कच्छथीवू बेट नेहरूंसाठी डोकेदुखी!, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा घणाघात

    01-Apr-2024
Total Views |
Dr S Jaishankar Katchatheevu



नवी दिल्ली :   कच्छथीवू बेट ही डोकेदुखी असल्याचे देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांचे मत होते. कच्छथीवू बेट श्रीलंकेस देण्यामध्ये काँग्रेस आणि द्रमुक या दोन्ही पक्षांची समान भूमिका होती, असा घणाघात परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी पत्रकारपरिषदेत केला आहे.

कच्छथीवू बेट श्रीलंकेस देण्यावरून भाजपने एकाचवेळी काँग्रेस आणि तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुकवर हल्लाबोल केला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पत्रकारपरिषदेत काँग्रेस आणि द्रमुकच्या धोरणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले, १९७४ साली भारत आणि श्रीलंका यांच्यात एक करार झाला होता. त्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, तत्कालीन काँग्रेस सरकारने सागरी सीमा आखली आणि सागरी सीमा आखताना कच्छथीवू श्रीलंकेच्या हद्दीत दाखवले होते. त्यामुळे हा वाद कसा निर्माण झाला हे देशातील नागरिकांना समजणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
पं. नेहरू यांनी या मुद्द्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप डॉ. जयशंकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, १९६१ साली देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्यासमोरही कच्छथीवू बेटाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी नेहरू यांनी “कच्छथीवू हे अतिशय छोटे बेट असून त्यावरील भारताचा हक्क सोडण्याचा निर्णयही आपण अतिशय सहजपणे घेऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे विषय वारंवार संसदेत उपस्थित करण्यात येऊ नये”, असे म्हटले होते. त्यामुळे भारताच्या भूभागांविषयी काँग्रेसचे विचार नेहरू काळापासूनच समान असल्याचे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी म्हटले आहे.

द्रमुकची भूमिकादेखील याप्रकरण दुटप्पी असल्याचा टोला डॉ. जयशंकर यांनी लगावला. द्रमुकच्या नेत्यांनी कच्छथीबू बेट श्रीलंकेस देण्याचा विरोध केला होता. मात्र, त्यानंतर द्रमुकचे तत्कालीन प्रमुख एम. करूणानिधी यांनी केंद्र सरकारचा हा प्रस्ताव मंजुर केला होता. आपण आणि आपला पक्ष हा मुद्दा आणखी वाढवणार नसल्याचे आश्वासनही करूणानिधी यांनी तत्कालीन परराष्ट्र सचिवांना दिले होते. त्यामुळे गेल्या २० वर्षात श्रीलंकेत ६ हजार १८४ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आले असून १ हजार १७५ भारतीय मासेमारी नौकाही श्रीलंकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे द्रमुक आणि काँग्रेस हेच कच्छथीवू बेटाच्या वादास कारणीभूत असल्याचेही परराष्ट्र एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.


तुमच्या घराचे नाव बदलले तर माझे झाले का ?

अरूणाचल प्रदेशातील ३० जागांची नावे बदलण्याचा बालिश प्रकार चीनने पुन्हा एकदा केला आहे. त्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यातील भागांना काल्पनिक नावे देऊन काहीही साध्य होणार नाही. जर आपण उद्या एखाद्याचे घराचे नाव बदलले तर ते घर माझे होईल का, असा प्रश्न उपस्थित होते. चीनसोबतच्या एलएसीवर भारताचे सैन्य समर्थपणे तैनात असून तेथे काय करायचे हे भारतीय सैन्यास चांगलेच माहिती आहे, असेही डॉ. एस. जयशंकर यांनी नमूद केले.