‘पंच परिवर्तन’ ही आजच्या समाजाची गरज : दत्तात्रेय होसबळे

    30-Mar-2024
Total Views |
Panch Parivartan
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सातत्याने वाढत असून, या दृष्टिकोनातून सामाजिक प्रबोधनात आणि राक्षसी शक्तींच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संघाने विशेष योगदान दिले आहे. राष्ट्रीय विचारांच्या प्रसाराला गती देण्यासाठी, त्याच्या कार्याला अधिक खोली आणि रुंदी देण्यासाठी संघ ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेसह सज्ज आहे. ‘पंच परिवर्तन’ ही आजच्या काळाची आणि समाजाची विशेष गरज आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले. नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाह पदावर दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड करण्यात आली. त्यानिमित्ताने ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’सोबत होसबळे यांनी विशेष संवाद साधला. त्या संवादाचा संपादित अंश देत आहोत...

रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत यंदा उपस्थित प्रतिनिधींची संख्या अचानक वाढलेली दिसत आहे, हे कसे घडले?

संख्या अचानक वाढली असे नाही. ही वाढ हळूहळू होत आहे. कार्यविस्ताराबरोबर स्वयंसेवकांची संख्या वाढल्याने, त्या प्रमाणात प्रतिनिधींची संख्या वाढणे बंधनकारक होते. शाखांचा विस्तार वाढत गेला की, सक्रिय स्वयंसेवकांची संख्याही आपोआप वाढत जाते आणि त्यानुसार प्रतिनिधींची संख्याही वाढते. दुसरे म्हणजे, प्रतिनिधी सभेत यामध्ये मोठ्या संख्येने निमंत्रित बंधू-भगिनींचाही समावेश होता. विविध संघटनांच्या अधिकाधिक प्रतिनिधींनी सभेला यावे, असे आवाहन बैठकीपूर्वीच करण्यात आले होते. तिसरे म्हणजे, गेल्या तीन वर्षांत कोरोना महामारीमुळे प्रतिनिधींच्या संख्येवर काही निर्बंध घालण्यात आले होते. संख्या मर्यादित ठेवण्याबाबत आम्हाला विशेष काळजी घ्यायची होती. त्यामुळे काही गटांची आम्ही अपेक्षाही केली नव्हती. जसे की एक वर्ष विभाग प्रचारक अपेक्षित नव्हते, विविध क्षेत्राचे कार्यकर्ते अपेक्षित नव्हते. या कारणास्तव निश्चितच तेव्हा संख्या कमी होती आणि त्यामुळेच आता त्यात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कोणती विशेष उद्दिष्टे निर्धारित केली आहेत?

संघ शताब्दी वर्षाच्या संदर्भात आम्ही संघटनात्मक दृष्टिकोनातून दोन ध्येय समोर ठेवली आहेत. एक म्हणजे, शाखांचा विस्तार आणि दुसरे कार्याची गुणवत्ता. सर्व स्वयंसेवकांसमोर सध्या ही दोन ध्येय आहेत. कार्याची गुणवत्ता वाढल्याने प्रभाव वाढेल. संख्यात्मक विस्तारासोबतच गुणात्मक वाढही व्हायला हवी, असा आग्रह आहे. त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून आपण ’पंच परिवर्तन’ हा विषय सध्या समोर ठेवला आहे. ‘पंच परिवर्तना’ची चर्चा राष्ट्रीय दृष्टिकोनातून पुढे नेण्यात यावी, असा आमचा आग्रह आहे. समाजातील सज्जन शक्ती आणि संस्थांची ताकद यादृष्टीने एकत्र यावेत. त्यामुळे संघ शताब्दी वर्षात या सर्व विषयांवर संघटनात्मक आणि सामाजिक पातळीवर पुढाकार घेण्याचे नियोजन आपण केले आहे.

‘पंच परिवर्तना’ची संपूर्ण संकल्पना सर्वसामान्य समाजापर्यंत कशी पोहोचवणार आणि यात कोणती आव्हाने आहेत?

अतिरिक्त सावधगिरी, अधिक परिश्रम आणि सखोल विचार फक्त अनुकूल काळातच आवश्यक असतो. आज राष्ट्र विचाराच्या प्रसार करण्यासाठी अनुकूल वेळ लागतो. परंतु, ही अनुकूलता शांतपणे बसून आनंद घेण्यासाठी नाही. परिश्रमाची पराकाष्ठा दाखवण्याची ही वेळ आहे. संघाचे स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन, ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना घेऊन, पुढे जाण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेही ‘पंच परिवर्तन’ ही आज सर्वसामान्य समाजाची गरज आहे. समाजातील समरसतेचा आग्रह, पर्यावरणपूरक जीवनशैली, कौटुंबिक मूल्यांना चालना देण्यासाठी कौटुंबिक प्रबोधन, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये ’स्व’ अर्थात भारतीयत्वाचा आग्रह आणि नागरी कर्तव्यांच्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन, यांसारखे आयाम ‘पंच परिवर्तना’चे आहेत, जे सध्या सामान्य समाजाशी जोडलेले आहेत. हे विषय वैयक्तिक, कौटुंबिक आणि आपल्या शाखांपर्यंत म्हणजेच व्यापक समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. हा मुद्दा कार्यकर्त्यांसमक्ष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हा केवळ वैचारिक विचारमंथनाचा विषय नाही, तर तो आचरण आणि व्यवहाराचा विषय आहे. सोबतच सामाजिक समरसतेचा विषय घेऊन, सामाजिक वर्ग प्रमुखांच्या बैठका घेतल्या जातात. संघाचा व्यापक समाजापर्यंत संपर्क असल्याने, त्यांच्यापर्यंत हा विषय नेऊन यादृष्टीने आग्रह केला जाईल.

यंदाच्या प्रतिनिधी सभेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त संघाने काही विशेष कार्यक्रम आखले आहेत का?
 
आपल्या एकात्मता स्तोत्रात शौर्य आणि स्त्रीशक्तीची प्रतिमूर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आढळते. आपल्या इतिहासाचे नीट विश्लेषण केले, तर समाज, धर्म, शासन, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आदर्श प्रस्थापित केला आहे. आज त्यांच्या त्रिशताब्दीनिमित्त आम्ही दोन-तीन उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. सामान्यतः हिंदू समाजात अशी चर्चा केली जाते की, समाजातील वंचित घटकातील लोकांना कोणत्याही प्रकारचे योगदान देण्याची संधी मिळाली नाही. तसेच महिलांच्या संदर्भातही विकृत चर्चा निर्माण केली जाते. परंतु, आपण पाहिले तर अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट अशा सर्व विकृत चर्चेला चोख उत्तर देतो. हिंदू समाजाचा एक ऐतिहासिक पैलू म्हणून त्याकडे पाहिले जाते. दुसरे असे की, सध्याच्या समाजातही महिलांच्या सक्षमीकरणाबाबत, त्यांच्या सहभागाबाबत खूप चर्चा होत आहे. याचवर्षी महिला समन्वयाच्या आमच्या भगिनींनी देशभरात ४०० हून अधिक संमेलने आयोजित केली. ज्यामध्ये पाच लाखांहून अधिक महिलांचा सहभाग होता. या दृष्टिकोनातून देवी अहिल्याबाईंची त्रिशताब्दी ते कार्य पुढे नेण्याची चांगली संधी आहे. यात संघाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी एका सर्वसमावेशक योजनेअंतर्गत समाजात एक उत्सव समिती स्थापन केली जाईल. जी इतर महिला संघटना आणि समाजातील इतर लोकांच्या सहकार्याने त्रिशताब्दी सोहळ्याचे आयोजन करेल. ज्यात समाजाच्या विविध पैलूंवर साहित्य, व्याख्याने आणि इतर कार्यक्रमांचा विचार करण्यात आला आहे.

 
संघाचे कार्य दिवसेंदिवस विस्तारते आहे; पण त्यासोबत भारतविरोधी आणि संघविरोधी शक्तींच्या रणनीतीही बदलत आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी संघाची काय योजना आहे?

मुळात संघाचे विरोधी आहेत, यातून हेदेखील सिद्ध होते की, संघाचा विस्तार वाढतो आहे. भारताचे महत्त्व आणि संघाचा प्रभाव वाढला नसता, तर विरोध करण्याचे काही कारणच नव्हते. विरोधावरून हेच सिद्ध होते की, तथाकथित विरोधकांनी एक प्रकारे मान्य केले आहे की, भारत आणि संघाचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांची रणनीती काहीही असो, संघाने त्याला उपस्थित राहून प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. संघाच्या कार्याचा विस्तार करून आणि विविध पैलूंमध्ये स्वयंसेवकांचा सहभाग वाढवून तसेच सामाजिक, वैचारिक इत्यादी विविध प्रकारच्या कार्यात लोकांना सहभागी करून घेऊनच, तथाकथित विरोधकांच्या डावपेचांना उत्तर देणे शक्य आहे, असे संघाचे मत आहे.
 
तुमची रा. स्व. संघाचे सरकार्यवाह म्हणून पुन्हा निवड झाली. पण, संघाचे टीकाकार याला एक निरंकुश संघटना मानतात, तर सामान्य लोक यासंदर्भात जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात किंवा काही प्रमाणात गोंधळात असतात. संघात ज्या प्रकारची लोकशाही आहे, त्याचे विश्लेषण कसे कराल?
 
संघावर निरंकुश संघटना असल्याचा आरोप का केला जातो, हे मला समजत नाही. कारण, संघ ही तर मुक्त वातावरणात काम करणारी संघटना आहे. कोणतीही व्यक्ती शाखेत येऊन, त्यात सहभागी होऊ शकते. तृतीय सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरस एकदा म्हणाले होते की, संघाचे सर्वोच्च पदावरून नेतृत्व करणारे, पू. सरसंघचालकांस एक सामान्य स्वयंसेवक प्रश्न विचारतो आणि सरसंघचालक स्वतः त्यास उत्तर देतात. संघात अशाप्रकारची लोकशाही आहे. कदाचित इतर कोणत्याही संस्थेत असे घडत नाही. त्यामुळे टीकाकार असे आरोप का करतात, हे समजत नाही. एखाद्या परिवारासारखी संघाची कार्यपद्धती आहे. संघातील सर्व स्तरावरील प्रत्येक निर्णय चर्चा आणि सामूहिक सहमतीने घेतले जातात.”

लवकरच देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि संघासाठीही हे निवडणुकीचे वर्ष आहे. तेव्हा लोकशाहीच्या या उत्सवाकडे कसे पाहावे आणि याबद्दल तुम्ही स्वयंसेवकांना आणि समाजाला काय संदेश द्याल?
याविषयी मी सरकार्यवाहंच्या अहवालात उल्लेख केला आहे. प्रतिनिधी सभेतही प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या समारोपाच्या उद्बोधनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ‘पंच परिवर्तना’तही आम्ही या नात्याने आग्रह केला आहे. प्रत्येक नागरिकाला आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे. १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी आपापल्या ठिकाणी लोकशाही व्यवस्था मजबूत आणि यशस्वी करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. अशा वेळी राष्ट्रीय प्रश्न समाजासमोर ठेवले पाहिजेत. लोकशाहीच्या या पर्वात समाजहित, राष्ट्रीय एकात्मता आणि भारताचे हित यांवर चर्चा व्हायला हवी. असे विषय समोर यावेत, यासाठी सर्वसमावेशक वातावरण तयार केले पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांनी जनमत सुधारण्याचे आवाहन केले होते. खरं तर हे काम वर्षभर सुरू असले, तरी निवडणुकीच्या वातावरणात ते अधिक तत्परतेने व्हायला हवे.

संघाचे काम वाढत आहे, यात शंका नाही. या कामाचा पुढील टप्पा काय असेल?

 
एक संघटना म्हणून संघाची संघटनात्मक रचना आहे. संघाची कार्यकारिणी आहे. संघाचे कार्यकर्ते त्या संघटनात्मक रचनेत काम करत असतात. संघटनेचा भाव हा एक उत्स्फूर्त राष्ट्रीय चळवळ म्हणून आहे. त्यामुळे समाजाच्या सज्जन शक्तीचे प्रबोधन आणि संचालन करून समाजातील प्रत्येक वर्ग समूहाला सोबत घेऊन समाज परिवर्तनाचे कार्य केले पाहिजे. समाजात जातीय भेदभाव असता कामा नये. राष्ट्रीयत्वाची भावना समाजातील प्रत्येक वर्गात प्रवाहित व्हायला हवी. संघाला एक मजबूत राष्ट्रीय चळवळ बनवायची आहे. जी लोकांना जागृत करून, संघटित करून बदल घडवून आणते. त्यामुळे संघाने सुरुवातीपासूनच सांगितले आहे की, संघाला समाजात केवळ संघटना म्हणून काम करायचे नाही, तर समाजाला संघटित करण्याचे काम करायचे आहे. संघ आणि संपूर्ण समाज यांत फरक नसावा. या दृष्टिकोनातून सर्व सज्जन शक्तीला या राष्ट्रीय चळवळीचा भावार्थ समजून या आंदोलनात अग्रेसर व्हावे लागेल. याला संघाचा पुढचा टप्पा किंवा संघाची दृष्टी म्हणता येईल.

(अनुवाद :ओंकार मुळ्ये)