नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करता यावा, यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र' स्थापन करण्यात येणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी सरकारतर्फे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेतील प्रमाणपत्र, अभ्यासक्रम, पदविका, मराठा साम्राज्याची सैन्य व्यूहरचना, किल्ले आणि तटबंदी यामधील पदवी आणि पीएचडीही करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.
तसेच यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभारही मानले. ते पुढे म्हणाले की, "ज्या विद्यापीठाच्या आवारात भारत तेरे तुकडे हो हजार अशा औरंगजेबी घोषणा झाल्या होत्या, त्याच आवारात छत्रपती शिवाजी महाराज आणि हर हर महादेवचा जयघोष होणार आहे," असेही शेलारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.