आम्ही कुणाला सांगून 'ऑपरेशन' करीत नाही : देवेंद्र फडणवीस

जागावाटपाचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटणार

    30-Mar-2024
Total Views |
 
Fadan
 
मुंबई : "आम्ही जर ऑपरेशन केले, तर ते कुणाला कळत नाही. तुम्हाला (मीडिया) कळलेच तर लक्षात ठेवा ते ऑपरेशन नाही", अशी जोरदार टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ३० मार्च रोजी केली. तसेच महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन-तीन दिवसांत सोडवू, असेही त्यांनी सांगितले.
 
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लातूरचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रुंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, बसवराज पाटील आदी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार का? काय म्हणाले भुजबळ?
 
मराठवाड्यातील एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यात तथ्य आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले, "कोण आहे तो नेता? सांगा ना मलाही... जो मीडियातच माहिती आहे आणि मला माहिती नाही. आम्ही भूकंप करणार आहोत, असे तुम्ही सांगत आहात, तो कोणता भूकंप आहे ते तरी आम्हाला कळू द्या. असा काही भूकंप होणार हे आम्ही तुमच्याकडूनच ऐकतोय. तुम्ही मराठवाड्यातील त्या नेत्याचे नाव सांगा. आम्ही त्याचा पिच्छा करू, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. निवडणूक काळात ऑपरेशन, भूकंप होत असतात. पण आजतरी कोणताही भूकंप होणार नाही. अंबादास दानवेंशी संपर्क झालेला नाही. शिवाय काँग्रेस नेते अमित देशमुखही माझ्या संपर्कात नाहीत. ते विरोधक असले, तरी त्यांना संशयाच्या फेऱ्यात आणणे योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपात दाखल!
 
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यात आणखी बळ मिळेल. गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे देशाच्या विकासाला दिशा, गती देत आहेत, त्याने प्रभावित होऊन डॉ. अर्चना यांनी सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात येण्याचा व भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामाणिक व मूल्याधिष्ठीत राजकारण करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकुरकर यांचा समृद्ध वारसा डॉ. अर्चना भाजपामध्ये काम करून पुढे नेतील, असा विश्वास आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधाकर श्रुंगारे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याच कार्यक्रमात उदगीरचे नगराध्यक्षपद अनेक वर्षे भूषविणारे राजेश्वर निटुरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे, उदगीरचे ८ वेळा नगरसेवक व ७ वेळा नगराध्यक्ष राहीलेले निटुरे यांच्या प्रवेशामुळे भाजपला अनुभवी, परिपक्व नेतृत्व लाभले आहे, या शब्दांत फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
 
हे वाचलंत का? -  मनसेसोबत युतीचं काय झालं? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
 
चार-पाच जागांवर निर्णय बाकी!
 
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागा वाटपावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "आमचे चार पाच जागांवर अडलेले आहे. एक जागा अडली, तर तीन जागा अडतात. फार अडले आहे, असेही नाही. तो तिढा आज उद्या सुटेल, असे सांगतानाच धाराशीवच्या जागेबाबत महायुतीच्या स्थानिक नेत्यांनाच निर्णय घेण्यास सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. महाविकास आघाडी असो की इंडी आघाडी, त्यांच्यात फ्रेंडली फाईट सुरू आहे. चार महिन्यांपासून ते फ्रेंड म्हणून बसतात आणि नंतर फाईट करतात, असेच चित्र दिसत आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.