तडीपार...पण कोण?

06 Mar 2024 21:57:02
Uddhav Thackeray political status


उद्धव ठाकरे यांनी भाजपला तडीपार करण्याची घोषणा दिली आहे. घोषणा कशा शोधायच्या आणि द्यायच्या, हे राजनेत्याकडून शिकले पाहिजे. याबाबतीत त्यांची प्रतिभा प्रतिभावंत कवीला देखील मागे टाकणारी असते. सर्वच घोषणा लोकमानसाची पकड घेतात असे नाही. लोकमानसाची पकड घेण्यासाठी, घोषणेतील आशय लोकांच्या मनात असावा लागतो. तेव्हा ती घोषणा लोकघोषणा होते.

लेखाची सुरुवात दोन संवादातून करतो. पहिला संवाद स्वाती भागवत यांच्याशी झाला. त्या सिंगापूरला असतात. आणीबाणीच्या काळात त्या अंधेरीला राहत होत्या. भूमिगत असताना मी त्यांच्या घरी आठ दिवस राहिलो होतो. गेल्या महिन्यात त्यांचा फोन आला. त्यांनी आपले नाव सांगितले, “मला ओळखलं का असं विचारलं?‘’ लगेचच काही आठवण होईना. मग त्यांनी आणीबाणीची आठवण सांगितली. मला खूप-खूप आनंद झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.नंतर त्या मला म्हणाल्या की, ”मी आता सिंगापूरला मुलाकडे राहते. मला मतदान करायला, भारतात यायचे आहे आणि मोदींना मतदान करायचे आहे. 2019 सालीदेखील मी आले होते. तेव्हा मतदारयादीत माझे नाव गाळले गेले. आता तुम्ही मला जरा मदत करा.“ हे काम मी कृष्णात कदम याला सांगितले. ‘विवेक’चा प्रतिनिधी म्हणून तो मंत्रालयात सतत वावरत असतो. त्याने सर्व चौकशी करून, काय-काय करायला लागेल, हे मला सांगितले. तो सर्व मजकूर मी स्वाती भागवत यांना पाठवून दिला. मोदी यांना मत देण्यासाठी, भारतात येण्याचा त्यांचा संकल्प बघून, माझे हृदय भरून आले.

दुसरा संवाद ‘सेवा विवेक’च्या भालिवली केंद्रातील प्रगती भोईर हिच्याशी झाला. प्रगती भोईर भाजप केंद्रामध्ये आठ-दहा वर्षे काम करते आहे. फार तन्मयतेने तिचे काम चाललेले असते. परिसरातील आदिवासी गावांशी आणि महिलांशी तिचा संपर्क आणि संवाद विलोभनीय असतो. तिच्याबरोबर मी काही गावांचे प्रवासदेखील केले आहेत. भालिवली केंद्रात जाताना, तिच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन जावे लागते. कारण, तिचा पहिलाच प्रश्न असतो की, ”सर माझ्यासाठी काय आणले?”यावेळी तिने मी दिलेल्या खाऊची परतफेड या संवादाने केली. ती अंबाडी गावात राहते. अंबाडी गावात रविवारी फार मोठा आठवडी बाजार भरतो. घरी लागणार्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी, ती बाजारात गेली होती. या बाजारात ओल्या मासळीपासून कडधान्यांपर्यंत सर्व काही मिळते. आगाशी गावातून आलेली एक कोळीण मासे विकत बसली होती आणि येणार्‍या प्रत्येक गिर्‍हाईकाला ती सांगत होती की, ”यावेळी मत मोदींनाच द्यायचे आहे. अजिबात विसरता कामा नये. अन्य कोणालाही मत देऊ नका. त्यात तुमचे भले होणार नाही.“ तिचा हा आदेश प्रत्येक ग्राहकासाठी होता.

प्रगतीने तिला विचारले की, ”तू भाजपची कार्यकर्ती आहेस का?“ ती म्हणाली की, “मुळीच नाही. मी कोणत्याही पक्षाची नाही.“ त्यावर प्रगतीने तिला विचारले की, ”मग तू मोदींना मत द्या, असे का सांगते?“ त्यावर ती म्हणाली की, ”मोदी देवमाणूस आहे. त्याने आम्हा कोळी महिलांसाठी खूप काम केले आहे. आम्ही मोदी राज्यात सुखी आहोत आणि सुरक्षित आहोत. म्हणून पुन्हा मोदीच आले पाहिजेत.” प्रगतीचे नेहमीचे बोलणेदेखील हावभावपूर्ण असते. तिने त्या कोळी महिलेचा संवाद मला साभिनय करून सांगितला.त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचे भाषण प्रसिद्धी माध्यमांवर झळकत होते. धारावीच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, ”गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते, तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. पण, आता भाजपचे तख्त फोडावेच लागेल. ‘अबकी बार भाजप तडीपार’ हा आपला नारा असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण, तुम्ही कसे 400 पार होता, हे मी बघतोच.”

उद्धव ठाकरे यांची रोजच भाषणे होतात आणि रोजच ते भाजपवर भरपूर ताशेरे ओढत असतात. त्याबद्दल आपल्याला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. विरोधी पक्षाचा नेता भाजपची स्तुती कशी करणार? नरेंद्र मोदी यांच्याबद्दल चार चांगले शब्द कसे बोलणार? मी ’सेन्सॉर बोर्डा’चा सदस्य म्हणून मला चित्रपट बघावे लागतात. चित्रपटात व्हिलन असतो. त्याची भाषा सभ्य लोकांची भाषा नसते, त्यात शिवराळपणा असतो. माझ्याबरोबरचे सभासद त्यावर आक्षेप घ्यायला सुरुवात करतात. मग त्यांना समजून सांगावे लागते की, अरे तो व्हिलन आहे. व्हिलन काय रामरक्षा म्हणणार की, हनुमान चालिसा म्हणणार? तो व्हिलन वाटायचा असेल, तर त्याच्या तोंडी तशीच भाषा असायला हवी.चित्रपट हा पडद्यावर बघावा लागतो. राजकीय चित्रपट समाजात बघावा लागतो. या राजकीय चित्रपटाला ‘सेन्सॉरशिप’ नसते. ज्याला जे वाटेल, ते तो बोलत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला, तर कोणता नेता काल कोठे होता, आज कोठे आहे, उद्या कोठे जाईल हे काही सांगता येत नाही! भूमिका बदलली की, भाषा बदलते. चित्रपटातील नायक वेगवेगळ्या चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका करतात. त्या भूमिकेवरून त्याच्या संवादाची भाषा ठरते. राजनेत्यांचीही तशीच स्थिती असते. भाजपबरोबर उद्धव जेव्हा होते, तेव्हा त्यांची भाषा, मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची भाषा आणि खुर्ची गेल्यानंतरची त्यांची भाषा एकसारखी नाही, हे सूज्ञ वाचक जाणतात.

काही दिवसांपूर्वी ते म्हणाले की, ”आपण कधीही कट्टर शत्रू नव्हतो, हे मला मोदीजींना सांगायचे आहे. आजही आम्ही शत्रू नाही. आम्ही तुमच्यासोबत होतो, शिवसेना तुमच्यासोबत होती, आम्ही गेल्या वेळी आमच्या युतीचा प्रचार केला, विनायक राऊतसारखे आमचे खासदार निवडून आल्याने तुम्ही पंतप्रधान झालात; पण नंतर तुम्ही आम्हाला तुमच्यापासून दूर केले. आमचे हिंदुत्व आणि भगवा ध्वज अजूनही शाबूत आहे; पण आज भाजप तो भगवा ध्वज फाडण्याचा प्रयत्न करत आहे.‘’‘आम्ही तुमचे शत्रू नाही आहोत’ आणि ‘अब की बार भाजपा तडीपार’ ही दोन्ही वाक्ये परस्परांशी विसंगत आहेत. पण, राजकारणी माणूस म्हणतो की, सुसंगती हा गाढवाचा गुणधर्म आहे. आम्ही वाघ आहोत. सुसंगतीची अपेक्षा तुम्ही आमच्याकडून करू नये. उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या वाक्याचा अर्थ असा केला गेला की, त्यांना भाजपबरोबर पुन्हा यायचे आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”ते आता शक्य नाही. आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, असे नसून आमची मने दूर गेलेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेला विश्वासघात आम्ही विसरू शकत नाही.” भाजपच्या जवळ येण्याचा मार्ग देवेंद्र फडणवीस यांनी बंद करून टाकला आहे. पण, राजकारणात केव्हा काय घडेल, हे आपण सांगू शकत नाही.

उद्धव ठाकरे यांनी भाजपला तडीपार करण्याची घोषणा दिली आहे. घोषणा कशा शोधायच्या आणि द्यायच्या, हे राजनेत्याकडून शिकले पाहिजे. याबाबतीत त्यांची प्रतिभा प्रतिभावंत कवीला देखील मागे टाकणारी असते. सर्वच घोषणा लोकमानसाची पकड घेतात असे नाही. लोकमानसाची पकड घेण्यासाठी, घोषणेतील आशय लोकांच्या मनात असावा लागतो. तेव्हा ती घोषणा लोकघोषणा होते. महात्मा गांधीजींची ‘चले जाव’ ही घोषणा लोकघोषणा झाली; कारण ती घोषणा लोकांच्या मनातच होती. मोदी सरकार नको, हे उद्धव ठाकरेंना वाटू शकते, तसे वाटून घेणे, हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे; परंतु लोकांनाही तसेच वाटले पाहिजे, हे संभवत नाही.लोकभावना काय आहेत, हे लेखाच्या सुरुवातीला जे दोन संवाद दिलेले आहेत, त्यातून प्रभावीपणे व्यक्त झालेले आहे. स्वाती भागवत या उच्चभ्रू समाजातील आहेत. सिंगापूरला राहतात. त्यांनाही असे वाटते की, मोदींचे सरकारच आले पाहिजे आणि आगाशी गावातील कोळी भगिनी म्हटले, तर शेवटच्या पंक्तीतील महिला आहे, तिलाही असेच वाटते की, मोदीच आले पाहिजेत. या दोन्ही संवादांचा अर्थ एवढाच की, जनतेने ठरविले आहे की, ‘अब की बार फिरसे मोदी सरकार बाकी सब तडीपार!’

उद्धव ठाकरे जोपर्यंत भाजपबरोबर होते, तोपर्यंत ते राजकीय सुरक्षेच्या कवचात होते. आता ते काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबर आहेत. शरद पवार यांची राजकीय प्रतिमा ज्या नेत्यावर अजिबात विश्वास ठेवता येत नाही, अशी झालेली आहे. अजितदादा पवार यांनी मागील पाच-सहा महिन्यांत त्यांचे भरपूर किस्से सांगितलेले आहेत आणि काँग्रेसचा विचार केला, तर आताची काँग्रेस म्हातारी झाली आहे आणि शेवटच्या उचक्या देत आहे. काँग्रेसचे घरच शाबूत नाही. ती काँग्रेस उद्धवना कसे तारणार? भाजपबरोबर युती केल्यामुळे, 19 खासदार निवडून आणता आले. पवार आणि काँग्रेसबरोबर गेल्यामुळे एक आकडी किती खासदार येतील, हेदेखील सांगणे कठीण आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मते उबाठाच्या उमेदवाराकडे वळतील, हे दिवास्वप्न आहे आणि मूलभूत प्रश्न असा आहे की, मुळात या दोन पक्षांच्या मतांची शाश्वती तरी किती आहे? भाजप तडीपार होण्याऐवजी उबाठालाच तडीपार केले तर...?


Powered By Sangraha 9.0