समानशीले व्यसनेषु सख्यम्!

    01-Apr-2024
Total Views |
Editorial on Indi Alliance sabha delhi
 

ज्या रामलीला मैदानावरून अवघ्या १०-१२ वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव वगैरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करून, त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती, त्याच मैदानावर भ्रष्टाचारी केजरीवालांच्या मुक्तीसाठी ‘आप’ची नेतेमंडळी आज याच भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेली पाहायला मिळाली. सत्तेची चटक आणि भ्रष्टाचाराची सवय लागलेल्या केजरीवालांनी व्यसनी लोकांची मैत्री चटकन होते, हे सांगणारे ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ हे संस्कृत वचन किती सत्य आहे, तेच दाखवून दिले.

नवी दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी पार पडलेली विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीची सभा ही भ्रष्टाचाराचे समर्थन करणारी आणि घराणेशाहीला संरक्षण देणारी होती. त्यात सर्व नेत्यांनी नेहमीचाच बिनबुडाच्या आरोपांचा राग आळविला. भाजपकडून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, पंतप्रधान मोदी हे राज्यघटना बदलणार आहेत वगैरे नेहमीचे आरोप करण्यात आले. त्यात नवीन काहीच नव्हते. म्हणूनच विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ या पंक्ती ‘इंडी’ आघाडीच्या रविवारच्या राजकीय नाट्याला अगदी साजेशा ठराव्या. पण, या सभेत नवीन काही असले, तर ती होती-अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीची व्यासपीठावरील उपस्थिती! अवघ्या दहा वर्षांपूर्वी याच रामलीला मैदानात समाजसेवक अण्णा हजारे यांनी तत्कालीन युपीए सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन सुरू केले होते. तेव्हा त्यांचे शिष्य आणि सहकारी म्हणून काम करणारे अरविंद केजरीवाल हे दररोज हातात कागदाचे तुकडे फडकावून काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यांसारख्या जवळपास सर्वच पक्षांविरोधात घोषणा देत असत. सोनिया गांधी, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, शरद पवार यांसारख्या नेत्यांना अटक करा आणि तुरुंगात टाका आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालवा, अशी मागणी करीत असत.

आता केवळ दहा वर्षांत केजरीवाल यांच्यात किती आमूलाग्र परिवर्तन झाले आहे, ते पाहून दिल्लीवासीयच नव्हे, तर संपूर्ण देशही अचंबित झाला असेल. कारण, ज्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केजरीवाल करीत होते, त्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून, त्यांच्या पत्नी सुनीता भाजपवर बिनबुडाचे आरोप करताना दिसत होत्या. रविवारची ‘इंडी’ आघाडीची सभा ही ‘लोकशाही बचाव’ सभा नव्हती, तर ‘परिवार बचाव, भ्रष्टाचार छुपाव’ आणि ‘बीजेपी हटाव’ सभा होती! त्यातील प्रत्येक नेत्याकडून केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे एकेक धडे गिरविले असल्याचे आता लोकांना दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्याकडून बेछूट आरोप कसे करायचे, ते केजरीवाल शिकले आहेत, तर अखिलेश यादव यांच्याकडून निलाजरेपणाचे धडे गिरविले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्याकडून परिवारवादाचे धडे घेतल्यामुळेच, आपली बाजू मांडण्यासाठी केजरीवाल यांना पक्षातील सहकार्‍यांची नव्हे, तर आपल्या पत्नीची आठवण आली. लालूप्रसादांप्रमाणेच तेही दिल्लीचे मुख्यमंत्रिपद बहुदा आपल्या पत्नीकडे सोपवतील, अशी दाट शक्यता आहे. पण, केजरीवाल हे लालूप्रसादांच्या पुढे एक पाऊल गेले आहेत. लालूप्रसाद यादव यांना अटक झाल्यावर, निदान त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा तरी दिला होता. पण, निर्लज्जपणाचे बाळकडू अंगी भिनविलेल्या, केजरीवाल यांनी तुरुंगात गेल्यावरही राजीनामा देण्यास साफ नकार दिला आहे.

एकीकडे दिल्लीत ‘इंडी’ आघाडीची ही भ्रष्टाचार बचाव सभा पार पडली, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी लोटली होती. त्या सभेत मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधातील आपला लढा सुरूच राहील, याची ग्वाही दिली. कितीही मोठी वा प्रभावशाली व्यक्ती असो, तिने भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आढळले, तर तिच्यावर कारवाई केली जाईलच, असे असे आश्वासन देऊन, मोदी यांनी काँग्रेसच्या देशाच्या सुरक्षेबाबत केलेल्या तडजोडीची उदाहरणे दिली. तामिळनाडूच्या किनार्‍यापासून केवळ २० किमी अंतरावर असलेले कच्चाथीवू हे बेट इंदिरा गांधी यांनी कसे श्रीलंकेला आंदण देऊन टाकले आणि भारताच्या सुरक्षेशी तसेच सागरी हक्कांविषयी तडजोड केली, ते त्यांनी स्पष्ट केले.

पं. नेहरू यांनी आधी पाकिस्तानला काश्मीरचा लचका तोडू दिला, नंतर चीनला प्रथम तिबेटचा घास गिळू दिला आणि मग अक्साई चीनचा प्रदेशही त्याला भेट देऊ केला. त्यांच्या मुलीने कच्चाथीवू हे भारताच्या मालकीचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले. नेहरू-गांधी परिवारातील हे नेते भारताला आपली खासगी मालमत्ताच समजत होते काय, असा प्रश्न पडतो. मोदी यांच्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून, ते राज्यघटना बदलून टाकतील, असा विनोदी आरोप विरोधकांनी केला आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून, लोकशाहीचा खून तर केलाच; पण त्या काळात मनमानी करून, राज्यघटनेतही बेकायदा बदल घडविले. इतकेच नव्हे, तर १९८० मध्ये सत्तेत पुनरागमन होताच, नऊ राज्यांतील बिगर काँग्रेस सरकारे कोणतेही कारण न देता, बरखास्त केली. या सार्‍या घटनांनी लोकशाही आणि राज्यघटनेला धोका उत्पन्न झाला नव्हता, अशी काँग्रेसची समजूत दिसते. इंदिरा गांधी यांनी मनमानीपणे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून कशा नियुक्त्या केल्या होत्या, तो इतिहास केवळ ४० वर्षांपूर्वीचा आहे. आज मोदी सरकारकडे या न्यायालयांमध्ये न्यायाधीश नेमण्याचा अधिकारच नाही, हे काँग्रेस विसरली असली, तरी जनतेला त्याची पूर्ण कल्पना आहे.

माणसाला वाईट सवयी मुद्दाम लावाव्या लागत नाहीत, त्या सहजच लागतात. त्यांची चटक लागल्यावर, ती व्यक्ती आपल्यासारखी समानधर्मी व्यक्ती शोधते. समान व्यसन असलेल्या व्यक्तींमध्ये मैत्रीही चटकन होते. म्हणूनच ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ असे एक संस्कृत सुभाषित आहे. हजारे यांच्या आंदोलनात भ्रष्टाचारावर राणा भीमदेवी थाटाची भाषणे करणार्‍या केजरीवाल यांना सत्तेची चटक फारच लवकर लागली आणि तिने आता त्यांचा पूर्ण ताबा घेतला आहे. म्हणूनच भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या क्षेत्रात नवनवे विक्रम केलेल्या काँग्रेस, राजद, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स वगैरे पक्षांशी केजरीवाल यांची गट्टी जमली असून, त्यांच्याबरोबर ते दिसून येतात. काँग्रेस असो, राजद असो की समाजवादी पक्ष असो, आज त्या पक्षांची जी वाताहत झाली आहे, त्याकडे केजरीवाल हे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. भारतीय मतदार हा मौन असला, तरी तो सुबुद्ध आहे आणि योग्य वेळी तो सर्वच पक्षांचे हिशेब चुकते करतो, हे वारंवार दिसून आले आहे. केजरीवाल यांनी त्यातून बोध घेतला तर ठीक; अन्यथा मतदारराजा त्यांचाही हिशेब येत्या निवडणुकीत चुकता करील.