मुंबई : संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार बुधवार दि. ६ मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरित केले गेले. काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या या पुरस्कार्थींची संगीत, नृत्य, नाट्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा अनेक प्रकारातून एकूण ९२ नावे निवडली गेली. २०२२ आणि २०२३ सालचे पुरस्कार एकत्रित वितरित झाले. या ९२ कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील ३ कलाकारांचा समावेश होता. अभिनयासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ तर अनन्या नाटकासाठी तरुण अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला हा पुरस्कार प्राप्त झाला. संगीत शाखेतील पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांना गौरविण्यात आले. अशोक सराफ यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, त्यानंतर आता त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित केला गेला.
अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या तसेच संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील कलाकारांना घडवण्याचे श्रेय संगीत नाटक अकादमीला दिले जाते. अनेक कलावंत या अकादमीमुळे घडले तसेच नावारूपास आले. भारतीय कला संस्कृती समृद्ध करणाऱ्या कलावंतांचा मेळाच या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाहायला मिळाला.