वायनाड व्हाया अमेठी!

    31-Mar-2024
Total Views |
MODI RAHUL 
 
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून त्यांचा मतदारसंघ हिसकावून घेतल्यानंतर, भाजपने आपले पुढचे लक्ष्य केरळमधील वायनाड जिंकण्याकडे वळवले आहे. जो सध्याचा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. केरळमधील भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षाची एकूण ताकद आणि वायनाडमधली भाजपची २०२४ साठीची रणनीती याचा घेतलेला हा आढावा...
 
अमेठी या गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांचा भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी गेल्या निवडणुकीत २०१९ला ५५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर आता भाजपने वायनाड मतदारसंघाकडे आपले लक्ष वळविले आहे. याचे कारण राहुल गांधी त्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वास्तविक निवडणुकीतील यशापयशाच्या निकषावर भाजपची स्थिती केरळमध्ये क्षीण. २०१९ साली भाजपने केरळात मित्रपक्षांसह लोकसभेची निवडणूक लढविली होती. तेथील २० पैकी १५ जागांवर भाजपने उमेदवार उतरवले होते, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) भारत धर्म जनसेना पक्षाने चार व केरळ काँग्रेस (थॉमस)ने एका जागेवर उमेदवार दिला होता. मात्र, या आघाडीला एकाही जागेवर विजय मिळविता आलेला नव्हता. त्याउलट, काँग्रेसप्रणित आघाडीला तब्बल १९ जागांवर विजय मिळाला होता. त्यात काँग्रेसने १६ जागा लढवून जिंकलेल्या १५ जागांचा समावेश होता. देशभरात काँग्रेसने ज्या ५२ जागा २०१९च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या, त्यातील १५ जागा या एकट्या केरळातील होत्या. डाव्या आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर भाजप वायनाडमध्ये राहुल गांधी यांना देत असलेल्या आव्हानाचा अर्थ तपासून पाहायला हवा.
 
वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असे मानायला हरकत नाही. गेल्या तीन निवडणुकांत तेथे सातत्याने काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आला आहे. दरवेळी तेथे लढत ही काँग्रेस विरुद्ध डावी आघाडी अशीच होत आली आहे. २००९ साली काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवासन यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) उमेदवार रहमतुल्लाह यांचा तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. २०१४ सालच्या निवडणुकीत श्रीनिवास हेच काँग्रेसचे उमेदवार असूनही, सीपीआयने सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य २० हजारांपर्यंत खाली घसरले. २०१९ सालच्या निवडणुकीत अमेठीतील संभाव्य पराभव लक्षात घेऊन, राहुल गांधी यांनी केरळातील हा तुलनेने सुरक्षित मतदारसंघ निवडला. त्यांनी सीपीआयचे उमेदवार पी. पी. सुनीर यांच्यावर चार लाखांहून अधिक मताधिक्याने मात केली. २००९ आणि २०१४च्या निवडणुकीत तेथे भाजपचा उमेदवार लढतीत होता, तर २०१९च्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असणार्‍या भारत धर्म जनसेना पक्षाचा उमेदवार होता. मात्र, या तिन्ही वेळी भाजप आघाडीला या मतदारसंघात मिळालेल्या मतांचे प्रमाण चार ते आठ टक्क्यांच्या दरम्यानच होते. राहुल गांधी यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण ६५ टक्के होते. ही तफावत लहान नाही. मात्र, भाजपचे गणित निराळे असू शकते.
 
२००९च्या निवडणुकीपासून गेल्या दोन निवडणुकांत भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण (चार टक्क्यांवरून आठ टक्क्यांपर्यंत) दुप्पट झाले आहे. हे भाजपच्या आत्मविश्वासाचे एक कारण असू शकते. यावेळी भाजपने वायनाड मतदारसंघात आपले केरळ प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी अगोदरच्या तुलनेत तगडीच. सुरेंद्रन यांनी प्रचाराला रोड शोने सुरुवात केली आणि वायनाडमध्ये विकासासाठी कोणताही पुढाकार न घेतल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्याचवेळी केंद्रातील कल्याणकारी योजना मात्र वायनाडमधील नागरिकांच्या लाभाच्या आहेत, असा प्रचार ते करत आहेत. या लोकसभा मतदारसंघात मल्लपुरम जिल्ह्यातील तीन आणि कोझिकोडेचा एक असे येणारे चार मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. तेथे भाजपला आपला जनाधार कितपत विस्तारता येईल, याची साशंकता आहे. मात्र, वायनाडअंतर्गत येणार्‍या अन्य तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपला सुमारे नऊ ते १२ टक्के मते गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०२१) मिळाली होती. तेथे अधिक विस्तार करण्याची भाजपची योजना असू शकते.
 
जनाधार हा हळूहळू पण सातत्याने विस्तारत ठेवावा लागतो, अशी भाजपची नेहमीच व्यूहरचना राहिली आहे. अमेठीत भाजपला कधी विजय मिळेल, अशी अपेक्षा कोणी २०१९ पर्यंत केलेली नसेल. २००४ साली अमेठीत भाजपच्या उमेदवाराला केवळ नऊ टक्केच मते मिळाली होती, एवढेच नाही तर त्या पक्षाचा उमेदवार तिसर्‍या स्थानावर होता. त्याच निवडणुकीनंतर केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारला पराभवामुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. २००९च्या निवडणुकीत केंद्रात पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आली. तेव्हाही अमेठीत भाजप उमेदवाराला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते. एवढेच नव्हे तर अगोदर मिळालेल्या मतांमध्ये घट होऊन, ते प्रमाण सहा टक्क्यांवर घसरले. २०१४ साली मोदी लाटेपासून राजकीय समीकरणे देशभर बदलली, तशीच ती अमेठीत देखील. राहुल गांधी यांचा विजय जरी झाला, तरी भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्यापेक्षा त्यांना मिळालेले मताधिक्य एक लाखांपर्यंत खाली घसरले होते. २००९ साली राहुल यांना मिळालेले मताधिक्य पावणे चार लाखांचे होते, हे लक्षात घेतले म्हणजे, ही घसरण केवढी लक्षणीय होती, याची कल्पना येऊ शकेल. अखेरीस २०१९च्या निवडणुकीत राहुल यांचा पराभव करून, काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ हस्तगत करण्यात भाजपला यश आले. तीच व्यूहरचना वायनाडमध्ये वापरण्याचा भाजपचा मानस असावा.
 
सुरेंद्रन यांना उमेदवारी देऊन, भाजपने अनेक संदेश दिले आहेत. एक तर पक्षाने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे, हा पहिला संदेश. याचे कारण सुरेंद्रन हे प्रदेशाध्यक्ष आहेत, एवढेच नव्हे तर आक्रमक नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्याचा एकच पुरावा म्हणजे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सुरेंद्रन यांनी पथानामथिट्टा मतदारसंघातून लढविलेल्या निवडणुकीचा निकाल. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांत काँग्रेसचा विजय झाला असला, तरी २०१९च्या निवडणुकीत सुरेंद्रन यांना उमेदवारी दिल्यांनतर, भाजपला मिळालेल्या मतांच्या प्रमाणाने २०१४च्या १६ टक्क्यांवरून २०१९ मध्ये थेट २९ टक्क्यांवर उसळी घेतली होती. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनिल अँटनी हे यावेळी तेथून उमेदवार असतील, तर सुरेंद्रन यांना वायनाडमधून पक्षाने उतरविले आहे. पथानामथिट्टाप्रमाणे वायनाडमध्ये देखील ते किमया करू शकतील, असा पक्षाचा होरा असावा. शबरीमला आंदोलनात सुरेंद्रन आघाडीवर होते. २०१६ आणि २०२१च्या विधानसभा निवडणुकांत सुरेंद्रन यांचा अनुक्रमे ८९ आणि ७४५ मतांनी पराभव झाला होता. तेव्हा निवडणुकीत जनमताचा कल आपल्याकडे वळविण्याची क्षमता सुरेंद्रन यांच्याकडे आहे, असा भाजपचा विश्वास असावा. शिवाय भाजपने तगडा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेस (राहुल गांधी) आणि सीपीआय (अँनी राजा) यांच्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन, भाजपला लाभ होईल, असाही भाजपचा होरा असावा. त्याखेरीज नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आणि भाजपने केरळातील अल्पसंख्यांकांशी जवळीक करण्याचे चालविलेले प्रयत्न यांचाही वाटा सुरेंद्रन यांना मिळणार्‍या मतांमध्ये वाटा असणार, हेही नाकारता येणार नाही.
 
विजयी होण्याच्या आकांक्षेने भाजप वायनाडमध्ये उतरला असला, तरी त्याचा अर्थ यावेळी भाजपला विजय मिळेलच असे नाही. याचे कारण जनमताचा कल हळूहळू बदलत असतो. पण, प्रत्येक निवडणुकीत अगोदरपेक्षा एक पाऊल पुढे पडणे आणि अंतिमतः आपले साध्य साधणे हा भाजपच्या व्यूहरचनेचा अविभाज्य भाग आहे. वायनाडमध्ये भाजपचा विजय होतो किंवा नाही यापेक्षाही सुरेंद्रन यांच्या उमेदवारीने भाजपचे मतांचे प्राण किती वधारते आणि राहुल गांधी यांचे मताधिक्य किती कमी होते हा खरा औत्सुक्याचा मुद्दा. राहुल गांधी यांचे मताधिक्य घटणे, हाही भाजप तूर्तास आपला विजयच मानेल!
राहूल गोखले
९८२२८२८८१९