साताऱ्यातील दोन्ही राजेंचे अखेर मनोमिलन!

उदयनराजे भोसले शिवेंद्रराजेंच्या घरी दाखल

    30-Mar-2024
Total Views |
 
Udayanraje & Shivendraraje
 
मुंबई : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकमेकांना अंगावर घेणारे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यात अखेर मनोमिलन झाले आहे. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उदयनराजे त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी हे सख्य शेवटपर्यंत टिकेल, अशी ग्वाही दिली. छत्रपती शिवरायांचे वंशज एकत्र आल्यामुळे सातारकरांनी समाधान व्यक्त केले.
 
शनिवार, दि. ३० मार्च रोजी शिवेंद्र राजे यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे त्यांच्या घरी पोहोचल्यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले. ते भाजपाच्या वतीने सातारा लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. परंतु, उदयनराजे यांनी ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती, असे स्पष्ट केले आहे. या भेटीनंतर दोघेही माध्यमांना एकत्रित सामोरे गेले. उदयनराजे म्हणाले, शिवेंद्रराजे यांनी फार मोठे व्हावे. त्यासाठी जे काही करावे लागेल, ते मी करेन. आमचे लहानपणीचे फोटो बघितले तर शिवेंद्रराजे यांच्यापायी मी काकींचा मार खाल्ला आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
 
हे वाचलंत का? -  महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर! राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणीची जागा लढणार
 
माझ्याकडून अनावधानाने काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. शिवेंद्रराजे यांनी आता सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचा कारभार बघावा. आयुष्यात कधीतरी प्रत्येकाने थांबायला शिकले पाहिजे. आज ते ५० वर्षांचे झाले. शिवेंद्रराजे आणि माझे आता हसतानाचे फोटो काढा, मी जिल्ह्यात बॅनर्स लावतो. मी त्यांच्याविषयी जे बोलतोय, ती भावना आतापुरती नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही भावना कायम राहणार, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
 
मी सातारा-जावळीच्या पलीकडे जात नाही - शिवेंद्रराजे भोसले
 
शिवेंद्रराजे भोसले याभेटीविषयी बोलताना म्हणाले, आज महाराज इकडे आले, त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलं की, राजकीय विषय वेगळे, घरातील विषय वेगळे. ते साताऱ्याच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी १० हत्तींचे बळ देणारा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आहोत. सातारा लोकसभेचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा. म्हणजे आम्ही कामाला लागू. उदयनराजे भोसले यांचे वर (केंद्रात) काय चाललेय माहिती नाही, मी छोटा आहे. मी सातारा-जावळीपलीकडे जात नाही, असेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.