मुंबई : आधी स्वत:च्या मुलाला वरळीतून निवडून आणून दाखवा आणि मग नितीन गडकरींबद्दल विचार करा, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीतून निवडणुक लढवावी, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे म्हणत होते की, आम्ही नितीन गडकरींना महाविकास आघाडीतून निवडून आणू. पण अरे बाबा, आधी महाविकास आघाडीच्या नावाने स्वत:च्या मुलाला वरळीतून निवडून आणून दाखवा मग आमच्या नितीन गडकरींबद्दल विचार करा. त्यांच्या तुळजापूरच्या सभेत सगळं मैदान खुलं होतं. संपुर्ण खुर्च्या रिकाम्या होत्या," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "एकदा हातात सत्ता द्या, सगळे..."; काय म्हणाले राज ठाकरे?
ते पुढे म्हणाले की, "लाचारीचं दुसरं नाव आता उद्धव ठाकरे असं झालेलं आहे. कारण १० जनपथमध्ये बसलेल्या मातोश्रीच्या नवीन मम्मीसमोर किती झुकावं लागतं हे लोकसभेच्या जागा जाहीर झाल्यावर दिसेल. महाविकास आघाडीची सत्ता असताना वाकून वाकून गळ्यात बेल्ट लावावा लागला आणि तो आता गायब झाला आहे. ज्यावेळी जनतेला मुख्यमंत्री म्हणून आधार देण्याची गरज होती त्यावेळी गळ्याला बेल्ट लावण्याचं नाटक केलं आणि घर सोडण्याचीही हिंमत दाखवली नाही," असेही ते म्हणाले.