अभिनय क्षेत्रात कॉमेडी क्विन अशी ओळख निर्माण करणाऱ्या श्रेया बुगडेने व्यवसायात पदार्पण केले असून दादर येथे 'द बिग फिश एन्ड कंपनी' हे खवय्यांसाठी हॉटेल तिने सुरु केले आहे.
मुंबई : हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शकतो. त्याचेच उत्तर ‘महाएमटीबी’शी बोलताना श्रेया बुगडे हिने दिले आहे.
श्रेया म्हणाली की, “मी स्वयंपाकघरात फार रमत नाही, पण मला लोकांना खाऊ घालायला खुप आवडतं. आईकडे काही कार्यक्रम असेल तर माझे मित्र-मैत्रिणी तिथे जमतात आणि खाऊ पार्टी रंगलेली असते. आणि ज्यावेळी माझ्या म्हणजे सासरी जर का कोणी येणार असेल तर माझ्या घरातील स्वयंपाकीण अंजली हिच्या जीवावर मी सर्वांना घरी बोलावते. पण करोना काळातील लॉकडाऊनमध्ये जी स्वयंपाक करण्यास एक पिढी शिकली त्यापैकीच मी एक आहे. त्यामुळे मासे, चिकन असे मांसाहाराचे सर्व पदार्थ मी उत्तम बनवू शकते. त्यामुळे मी हे आवर्जून सांगते की मी प्युअर मांसाहारी आहे”, त्यामुळे श्रेयाच्या या उत्तरावरुन तिला उत्तम स्वयंपाक करता येतो आणि लॉकडाऊनची ही कृपा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
श्रेया बुगडे हिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमामुळे श्रेया महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. मात्र, श्रेयाने अभिनयाची सुरुवात बालनाट्यांपासूनच केली होती. मुळची पुण्याची असणाऱ्या श्रेया शालेय जीवनातच आपली अभिनयातील रुची ओळखून त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली होती. २०१२मध्ये श्रेयाने ‘तू तिथे मी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'फू बाई फू' या कार्यक्रमातून श्रेयाला विनोदी अभिनेत्री असा टॅग लागला. आणि आज महिला विनोदी कलाकारांमध्ये तिचे नाव अग्रेसर आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.