‘सहकारातून समृद्धी’ ही तशी नवीन घोषणा नाही. मात्र, वनवासी क्षेत्रातील व विशेषतः ग्रामीण महिलांनी सहकारी शेतीतून व सातत्याने प्रयत्न करून समृद्धी साधण्याचे सफल आक्रित झारखंडच्या महिला मंडळ सहकारी चळवळीने साध्य केले आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने अशाच काही महिला सक्षमीकरणाला चालना देणार्या उपक्रमांविषयी...
सहकारी तत्वावर कार्यरत झारखंडच्या महिला मंडळ सदस्यांमध्ये महिलांची संख्या ही सुमारे २० हजारांच्या आसपास असली, तरी त्यासाठी सुमारे २० वर्षांचा कालावधी जावा लागला, हे यासंदर्भात उल्लेखनीय. या नव्या उपक्रमाची सुरुवात २००४ मध्ये ‘प्रोफेशनल असिस्टंस फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन’ म्हणजेच ‘प्रदान’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून झाली, हे विशेष.‘प्रदान’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणार्या, नीलम टोप्नो यांच्यानुसार, झारखंडसारख्या तुलनेने मागास अशा राज्यातील वनवासी महिलांचे व त्यातही शेतीच्या माध्यमातून प्रगत काम सुमारे २० वर्षांपूर्वी सुरू केले. यासाठी महिला प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार छोट्या समूहातील महिलांना सामूहिकरित्या म्हणजेच सहकारी तत्त्वावर तसेच अधिक उत्पादक पद्धतीने शेती करण्यासाठी मूलभूत स्वरुपाचे व महत्त्वाचे प्रशिक्षण देण्यात आले.
ग्रामीण महिलांच्या या विशेष प्रशिक्षणासाठी महिलांच्या लहान गटांचे मोठे सहकार्य लाभले. स्थानिक शेती आणि शेतकर्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन, या प्रशिक्षणाचे नियोजन-आयोजन केले गेले. त्यानुसार या प्रशिक्षण सत्रांमध्ये अल्प भू-धारकांची शेती, महिलांची शेतकरी म्हणून भूमिका व जबाबदारी, प्रसंगी कमी पाण्यासह शेतीची उत्पादकता वाढवणे इत्यादींचा समावेश करण्यात आला. त्याशिवाय ‘प्रदान शेती प्रशिक्षण योजने’अंतर्गत त्या वनवासी महिलांना सहकारी शेतीच्या जोडीलाच फळे व भाजीपाला लागवडीबद्दलही प्रशिक्षण देण्यात आले. या दुहेरी शेती पद्धतीचा त्या महिलांना अगदी सुरुवातीपासूनच लाभ झाला.झारखंडच्या ‘प्रदान’च्या पुढाकारापासून प्रेरणा घेऊन, सहकारी प्रयत्नांना इतर राज्यातसुद्धा वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला. सद्यःस्थितीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, आज कुटिरोद्योग वा ग्रामोद्योगांच्या क्षेत्रातील सक्रिय असणार्या एकूण महिलांपैकी सर्वाधिक म्हणजे ८० टक्के महिला या ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. ही आकडेवारी देशातील कृषी व ग्रामीण क्षेत्रांवर अवलंबून असणार्या एकूण संख्येच्या ४० टक्के एवढी आहे.
याच संख्यावारीच्या आधारित ही बाब महिलांच्या लक्षात आली व विविध राज्यांतील महिला त्यादृष्टीने कार्यरत होऊ लागल्या. या संदर्भातील प्रमुख उदाहरण म्हणजे, तामिळनाडूतील ’कलानगरी’ या महिला स्वयंसेवी संस्थेचे देता येईल. ‘कलानगरी’ ही संस्था कावेरी खोर्यातील दलित विधवा व गरजू महिलांसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून त्या परिसरातील सुमारे ४५ दलित समाजातील विधवा महिलांनी सहकारी तत्त्वावर शेती करून आपला व आपल्या कुटुंबाचा विकास साधला आहे.असेच एक दुसरे उदाहरण म्हणून पुण्याच्या ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’ या स्वयंसेवी संस्थेचे देता येईल. या संस्थेचे २०१४ पासून राज्यातील मराठवाडा या दुष्काळग्रस्त क्षेत्रापासून या नव्या प्रयोगाची सुरुवात केली. त्यानुसार ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’च्या नव्या प्रयोगात महिलांचा प्रामुख्याने व विशेषत्वाने विचार करण्यात आला. या प्रयत्नांमध्ये प्राधान्य देण्यात आले, ते महिलांना. कौटुंबिक शेतीतील केवळ शेतमजुरी पुरतेच त्यांना मर्यादित न ठेवता, त्यांना घरच्या वा पिढीजात शेतीत मालकीसह हक्कवजा भागीदारी देण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले व या प्रयत्नांना अपेक्षेनुरूप फळ मिळत गेले.
या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात गावपातळीवर विशेष व प्रयत्नपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार घरटी उपलब्ध असणार्या शेतजमिनीपैकी काही हिस्सा घरच्या महिलेच्या नावावर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्याच्याच जोडीला घरच्या महिलांना शेती मालकीसह प्रत्यक्ष शेती करण्यासाठी प्रयत्न केले गेले. ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’ उपक्रमाचे प्रकल्प संचालक उपमन्यू पाटील यांच्या मते, संस्थेच्या प्रयत्नांमुळे गावापासून घरापर्यंत महिलांना प्रतिष्ठा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याशिवाय शेतीविषयक कागदपत्रांच्या माध्यमातून महिलांना कागदपत्रांपासून कार्यालयांपर्यंत प्रतिष्ठा मिळवून दिली, हे विशेष.याशिवाय आपल्या आजवरच्या प्रयत्नातून ‘स्वयम् शिक्षण’ उपक्रमातून ‘स्वयम् शिक्षण’ प्रयोगातून सध्या शेतकर्यांच्या सात शेतकी उत्पादन कंपन्या सुरू केल्या असून, त्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. ग्रामीण क्षेत्रातील या शेतकर्यांच्या शेतकी उत्पादन कंपन्यांचे मुख्य म्हणजे, त्या सार्या कंपन्यांमध्ये शेतकरी महिलाच भागधारक आहेत.
शेतीशी आधारित या उपक्रमांमध्ये आपला मालकी हक्क व कर्तबगारीसह सुमारे २२ टक्के महिला सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. यामध्ये शेतकी उत्पादन कंपन्यांमधील संचालक म्हणून काम करणार्या महिलांचा देखील समावेश आहे. अधिकांश महिलांच्या नावे साधारणतः एक एकरपर्यंत शेतजमीन आढळून येते. त्यावर उपाययोजना म्हणून या अल्पभूधारक महिलांनी ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’च्या सदस्य महिलांशी संपर्क साधून, सहकारी तत्त्वावर व सहकार्यासह शेती करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. शेतीसाठी आवश्यक कृषी उपकरणांचा सामूहिक वापर करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे संबंधित महिलेला छोट्या स्वरुपातील आपली शेती करणे कमी खर्चासह शक्य झाले. अशा प्रकारे या महिलांनी आपापल्या शेती खर्चावर नियंत्रण ठेवतानाच शेतीला अधिक उपयुक्त व उत्पादक बनविण्यासाठी या महिला शेतकर्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन-मार्गदर्शन दिले गेले. सेंद्रिय शेती उत्पादनाकडे ग्राहक-जनतेचा वाढता प्रतिसाद असल्याने, या महिलांची सामूहिक प्रयत्नांसह केलेली सेंद्रिय शेती अधिक उत्पादक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली, हे यासंदर्भात उल्लेखनीय.
याच प्रयत्नातून २०२० मध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यस्तरीय ’जीवनमान विकास योजने’अंतर्गत ‘संयुक्त राष्ट्र संघा’च्या सहकार्यातून ग्रामीण महिलांच्या सहकारी तत्त्वावरील शेतीला विशेष प्रोत्साहन देण्यात आले. उत्तर प्रदेशात हा उपक्रम आश्चर्यकारकच नव्हे, तर उत्साहवर्धक ठरला. आज याच प्रयत्नांच्या फलस्वरूप शेती करणार्या ग्रामीण महिला सहकारी तत्त्वावर केवळ शेतीच करीत नसून, कृषी उत्पादनांचा विक्री व्यवसायसुद्धा यशस्वीपणे करीत आहेत. अशा प्रकारे शेतीपासून कृषी उत्पादनांच्या विक्री-व्यवसायाला उत्तर प्रदेशातील महिला स्वाभिमानासह करीत आहेत.ग्रामीण महिलांच्या ‘महिला मंडळां’ना ‘प्रदान’ यासारख्या उपक्रमांमधून महिलांना शेती मालकीसह सहकारी तत्त्वाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्याचे महनीय काम केले आहे. या आर्थिक स्वावलंबनासह त्यांच्यापैकी विशेष गरजू महिलांना त्यांच्या संकटकाळात गरजेनुसार भावनिक पाठबळ व आत्मविश्वासाशिवाय प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या महिलांना दुर्दैवाने आलेले वैधव्य, घरच्यांचा जाच, प्रसंगी पतीचा त्रास इ. प्रसंगांवर मात करण्याचे सामर्थ्य या महिलांना प्राप्त झाल्याचे दिसते.उत्तर प्रदेशपासून झारखंडपर्यंतच्या मुख्यतः शेतीवर आधारित ग्रामीण क्षेत्रात सक्रिय व क्रियाशील महिलांनी परस्पर सहकार्यातून व ‘प्रदान’सारख्या प्रयत्नातून घरच्या शेतीची मालकी तर मिळविलीच; शिवाय सहकारी तत्त्वावरील शेतीतून घरची धान्याची गरज तर भागविलीच; शिवाय पूरक उत्पन्नाचा फायदा स्वतःला व सहकारी महिलांना ‘प्रदान’ केला आहे. ‘धान्यातून धनाकडे’ असा या महिलांच्या प्रगतीचा प्रवास सर्वस्वी प्रेरणादायी ठरला आहे.
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)