केरळ विद्यापीठातील युवक महोत्सवाचे इस्लामीकरण आणि वादंग

04 Mar 2024 21:53:59
 Kerala University Youth Festival


केरळ विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’स वादग्रस्त नाव दिल्याबद्दल, विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या महोत्सवाच्या लोगोबद्दलही आक्षेप घेतला जात आहे. या लोगोमध्ये इस्रायलच्या नकाशावर पॅलेस्टिनी स्कार्फ दाखविण्यात आला आहे. विद्यापीठाचा महोत्सव असताना, त्यात इस्रायल-हमास संघर्ष यांचा अंतर्भाव कशासाठी? असे उद्योग करणार्‍या आयोजकावर कडक कारवाई करायला हवी.
 
केरळ विद्यापीठाच्या ’युवक महोत्सवा’स ‘इन्तिफादा’ असे नाव दिल्यावरून कोल्लम, जिल्ह्यातील निलमेल येथील एनएसएस महाविद्यालयातील आशिष ए. एस. नावाच्या विद्यार्थ्याने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. केरळ उच्च न्यायालयाने त्या विद्यार्थ्याने केलेल्या अर्जाची दखल घेतली आहे. केरळ विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘युवक महोत्सवा’स अरबी भाषेतील ‘इन्तिफादा’ हे नाव देण्याची काहीही आवश्यकता नव्हती. या अरबी शब्दाचा अर्थ होतो-‘नागरी उठाव.’ इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षादरम्यान धर्मांधांनी या शब्दाचा वापर केला आहे. या अशा नावामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये जातियवाद निर्माण होईल, असे अर्जदाराच्या वकिलाने न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्या. कुंजीकृष्णन यांनी केरळ सरकार आणि केरळ विद्यापीठास नोटिसा बजाविल्या आहेत. ’युवक महोत्सवा’स असे वादग्रस्त नाव दिल्याबद्दल, विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या महोत्सवाच्या लोगोबद्दलही आक्षेप घेतला जात आहे. या लोगोमध्ये इस्रायलच्या नकाशावर पॅलेस्टिनी स्कार्फ दाखविण्यात आला आहे.
 
 विद्यापीठाचा महोत्सव असताना, त्यात इस्रायल-हमास संघर्ष यांचा अंतर्भाव कशासाठी? असे उद्योग करणार्‍या आयोजकावर कडक कारवाई करायला हवी. हा युवक महोत्सव दि. ७ मार्च ते ११ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २०० महाविद्यालयांमधील तीन हजार विद्यार्थी सहभगी होणार आहेत. आता केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी लक्ष घातले आहे. न्यायालयापुढे आज पुन्हा हे प्रकरण येणार आहे. केरळ विद्यापीठामध्ये धर्मांध शक्ती कशाप्रकारे विषवल्ली जोपासत आहेत, त्याची कल्पना यावरून यावी. केरळ उच्च न्यायालय या प्रकरणी काय निकाल देते, याकडे आता देशप्रेमी जनतेचे लक्ष आहे.
 
आसामच्या मुख्यमंत्र्यांना ‘सीख्ज फॉर जस्टिस’ची धमकी
 
‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह आणि त्याचे नऊ साथीदार सध्या आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात आहेत. स्वत:स ‘प्रतिभिंद्रनवाले’ समजून चालणार्‍या अमृतपालसिंह याने बरेच दिवस पंजाब पोलिसांना गुंगारा दिला होता. पण, अखेर त्यास पकडण्यात आले आणि त्याची आणि त्याच्या साथीदारांची रवानगी आसामच्या दिब्रुगढ येथील कारागृहात करण्यात आली होती. या अमृतपालसिंह आणि त्याच्या साथीदारांना अमृतसरला न हलविल्यास किंवा त्या सर्वांचे काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, अशी धमकी स्वत:स ‘सीख्ज फॉर जस्टिस’ संघटनेचा सदस्य म्हणविणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. बंदी घालण्यात आलेल्या ’सीख्ज फॉर जस्टिस’ संघटनेच्या सदस्याने दिलेली धमकी लक्षात घेऊन, मुख्यमंत्री सरमा यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने ही धमकी दिली होती, त्याच्या म्हणण्यानुसार, अमृतपालसिंह आणि त्याच्या साथीदारांचा कारागृहामध्ये छळ केला जात आहे. अमृतपालसिंह आणि नऊ जण कारागृहात उपोषण करीत आहेत. त्यामुळे त्यांचे काही बरेवाईट झाल्यास, त्याचे गंभीर परिणाम आसामच्या मुख्यमंत्र्यांना भोगावे लागतील, असे धमकी देणार्‍या इसमाने म्हटले आहे. अमृतपालसिंह यास ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’खाली पंजाब पोलिसांनी एप्रिल २०२३ मध्ये अटक केली होती आणि त्यास विमानाने आसामला हलविण्यात आले होते.
 
 अन्य नऊ जणांनाही ‘रासुका’ लावण्यात आला आहे. त्या दहा जणांना अमृतसरला न हलविल्यास, गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच या संदर्भात ’सीख्ज फॉर जस्टिस’ संयुक्त राष्ट्रांमध्ये तक्रार करणार असल्याचे धमकी देणार्‍याने सांगितले. दिब्रुगढ कारागृहातील एखादा सिंह जरी शहीद झाला, तर गंभीर परिणाम होतील. खलिस्तानवादी शीख आपल्या शत्रूंना मातीत गाडतील. ‘सीख्ज फॉर जस्टिस’चा नेता गुरपतवंतसिंह पन्नू याचा हा संदेश आहे, असे धमकी देणार्‍याने सांगितले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना, ”तुम्ही खलिस्तानींना एवढे का घाबरता? धमकी मला दिली आहे आणि तुम्हीच अधिक घाबरलेले दिसता,” असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री सरमा यांनी ही धमकी गंभीरपणे घेतली नसली, तरी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मुख्यमंत्र्यांना एप्रिल २०२३ मध्येही अशीच धमकी देण्यात आली होती. अलीकडेच म्हणजे दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दिब्रुगढ कारागृहातील रासुका कोठडीमध्ये एक स्मार्ट फोन, एक की पॅड फोन, की बोर्डसह टीव्हीचा रिमोट कंट्रोल, स्पाय कॅम पेन, पेन ड्राईव्ह, ब्ल्यूटूथ हेडफोन आदी वस्तू सापडल्या होत्या. खलिस्तान समर्थकांचे काय-काय उद्योग चालले आहेत, त्याची कल्पना यावरून यावी!
 
 
मिनिकॉय बेटांवर ‘आयएनएस जटायू’ नौदल तळ

हिंदी महासागरातील मालदीवमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकीमध्ये तेथे चीनधार्जिणे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आलेल्या सरकारने त्या देशामध्ये असलेले भारतीय सैन्य काढून घ्यावे, असे भारतास सांगितले. तेथील विरोधी पक्षांचा या कृतीस विरोध असतानाही, नवीन सरकारने हा आग्रह धरला. मालदीवची ही चीनधार्जिणी चाल लक्षात घेऊन, भारतानेही पावले उचलली आहेत. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, या हेतूने मालदीवपासून अवघ्या ५०७ किमी अंतरावर असलेल्या भारतीय बेटांवर नौदल तळ उभारण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्या नौदल तळावर सर्व सुविधा निर्माण केल्या जात आहेत. हा नौदल तळ पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर, तेथून भारतीय लढाऊ विमाने आकाशात झेप घेतील आणि हिंदी महासागराच्या पश्चिम भागावर लक्ष ठेवतील. हिंदी महासागर परिसरात आपले महत्व वाढविण्यासाठी, चीनने मालदीवला जवळ केले आहे. मालदीवही इतकी वर्षांची भारताचे मैत्री तोडून, चीनच्या आहारी गेला आहे. त्यामुळेच हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, भारत ‘आयएनएस जटायू’ नौदल तळ उभारत आहे.

हा नौदल तळ मिनिकॉय बेटांवर उभारला जात आहे. मिनिकॉय बेटे ही सर्वात जास्त जहाज वाहतूक होत असलेल्या ‘नाईन डिग्री चॅनेल’ जवळच आहेत. हा सागरी मार्ग मालदीवच्या बेटापासून अवघ्या १३० किमी अंतरावर आहे. पंतप्रधान मोदी यांनी या बेटास भेट दिल्यानंतर दोन्ही देशांमधील समाजमाध्यमांवर शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यातून उभय देशांमधील राजनैतिक संबंधही अत्यंत ताणले गेले. मालदीवमधील मोहम्मद मुईज्जू सरकारने चीनच्या जहाजास श्रीलंका सरकारने अनुमती नाकारली असताना, आपल्या बंदरात ते नांगरण्यास अनुमती दिली. या सगळ्या घडामोडी लक्षात घेऊन, भारतीय पर्यटकांनीही मालदीववर बहिष्कार टाकण्यास प्रारंभ केला. ’आयएनएस जटायू’ हा नौदल तळ प्रारंभी छोट्या प्रमाणात असेल. काही अधिकारी आणि नौसैनिक तेथे असतील. नंतर भारतीय लढाऊ विमाने तेथून झेपावतील, एवढी त्या तळाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या या तळामुळे हिंदी महासागरात घुसखोरी करीत असलेल्या, चीनवर वचक बसण्यास मदत होईल.

दत्ता पंचवाघ
Powered By Sangraha 9.0