६, ७ मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा; २ हजार ११९ कंपन्यांचा सहभाग

    04-Mar-2024
Total Views |
Namo Maharojgar Melawa

ठाणे : 
कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ६ व ७ मार्च रोजी ठाण्यातील मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका,येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात २ हजार ११९ कंपन्यांचा सहभाग असुन तब्बल १ लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तरी मेळाव्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन योग्य प्रकारे करावे, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशान्वये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमार्फत होणाऱ्या “नमो महारोजगार” मेळाव्याच्या ठिकाणी सोमवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, पोलीस अपर आयुक्त महेश पाटील, पोलीस अधीक्षक डि.एस. स्वामी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
उद्योगमंत्री सामंत यांनी संपूर्ण माहिती घेऊन कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, याकरिता मॉक ड्रिलचे आयोजन करण्याची सूचना करून याठिकाणी तात्पुरते रुग्णालय देखील उभारल्याचे सांगितले.या मेळाव्यात ३५२ स्टॉल्स असुन पहिल्या दिवशी १ हजार ७४ कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये ५६ हजार १२० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच ७ मार्च रोजी १ हजार ४५ कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये ४४ हजार ७७४ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
 
बेरोजगारांना आवाहन

कोकण विभागातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या नमो महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.