नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपट तीन भागांत प्रदर्शित होणार.
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘रामायण’ (Ramayan) हा चित्रपट एक नव्हे तर तब्बल तीन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
नितेश तिवारींच्या ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल अशी हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांची फौज दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू रामाचं बालपण ते वनवास, सीतेचे हरण अशा महत्वपुर्ण घटना दाखवण्यात येणार आहेत. तर 'रामायण'च्या दुसऱ्या भागात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची भेट, हनुमान, वानर सेना, रामसेतू या गोष्टी उलगडण्यात येतील. आणि तिसऱ्या भागात वानर सेना आणि रावण सेना यांच्यातील युद्ध दाखवण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन 'रामायण' या चित्रपटात राजा दशरथ यांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, अजूनही दिग्दर्शक नितेश तिवारी किंवा खुद्द अमिताभ बच्चन यांच्याकडून यावर प्रतिक्रिया समोर आली नाही. परंतु, अमिताभ बच्चन यांना राजा दथरथ किंवा रामायणातील अन्य कोणत्याही भूमिकेत पाहण्यास त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
दरम्यान, रामायण चित्रपटातील अन्य भूमिकांबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेच्या भूमिकेत साई तर रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश दिसणार आहे. 'रामायण' सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असून हा चित्रपट २०२५ रोजी भेटीला येण्याची शक्यता आहे.