पाळला. याचं नाना पटोलेंना दु:ख झाल्याने ते वंचितवर टीका करत आहेत. नाना पटोले आणि भाजपचं नातं चव्हाट्यावर आलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर भाजपचे अनेक नेते हरले असते. हे नाना पटोलेंना नको होतं. म्हणून वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आलं," असेही ते म्हणाले.
 
यावर नाना पटोले म्हणाले की, "आम्ही प्रकाश आंबेडकरांना कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. त्यांना द्यायचं असल्यास ते देऊ शकतात. मी सुद्धा वंचित आहे. सातत्याने गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मला व्यक्तिगत टॉर्चर केलं जातं हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही. याचं उत्तर आम्ही योग्यवेळी देऊ. खर्गे साहेबांनी काय काय पत्रव्यवहार केला ते पत्र माझ्याजवळ आहेत. त्यामुळे दिल्लीचं नाव सांगून काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न असल्यास त्याबद्दल मला माहिती नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाचा कोणाशी संबंध आहे हे आम्ही योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी मांडणार आहोत," असा इशाराही नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.