पोलिसांची मोठी कामगिरी!, "साडेचार लाखांचा..."

04 Mar 2024 22:03:20
Thane City Police

ठाणे : 
ठाणे स्थानकाबाहेरील गावदेवी येथील शेअर रिक्षामधुन लोकमान्य नगर येथे जाणाऱ्या कुटुंबाची गहाळ झालेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग पोलीस उपनिरिक्षक प्रविण जाधव यांच्यामुळे सुखरूप परत मिळाली आहे.सोमवारी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाकचौरे यांच्याहस्ते या कुटुंबाला गहाळ झालेली बॅग देण्यात आली. यावेळी, उपनिरिक्षक जाधव यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विकास सस्ते उपस्थित होते.

ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर ३ येथे राहणाऱ्या स्वाती जीवन सांगळे या आई, भाऊ व मामा - मामी २८ फेब्रु. रोजी सोलापुरहुन रेल्वेने ठाणे स्थानकात उतरल्या. गावदेवी रिक्षा स्थानक येथुन शेअर रिक्षाने प्रवास करीत असताना त्यांच्याकडील किंमती ऐवजाची बॅग विसरून रिक्षामध्ये राहिली होती. बॅगेमध्ये साडेपाच तोळ्यांच्या दागिन्यासह रोकड व अन्य सामान असा साडेचार लाखांचा मुद्देमाल होता. सांगळे यांनी याबाबतची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सस्ते यांना दिल्यानंतर सस्ते यांनी ही बाब उपनिरिक्षक प्रविण जाधव यांना कळवली.
 
जाधव यांनी तात्काळ रिक्षा नंबरचा छडा लावुन आपल्या गुप्त बातमीदाराद्वारे रिक्षा चालकाचा शोध लावला. सुरुवातीला रिक्षाचालक आणि रिक्षाचा मालक ताकास तूर लागु देत नव्हते. अखेर, उपनिरिक्षक जाधव यांनी पोलीसी खाक्या दाखवताच रिक्षाचालकाने ऐवजाची बॅग आणुन दिली. त्यानुसार, ३ मार्च रोजी सांगळे दांपत्याला ऐवजाची बॅग मुद्देमालासह सुखरूप परत करण्यात आली.

पोलीस उपनिरिक्षक प्रविण जाधव यांनी, वाहतुक उपविभागात कार्यरत असताना वैविध्यपूर्णरित्या कौशल्याने तसेच सीसी टीव्ही फुटेज व जनसंपर्काच्या माध्यमातुन आजवर लाखो रुपये किंमतीचे विविध मॉडेलचे ४७ मोबाईल, दोन लॅपटॉप, सोनी कंपनीचे दोन महागडे कॅमेरे आणि अतिमहत्वाचे कागदपत्रे व कपडेलत्ते असलेल्या नऊ बॅगा व पर्स प्रवाश्यांना सुखरूप मिळवुन दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0