इस्रायलच्या दहशतवादविरोधी लढ्याचा रंजक इतिहास

    30-Mar-2024
Total Views |
Dahashatvaadachya Virodhat Israil book review

इस्रायल या विषयावर समर्पित तशी अनेक पुस्तके आहेत. पण, ‘दहशतवादाच्या विरोधात इस्रायल’ हे रुपाली भुसारी-कुलकर्णी लिखित पुस्तकाइतके ओघवती भाषा आणि अप्रतिम मांडणी असणारे दुसरे पुस्तक कदाचित मराठीत नसावे. गेल्या काही महिन्यांपासून भडकलेल्या इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचनात आले. या पुस्तकात इस्रायलचे दहशवादविरोधी धोरण, इस्रायल आणि भारत संबंध यांचा समग्र आढावा लेखिकेने घेतला आहे. त्याचबरोबर ’मोसाद’ची कार्यपद्धती आणि अन्य अत्यंत रोचक माहितीही या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. या पुस्तकातील काही प्रकरणे जगातील महत्त्वाच्या घडामोडींवर आवर्जून प्रकाश टाकतात. ‘प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूमागे मोसाद?’ हे प्रकरण अनेक गंभीर बाबींचे विवेचनही करते.

इस्रायलने ‘ऑपरेशन बॅबिलॉन’द्वारे सद्दाम हुसेनचे अणुबॉम्बचे स्वप्न कायमचे धुळीस मिळवले. इराकची अणुभट्टी कशी नियोजन करून उद्ध्वस्त केली, हे वाचताना वाचक अगदी गुंग होऊन जातो. किती वर्षं एखादा देश एखादे ‘ऑपरेशन’ पार पाडत असतो, याची या घटनाक्रमावरुन कल्पना येते. तसेच सीरियाविरूद्ध ‘ऑपरेशन ऑर्चर्ड’ किती उत्तम पद्धतीने इस्रायलने पार पाडले आहे, तेही हे पुस्तक वाचताना जाणवते. लेखिकेने अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भांसह ही सर्व तथ्ये वाचकांपर्यंत पोहोचवली आहेत.‘जाज्ज्वल्य देशभक्ती आणि अखिल मानवतेची सुरक्षितता या दोन पैकी एकाचीच निवड करायची वेळ आली, तर आपण कोणाला निवडणार?’ व ‘आपल्या समोर एकेक प्रगतीचे पाऊल पुढे टाकत, तुल्यबळ होत जाणारे, शत्रूराष्ट्र असेल, तर निष्क्रिय राहणे किंवा हताशपणे केवळ निरीक्षकाची भूमिका स्वीकारणे, हे खूपच महागात पडू शकते, याची जाणीव इस्रायलला आहे’ यांसारखी पुस्तकातील काही वाक्ये मनात रुंजी घालत राहतात. तसेच या पुस्तकातील इस्रायलशी संबंधित नवीन माहिती वाचकांनाही खिळवून ठेवते. जसे की, फ्रान्सच्या ’ग्लॅमर’ मासिकात काम करणारी मेरियन उमद्या देखण्या डॅनियलच्या प्रेमात पडलेली होती.

ऑगस्ट १९९९ साली दोघे विवाहबद्ध झाले. लगेचच इकडे भारतात दि. २४ डिसेंबर १९९९ रोजी ’इंडियन एअर लाईन्स फ्लाईट-८१४’चे काठमांडूहून अपहरण झाले. ते कंदहारला नेण्यात आले. वास्तविक मेरियनच्या आयुष्याचा याच्याशी थेट काहीच संबंध नव्हता. पण, या घटनेने तिचे आयुष्य कायमचे बदलून गेले. या अपहरण नाट्यात भारताने ज्या दहशतवाद्यांना सोडून दिले, तो अहमद ओमार सईद शेख यानेच पुढे डॅनियल पर्लचे पाकिस्तानात अपहरण केले आणि पुढे त्याची गळा कापून हत्या केली. त्यावेळी गर्भवती असणार्‍या, मेरियनचे आयुष्य कायमचे बदलले. भारत-इस्रायल संबंध भावनिक पातळीवर दृढ झाले.तसेच ’तेल अवीव आणि मुंबई ः दहशतवादाचे आव्हान’ या प्रकरणात १९७५चा इस्रायलच्या ‘हॉटेल सॅव्हॉय’वरचा दहशतवादी हल्ला आणि २६/११चा मुंबईवरील हल्ला, यातील जबरदस्त साम्य लेखिकेने वर्णिलेले आहे. अबू जिहाद या आपल्या शत्रूला इस्रायलने त्याच्या शयनकक्षात घुसून कसे ठार केले, त्याची कथाही अंगावर शहारे आणणारी.इस्रायलच्या ’मोसाद’ने ख्रुश्चेव्हचे गोपनीय भाषण कसे मिळवले, याचे पुस्तकात दिलेले वर्णनही तितकेच वाचनीय आहे. हिटलरने ज्यूंचे शिरकाण केले, त्यात ज्यूंच्या वाहतुकीची जबाबदारी असणार्‍या, आईकमानचे अर्जेंटिनामधून अपहरण करून, त्याच्यावर खटला चालवून, त्याला फाशी दिली, यासंबंधीचे प्रकरणही पुस्तकात वाचायला मिळते.
 
 एली कोहेन या धाडसी हेराच्या कार्याचे विवेचन रोमांच उभे केल्याशिवाय राहत नाही. थेट शत्रूराष्ट्राच्या म्हणजे सीरियाच्या केंद्रीय वर्तुळात प्रवेश करणारा आणि ज्याच्या हुशारीमुळे इस्रायलने ‘सहा दिवसांचे युद्ध’ लगेच जिंकले, त्या हेराच्या धाडसाची कथा खिळवून ठेवते. ’ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड’ आणि अन्य अनेक कारवायांचा मागोवादेखील लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे.
पॅलेस्टिनी नेता यासिर अराफत यांच्या मृत्यूमागे नेमके कोण आहे? त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात? यावर अजूनही चर्चा झडतात. काही जणांनी यामागे इस्रायलचा हात आहे, असा दावाही केला होता. याविषयी सुद्धा एका प्रकरणात माहिती दिलेली आहे.इस्रायल त्याच्या शत्रूराष्ट्रात एकही अणुशास्त्रज्ञ निर्माण होऊच देत नाही. इराणच्या चार-पाच अणुशास्त्रज्ञांच्या हत्या आणि त्याचा आढावादेखील या पुस्तकात लेखिकेने समाविष्ट केला आहे. आपला शत्रू वरचढ होऊन, आपल्या विरोधात कारवाया करण्याच्या आधीच त्याला हरवणे, ही इस्रायलची खासियत. अशा अनेक वाचनीय गोष्टी या पुस्तकात आहेत. ‘ऑपरेशन एन्टेबी’ तसेच आपल्या शत्रूला चक्क चॉकलेटमधून विष देऊन संपवणार्‍या इस्रायलच्या कारवायांचा देखील या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
 
इस्रायलचे दहशतवादविरोधी धोरण, इस्रायलचे भारताशी असणारे संबंध, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे सशक्त इस्रायल असे बरेचसे पैलू या पुस्तकात आहेत. पुस्तकाची भाषा साधी-सोपी असल्याने, वाचायलाही हुरूप येतो. अत्यंत मोलाची माहिती असणारे आणि कायम संग्रही असावे, असे हे पुस्तक. आता इस्रायल युद्ध पेटलेले असताना, आपल्याला जे काही माहीत असले पाहिजे, ते सगळे इस्रायलविषयी लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. हातात घेतले की, पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक खाली ठेवण्याची इच्छा होत नाही. अवश्य वाचावे, असे हे पुस्तक मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन!

लेखिका : रुपाली कुलकर्णी-भुसारी
प्रकाशन : वरदा प्रकाशन, पुणे
मूल्य : ३२० रुपये
पुस्तकासाठी संपर्क : ९९२२४२७५९६

 
कल्पना कुलकर्णी