नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शनिवारी नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या १० वर्षे आधी आला. पण त्याला मी पक्ष म्हणणार नाही. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आलेत. जे जे निवडून आलेत त्यांना बरोबर घेत त्याची मुळी बांधतात आणि हाच माझा पक्ष असे सांगतात. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत."
हे वाचलंत का? - "उद्धवजी, आधी मुलाला वरळीतून निवडून आणून दाखवा!"
"महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर तो पहिला जनसंघ, दुसरा शिवसेना आणि तिसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. या पक्षातील ९९ टक्के लोकांचा कधीही राजकारणाशी संबंध नव्हता," असेही ते म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले की, "आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १८ वर्षे पुर्ण होत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहरामध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही यावेळी ठरवलं आहे. राजकारणात राहायचं असेल तर त्यासाठी पेशन्स असावा लागतो. गेल्या १८ वर्षात मी अनेक चढउतार पहिले. या संपुर्ण चढउतारामध्ये तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहिलात. मी तुम्हाला यश मिळवून देणार म्हणजे देणार. पण त्यासाठी पेशन्स लागतो," असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.