संदेशखालीच्या नारीशक्तीचे वादळ बंगालमध्ये घोंघावणार!

06 Mar 2024 18:41:14
Narendra Modi on Sandeshkhali case

नवी दिल्ली
: तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत महिलांविषयी घोर पाप घडले आहे. मात्र, असे कृत्य करणाऱ्यांना वाचविण्याचे काम राज्य सरकार करत आहे. त्यामुळे संदेशखालीच्या नारीशक्तीचे वादळ संपूर्ण बंगालमध्ये घोंघावणार आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारासात येथे भाजपतर्फे आयोजित नारीशक्तीवंदन अभिनंदन कार्यक्रमास संबोधित केले. या कार्यक्रमास संदेशखालीमधील महिलादेखील उपस्थित होत्या.

तृणमूल काँग्रेसचे सरकार महिला विरोधी असून आमच्या भगिनींना सुरक्षा देऊ शकत नाही. त्याचवेळी गुन्हेगारांना संरक्षण देण्यात ममता बॅनर्जी सरकार व्यस्त आहे. या सरकारच्या काळात राज्यात महिला शक्तीवर अत्याचार होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये महिला संतप्त आहेत. संदेशखालीपासून सुरू झालेले हे वादळ केवळ संदेशखालीपुरतेच मर्यादित राहणार नाही तर पश्चिम बंगालच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की बंगाल सरकार एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे. मात्र, त्यांना उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना धक्का बसला आहे. तृणमूलचे नेते गरीब, दलित आणि आदिवासी महिलांवर अत्याचार करत आहेत. बंगालच्या महिलांपेक्षा तृणमूल सरकारचा आपल्या नेत्यांवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे संदेशखालीच्या आमच्या माता – भगिनींना भाजप संरक्षण देण्यास सज्ज आहे, असाही दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बंगालच्या जनतेस दिला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण केले तसेच काही प्रकल्पांची पायाभरणी केली. शहरी वाहतूक क्षेत्राला पूरक असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये मेट्रो रेल्वे आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (आरआरटीएस) यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी सर्व मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला आणि कोलकात्यामध्‍ये भारतातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोने, एस्प्लेनेड - हावडा मैदान मेट्रो मार्गावर प्रवास केला. या मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी शाळकरी मुलांशीही संवाद साधला.

 
Powered By Sangraha 9.0