इंडी आघाडीच्या सभेत राहूल गांधींकडून उद्धव ठाकरेंचा अपमान?

भाषणात ठाकरेंचा नामोल्लेख टाळला

    31-Mar-2024
Total Views |
 
Rahul Gandhi & Udhhav Thackeray
 
नवी दिल्ली : दिल्लीत पार पडलेल्या इंडी आघाडीच्या सभेत काँग्रेस नेते राहूल गांधी यांना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसले. राहूल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना इंडी आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची नावं घेतली. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव टाळल्याचे पाहायला मिळाले.
 
रविवार, दि. ३१ मार्च रोजी दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात इंडी आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. दिल्लीच्या रामलीला मैदानात ही सभा पार पडली. या सभेत इंडी आघाडीतील काही प्रमुख नेत्यांची भाषणं झाली.
 
हे वाचलंत का? -  "उद्धवजींना सख्ख्या भावाच्या विरोधात कोर्टात का जावं लागलं?"
 
याशिवाय उद्धव ठाकरेंचेही भाषण झाले. मात्र, राहूल गांधी ज्यावेळी भाषणासाठी पुढे आले त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सर्वांचे नाव घेतले. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या नावाचादेखील उल्लेख केला. परंतू, ते उद्धव ठाकरेंचे नाव घ्यायला विसरले.
 
राहूल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, शरद पवार, भगवंत मान, चंपा सोरेन, अखिलेश यादव यांची नावं घेतली. तसेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राज्यसभा खासदार असलेले डेरेक ओब्रायन यांच्या नावाचादेखील उल्लेख केला. पण यावेळी ते उद्धव ठाकरेंचे नाव घेताना दिसले नाहीत. त्यामुळे राहूल गांधींना उद्धव ठाकरेंचा विसर पडला का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.