जाळ्यात अडकून १३८ मादी कासवांचा मृत्यू; प्रत्येकीच्या पोटात होती १०० हून अधिक अंडी

07 Mar 2024 15:00:28
sea turtles



मुंबई (प्रतिनिधी) -
 आंध्र पद्रेशमधील संगमेश्वरम किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून १३८ सागरी कासवांचा (sea turtles) मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मासेमारीचे जाळे अनधिकृतपणे लावल्याची माहिती त्याठिकाणी काम करणाऱ्या 'ट्री फाऊंडेशन'ने दिली आहे. (sea turtles)

सध्या राज्याच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनाऱ्यांवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू आहे. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या माद्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येत आहेत. अशा परिस्थितीत आंध्रप्रदेशमधील कृष्णा तालुक्यातील संगमेश्वरम किनाऱ्यावर सागरी कासवांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. संगमेश्वरम किनाऱ्यालगत पाकट (स्टिंग रे) माशांना पकडण्यासाठी जाळी लावण्यात आली होती. ओडिशा, आंधप्रदेश या राज्यांमध्ये कासव विणीच्या काळात अशा पद्धतीने किनाऱ्यालगत मासेमारी करणे बेकायदा आहे.

स्टिंग रे माशांना पकडण्यासाठी किनाऱ्यालगत लावलेल्या या जाळ्यांमध्ये अंडी घालण्यासाठी येऊ पाहणाऱ्या कासवांच्या माद्या अडकल्या. जाळ्यात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत कासवांची मोजणी केल्यानंतर ती आॅलिव्ह रिडले प्रजातीची १३८ कासवे असल्याचे निष्पन झाले. त्यातील प्रत्येक कासवाच्या पोटात १०० हून अधिक अंडी सापडली. 'ट्री फाऊंडेशन'ने समाज माध्यमांवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास, सध्या कोकण किनारपट्टीवर देखील सागरी कासवे अंडी घालण्यासाठी येत आहेत. मात्र, राज्यात या काळात किनारपट्टीभागात मासेमारी करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. आजवर राज्यात जाळ्यात अडकून मोठ्या संख्येने कासवे मृत पावल्याच्या अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र, त्यासंदर्भातील खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0