अध्यात्म रामायण

09 Mar 2024 22:16:32
Spiritual Ramayan


वाल्मिकी रामायणानंतर संस्कृत वाङ्मयामध्ये अनेक रामायणे लिहिली गेली. त्या असंख्य रामायणांमध्ये ‘अध्यात्म रामायण’ हे शिवपार्वती संवादरूप रामायण सर्वाधिक लोकप्रिय आहे. ‘अध्यात्म रामायण’, ‘अद्भुत रामायण’, ‘आनंद रामायण’ अशा अनेक रामायणांपैकी ‘अध्यात्म रामायण’ रामानंदी संप्रदायामध्ये अधिकृत प्रमाण ग्रंथ मानला जातो. श्रीराम हा भगवान विष्णूचा अवतार असून, परब्रह्म स्वरूप आहे. या रामकथेमध्ये ज्या-ज्या घटना-प्रसंग घडतात, त्याचा कर्ता करविता, पडद्यामागचा सूत्रधार श्रीराम आहे. कोणाही व्यक्तीला दोष न देता, ‘प्रारब्ध’ हे कारण मानले आहे.

श्रीराम चरित्राची व्यापकता लक्षात घेऊन, पुराणांनी ‘चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्।’ अशी त्यांची थोरवी गायलेली आहे. त्यामुळे रामकथेवर काळ व कवीनुसार नवनवे शब्दाविष्कार होणे अगदी स्वाभाविक आहे. संस्कृत साहित्यामध्ये रामकथेचे जे शेकडो आविष्कार झाले, त्यात वाल्मिकी रामायणाएवढीच ‘अध्यात्म रामायण’, ‘अद्भुत रामायण’, ‘आनंद रामायण’ प्रसिद्ध आहेत. यामधील प्रत्येक रामायणाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळी रामायणे ही मतभिन्नता नसून, रामकथेच्या विविधतेची संपन्नता आहे. रामभक्त म्हणून आपणास या रामायणांची तोंडओळख तरी असणे अगत्याचे आहे. या पुढील काही लेखांमध्ये आपण क्रमशः ‘अध्यात्म रामायण’, ‘अद्भुत रामायण’ आणि ‘आनंद रामायण’ यांचे लेखाच्या मर्यादेत शब्ददर्शन करूयात.

वाल्मिकी रामायणानंतर जी अनेक रामायणे तयार झाली, त्यामध्ये ‘अध्यात्म रामायण’ सर्वोच्च स्थानी आहे. हे रामायण शिवपार्वती संवादरूप आहे. माता पार्वतीदेवी भगवान शिवशंकरांना परमेश्वराचे खरे स्वरूप कोणते? ते सांगा असा प्रश्न करतेस, तेव्हा पार्वतीला भगवान शिवांनी राम स्वरूपाची जी श्रेष्ठता-महती सांगितली, ती रामकथा म्हणजे ‘अध्यात्म रामायण.’ या रामायणाचा कथा भाग ‘वाल्मिकी रामायणा’पेक्षा काही काही ठिकाणी खूप वेगळा आहे. ‘अध्यात्म रामायण’ सात कांडांचे असून, त्यामध्ये ६५ सर्ग आहेत. कोण्या शिवोपासक राम शर्मा यांनी या रामायणाची रचना केली, असा भविष्य पुराणात उल्लेख आहे. काही अभ्यासक भाविक हा राम शर्मा म्हणजे थोर रामभक्त रामानंदस्वामीच आहेेत, असे मानतात.

अद्वैत विचाराचे प्रतिपादन

गायीचे रूप घेऊन, भगवान विष्णूंकडे गेलेल्या पृथ्वीला दैत्यभारापासून मुक्त करण्यासाठी, ‘मी लवकरच अयोध्येत राजा दशरथ व कौसल्येच्या पोटी मानवरूपात जन्म घेईन. कारण, कश्यप ऋषी व आदिती यांनी पृथ्वीवर दशरथ व कौसल्या रुपात जन्म घेतला असून, मी पूर्वी त्या दोघांना तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेईन, असा वर दिला होता.’ भगवान विष्णूंचे हे आश्वासन ऐकून पृथ्वीसह, ब्रह्मदेव, शिव असे सारे देव, ऋषी-मुनी यांना आनंद होतो. भक्ती आणि अद्वैततत्त्वाचे प्रतिपादन हा या रामायणाचा प्रधान उद्देश आहे. या रामायणात राम म्हणजे साक्षात परब्रह्म आणि सीता म्हणजे त्याची योगमाया असे वर्णन आहे. दोघांचे सामरस्य दर्शन आहे. रावण हा इथे रामाचा शत्रू नसून, विरोधभक्ती करणारा एक भक्त आहे.
 
‘अध्यात्म रामायणा’मध्ये राम हा विष्णूचा अवतार म्हणून दैत्याचे निर्दालन या खास कार्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे. या रामायण कथेत जे काही घडते, त्यामागे ‘राम हाच कर्ता करविता’ आहे. मंथरा व कैकई या केवळ कळसूत्री बाहुल्या असून, देवच त्यांच्याकरवी दुष्ट कार्य घडवून आणतो, अशी ‘अध्यात्म रामायणा’ची भूमिका आहे. श्रीरामांचा युवराज्याभिषेक ठरतो, तेव्हा स्वतः नारद समस्त देवांचा निरोप घेऊन रामाला भेटतात आणि तुम्हाला वनवासात नियोजित अवतार कार्यार्थ जायचे आहे, याची आठवण करून देतात. इकडे देवांच्याच इच्छेने सरस्वती देवी मंथरा व कैकईच्या वाणीत प्रवेश करते आणि मंथराद्वारे कैकईला कुटील सल्ल्याने दशरथाला मागील दोन वर मागण्याची दुर्बुद्धी होते आणि पुत्रवत असणार्‍या प्रिय रामाला वनवासात पाठवण्याचा हट्ट करते. पुढे एका प्रसंगी राम लक्ष्मणास मंथरा कैकई दोषी नाहीत, हे समजावून सांगतात आणि म्हणतात की,

सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता।
परो ददातीति कुबुद्धिरेषा॥
सुख-दुःख कुणी कुणाला देत नसते, ते प्रारब्धगतीनेच मिळते. दुसर्‍याला त्याबद्दल दोष देणे, ही विपरित बुद्धी आहे.

 
रामाचा ‘वनवास’ हा यज्ञ रक्षण्यासाठी आणि राक्षसांच्या उच्चाटनासाठी त्याच्या एकूण अवतार कार्यातील मुख्य भाग आहे. राम देव आहे, या संकल्पनेनुसार आणि रामाच्या देवत्वाला झळझळीत करतील अशा पद्धतीने रामकथांमध्ये बदल करून, त्या सादर केल्याचे दिसते. त्यामुळे राम अहिल्येचा उद्धार करण्यास शीळेला पाय लावून उद्धार करतात. (मूळ कथेत राम-लक्ष्मण सती अहिलेल्याला तपस्वी म्हणून वंदन करतात) तसेच सीताहरण प्रसंगातही बदल करून, राम-सीतेला ‘रावण तुझे हरण करील तरी तू भिक्षा मागण्यास रावण वेष बदलून येईल, तेव्हा तुझे मूळ रूप अग्नीमध्ये ठेवून, माया छायारुपाने भिक्षा वाढ’ अशी पूर्वकल्पना देतात, असा प्रसंग रंगवला आहे. यातही देवाची पत्नी राक्षस पळवून नेतो, हे रामाच्या देवत्वाला गौणत्व आणते, म्हणून त्या मूळ कथेत मायारूप सीतेची कल्पना व रामाचीच योजना अशा कल्पकतेने परब्रह्म रामाचे देवत्व ठसवलेले आहे. पुढील प्रत्येक कथा-प्रसंगात सोयीस्कर बदल केलेला आढळतो.

थोडक्यात तात्पर्य एवढेच की, परब्रह्म राम हाच सर्वांचा कर्ता करविता असून त्याच्याच इच्छेने, योजनेने सारे घडते. म्हणूनच श्रद्धावान भाविकांमध्ये मूळ रामायणापेक्षा ‘अध्यात्म रामायण’ अधिक लोकप्रिय दिसते. राजा रामापेक्षा परब्रह्म राम हे भक्तांना, उपासकांना अधिक पूजनीय, वंदनीय, आराध्य वाटणे स्वाभाविक आहे. ‘अध्यात्म रामायण’ हा रामानंदी संप्रदायाचा अधिकृत प्रमाण ग्रंथ मानला जातो. एवढेच नव्हे तर गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरित मानस’चा तो मुख्य आधार आहे. तुलसीदास ‘वाल्मिकी रामायणा’पेक्षा ‘अध्यात्म रामायणा’तील रामाला भक्तिभावाने भजतात, असे ’रामचरितमानस’ वाचल्यावर जाणवते. ॥श्रीराम॥
(पुढील अंकात ः अद्भुत रामायण)

विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
Powered By Sangraha 9.0