महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर! राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणीची जागा लढणार

    30-Mar-2024
Total Views |
 
Mahadev Jankar & Sunil Tatkare
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शनिवार, दि. ३० मार्च रोजी ही माहिती दिली. या जागेवरून महादेव जानकर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
मंत्रालयाशेजारील 'राजगड' या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते. सुनिल तटकरे म्हणाले की, "राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीत ते अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील."
 
हे वाचलंत का? -  पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार जाहीर! वाचा संपूर्ण यादी
 
"हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनील तटकरे यांनी केली. राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे," अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.