कुख्यात गुंड, माफिया अन्सारीचा सपा नेत्यांना पुळका!, दफनविधीला उपस्थिती

    30-Mar-2024
Total Views |
gangster-mukhtar-ansari-last-rite-sp
 
 
नवी दिल्ली :     उत्तर प्रदेशातील एकेकाळचा माफिया तथा कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा बांदा तुरुंगात हृदविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाला. दि ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता गाझीपूर येथील कालीबाग येथील दफनभूमीत मृतदेहास दफन करण्यात आले. यावेळी गुंड अन्सारीच्या अंत्यदर्शनास समाजवादी पार्टीचे नेते पोहोचले होते.

 
 
दरम्यान, दफन करताना अन्सारीचे शेकडो समर्थक जमा झाले होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांनाच कबरीत माती टाकण्याची परवानगी देण्यात आली. त्याचवेळी समाजवादी पक्षाच्या नेत्याने मुख्तार याचे वर्णन गरिबांचा मसिहा असे केले आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या अंबिका चौधरी म्हणाल्या, “आम्ही येथे अंत्यदर्शनासाठी आलो आहोत. आज गरीबांचा एक मसिहा निघून जात असून लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि शोक ज्या प्रकारे आहे त्याचे वर्णन करणे सोपे नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, माफिया मुख्तार अन्सारी यास अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्तार अन्सारी यास बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर ९ डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय उपचार केले. मात्र उपचारास अन्सारी याने कोणतेही प्रतिसाद दिले नाही. परिणामी उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, कुख्यात गुंड अन्सारीच्या मृत्युनंतर त्याच्या मरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. बांदा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले असून एका महिन्यात तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यावर सपा नेत्या चौधरी म्हणाल्या, “मुख्तार अन्सारीला सर्व शोषित आणि गरीब लोकांचे समर्थन होते. त्या लोकांमध्ये सहभागी होण्याकरिता आलो आहोत. आजच्या काळात लोक राजकारणावर कितीही बोलत असले तरी यापेक्षा वाईट आणि क्षुल्लक काहीही असू शकत नाही. आज गरीबांचा मसिहा याच रस्त्यावरून जात आहे, असे सपा नेत्याने म्हटले आहे.