स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित भित्तिशिल्पाचे उद्या अनावरण!

09 Mar 2024 21:32:27
Lata Mangeshkar mural news

मुंबई : स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना अभिवादन म्हणून संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमीट योगदानावर आधारित भित्तिशिल्प मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर केम्प्स उड्डाणपुलालगत साकारले आहे. या भित्तिशिल्पाचे अनावरण दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी राज्‍याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, तसेच मंगेशकर कुटुंबिय व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
 
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भित्तिशिल्प साकारण्याची संकल्पना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली होती. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. आश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, डी विभागाच्या माध्यमातून हे भित्तिशिल्प साकारण्यात आले आहे. सुमारे ५० फूट लांब व १५ फूट उंच आकाराचे हे भित्तिशिल्प साकारताना त्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनीही मोलाचे योगदान दिले आहे. आकर्षक अशी मांडणी करतानाच त्यामध्ये लता मंगेशकर यांचा संगीत क्षेत्रातील संपूर्ण जीवनपट कलात्मक व सुंदररीत्या मांडण्यात आला आहे. लतादीदींच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाचे विविध टप्पे यामध्ये दर्शवण्यात आले आहेत.

भौगोलिक सीमेची बंधने ओलांडतानाच जगभरातील चाहत्यांच्या मनात अजरामर जागा मिळवलेल्या लता मंगेशकर यांच्या स्वरांना त्यांच्या चाहत्यांकडून गेली कित्येक दशके मिळालेल्या प्रतिसादाची प्रतिकृती जणू ही या भित्तिशिल्पाच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लतादीदींच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाचा अविभाज्य भाग असणाऱ्या विविध वाद्यांचाही समावेश या भित्तिशिल्पामध्ये करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांपैकी 'मेरी आवाज ही पेहचान है' हे सुप्रसिद्ध गाण्याचे बोलदेखील या भित्तिशिल्पाचे भाग ठरले आहेत, हे विशेष!

Powered By Sangraha 9.0