"ठाकरेंचा एकच परिवार, केवळ पाटणकर!"

05 Mar 2024 12:17:58

Thackeray & Patankar


मुंबई :
उद्धव ठाकरेंनी पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कुठल्याही परिवाराला आपला परिवार मानलं नाही. सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडलं, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केली आहे. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
सोमवारी भारत देशाचा प्रत्येक नागरिक हा माझा परिवार आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. यावरुन देशभरातील प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मी सुद्धा मोदीजींच्या परिवाराचा हिस्सा आहे, अशी टॅगलाईन लिहिली. यावर संजय राऊतांनी मोदीजींना देशाला आपल्या परिवार म्हणण्याचा अधिकार आहे का, अशी टीका केली. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांचे मालक मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला तरी स्वत:चा परिवार मानलं का? कारण त्यावेळी त्यांनी पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कुठल्याही परिवाराला आपला परिवार मानलं नाही. सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडलं. सामान्य जनता सोडा स्वत:च्या शिवसैनिकांच्या परिवाराला तरी उद्धवजींनी आपला परिवार मानलं का? त्यांचं सरकार हे ठाकरे सरकार नाही तर पाटणकर सरकार होतं. सगळे कॉन्ट्रॅक्ट, सगळी कामं हे सगळं पाटणकरांसाठी होतं."
 
"एवढे शिवसैनिक ईडी आणि सीबीआयच्या संकटात असताना फक्त पाटणकरांसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन पायघड्या घातल्या. आताही दिशा सालियन प्रकरणातून माझ्या मुलाला वाचवा हीच त्यांची विनंती आहे. म्हणजे केवळ स्वत:च्या परिवाराकडे ते बघतात. महाराष्ट्राची जनता, शिवसैनिकांचा परिवार ज्यांचा नाही ते मोदीजींवर टीका करतात," असे ते म्हणाले.
 
संजय राऊतांचा परिवार नेमका कुठला?
 
"ज्या पंतप्रधानांनी आपलं पुर्ण आयुष्य या देशासाठी वाहून घेतलं आहे त्यांच्यावर परिवारवादावरून टीका करताना संजय राऊतांना लाज वाटायला हवी. राऊतांनी परिवाराशिवाय दुसरं काही पाहिलंय का. त्यांनी कधीही परिवाराच्या पलिकडे विचार केलेला नाही. संजय राऊतांचा परिवार नेमका भारतातला आहे की, रशियातला आहे हा प्रश्नही विचारण्यासारखा आहे," असा टोलाही राणेंनी लगावला.
 
ते पुढे म्हणाले की, "पत्राचाळमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबांना तुम्ही स्वत:चा परिवार मानलं असतं तर आज ती लोकं बेघर होऊन रस्त्यावर आली नसती. संजय राऊत हे विसरतात की, २०१९ पर्यंत त्यांनीसुद्धा मोदीजींचा परिवार म्हणूनच सगळ्या प्रकारचे फायदे घेतलेले आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये असलेली सत्ता असो किंवा त्यांचे निवडून आलेले १८ खासदारही मोदीजींच्या परिवाराचा हिस्सा असल्यानेच निवडून आले. २०१९ ला मोदीजींचा फोटो लावून आमदार निवडून आणलेत. त्यानंतर मनात गद्दारी आणि बेईमानी आल्याने आम्ही आता मोदीजींच्या परिवाराचा भाग नाही असे सांगून मोकळे झाले," असेही नितेश राणे म्हणाले.



Powered By Sangraha 9.0