कोल्हापूर : मोठ्ठ्या ताईंना आपलं राजकीय करिअर सावरावं लागत आहे. इतके वर्ष काम करुनही शरद पवारांच्या आजूबाजूला फिरणारे कुचकामी ठरले आहेत, असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता लगावला आहे. त्यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "शरद पवारांची फळी कुचकामी ठरली याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं. या वयातसुद्धा एका नेत्याला जिल्ह्यात, तालुक्यात फिरावं लागत आहे, याच्यासारखं वाईट दुसरं काहीही नसावं. त्यांच्या अवतीभोवती फिरणारे ज्यांना त्यांनी मोठं केलं ते सगळेच कुचकामी ठरले. त्यामुळे या वयात नेत्याला फिरावं लागत आहे. मोठ्ठ्या ताईंना आपलं राजकीय करिअर सावरावं लागत आहे. इतके वर्ष काम करुनही आजूबाजूला फिरणारे कुचकामी ठरले आहेत."
हे वाचलंत का? - "माझं नाव शरद पवार आहे! याद राखा!", पवारांनी कुणाला दिली धमकी?
"अजित पवार यांची कामाचा व्यासंग असलेला नेता म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांचं काम प्रचंड आहे. त्यामुळे त्यांनी केलेली विकास कामं आणि दांडगा जनसंपर्क यामुळे सुनेत्रा पवार निश्चितपणे जिंकतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. यातून मोठ्या ताईंचे मनस्वास्थ बिघडलेले दिसत आहे. त्यांचे वक्तव्य बघता मानसिक संतुलन ढळल्यानंतर झालेल्या स्थितीत त्या वावरताना दिसत आहेत," असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "विरोधकांच्या घराला आग लागलेली असताना ती न बघता त्यांचं लक्ष भाजपकडे आहे. तुम्ही आमची काळजी करु नका. आमचे नेते देवेंद्रजी अत्यंत प्रगल्भ नेतृत्व आहे. विरोधकांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. रोज सकाळी यायचं आणि तुतारी वाजवायची असं त्यांचं सुरु आहे. टीव्ही माध्यम हेच त्यांचं कार्यक्षेत्र झालेलं आहे. ते केवळ शब्दाचे पोकळ बाण सोडण्याचं काम करत आहेत. त्यामुळे फिल्डवर येऊन जर त्यांनी वस्तूस्थिती बघितली तर त्यांच्या वलग्ना बंद होतील," असेही त्या म्हणाल्या.