मोठी बातमी! बारामतीत नणंद भावजय सामना, महायुतीतर्फे सुनेत्रा पवार रिंगणात

    30-Mar-2024
Total Views |
 
Sunetra Pawar & Supriya Sule
 
मुंबई : बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शनिवारी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीसाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरु होती. दरम्यान, शनिवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातील महायूतीच्या उमेदवार राहणार आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाकडून बारामतीसाठी सुप्रिया सुळेंचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे.
 
याशिवाय अजित पवार गटाकडून शिरूरमध्ये शिवाजी आढळराव पाटील आणि रायगडमधून सुनील तटकरे यांना तिकीट देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परभणीची मतदारसंघाची जागा सोडली आहे.