२८७ विद्यार्थ्यांचे अपहरण, 'बोको हरम' इस्लामिक संघटनेची नायजेरियात दहशत!

09 Mar 2024 18:32:54
Nigeria sends troops to rescue more than 287 kidnapped students
 
नवी दिल्ली : आफ्रिकन देश नायजेरियाच्या उत्तर पश्चिम प्रांतातील एका शाळेतून सशस्त्र हल्लेखोरांनी २८७ मुलांचे अपहरण केले. अपहरण करण्यात आलेली सर्व मुले ८ ते १५ वयोगटातील आहेत. या मुलांना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी पळवून नेले. दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या मुलांना मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियाच्या वायव्य भागातील कुरिगा शहरात दि.७ मार्च २०२४ रोजी ही घटना घडली. ज्यावेळी मुलांचे अपहरण झाले त्यावेळी ते शाळेच्या दैनदिन तासिकेला उपस्थित होते. दरम्यान एका वृत्तसंस्थेने अहवालात म्हटले आहे की, या मुलांच्या संख्येबद्दल आधी कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती, परंतु नंतर असे उघड झाले की एकूण ३१२ मुलांचे अपहरण करण्यात आले होते, त्यापैकी २५ सुरक्षितपणे परतलेत. मात्र अद्याप २८७ मुले हल्लेखोरांच्या ताब्यात आहेत. यातील १८७ मुले माध्यमिक शाळेतील तर १२५ मुले प्राथमिक शाळेतील होती.

दरम्यान एका हल्लेखोरांने एका मुलावरही गोळ्या झाडल्या. त्याचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्यांवर या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. हे हल्लेखोर बोको हरामपासून फुटलेल्या अनासारू या शाखेचे सदस्य असल्याचे वृत्त आहे. बोको हराम ही नायजेरियाची दहशतवादी संघटना आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. खंडणी गोळा करण्यासाठी या मुलांचे अपहरण करण्यात आल्याचे समजते.

या मुलांसह एका शिक्षकाचेही या हल्लेखोरांनी अपहरण केले आहे. या अपहरण झालेल्या मुलांमध्ये कुरिगा शहरातील जवळपास प्रत्येक कुटुंबात एक मूल असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी या मुलांना मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले आहे. सरकारी शिष्टमंडळही येथे पोहोचले आहे. राज्याच्या राज्यपालांनी लोकांना आश्वासन दिले आहे की प्रत्येक मुलाला वाचवले जाईल. यासाठी सुरक्षा यंत्रणा काम करत आहेत.

मात्र, नायजेरियात इतक्या मोठ्या प्रमाणात मुलांचे अपहरण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आठवड्यात, हल्लेखोरांनी नायजेरियाच्या ईशान्य भागातून सुमारे २०० मुले आणि महिलांचे अपहरण केले. ते सरपण गोळा करत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. याआधीही लहान मुले आणि महिलांच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. इस्लामिक दहशतवादामुळे गेल्या काही वर्षांत नायजेरियातील परिस्थिती बिकट झाली आहे, असे सांगितले जात आहे.
Powered By Sangraha 9.0